पुस्तक | सूर्यकमळे | लेखक | वि. स. खांडेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ११६ | मूल्यांकन | ४.० | ५ |
माणूस हि विज्ञानाच्या दृष्टीने जरी केवळ एकच प्रजाती असली तरी जगात त्याच्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. विज्ञानाला जरी सापडल्या नसल्या तरी माणसानेच यातल्या बऱ्याचशा उपप्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यात काही चांगल्या, वाईट, गर्विष्ठ, प्रामाणिक अशा विविध स्वभावगुणांचा समावेश होतो. चांगल्या माणसात देखील आपल्याला एकापेक्षा जास्त गुण दिसून येतात. असे वेगवेगळे मानवी स्वभाव गुण शोधून खांडेकरांनी कथांची एक मालिकाच सूर्यकमळेमधून आपल्यापुढे मांडली आहे. अनेकदा माणसांना ओळखण्यात आपली गल्लत होते. बऱ्याचदा प्रथमदर्शी चांगला वाटणारा माणूस वाईट निघतो व वाईट वाटणारा माणूस चांगला निघतो.
'वद्य अष्टमी', 'दीपस्तंभ', 'विजय कोणाचा' ह्या कथांमधून माणूस ओळखण्यात झालेली चूक कशी महागात पडू शकते याचे वर्णन खांडेकरांनी केले आहे. 'दीपस्तंभ' सारख्या कथांमधून नवरा बायकोच्या नात्यामध्ये जर विश्वास नसेल तर काय घडू शकतं याची प्रचिती आपल्याला येते. 'विजय कोणाचा?' सारखी कथा काळजाला घरं पाडून जाते. दारूच्या कह्यात गेलेला माणूस कोणत्या थराला जातो हे समोर घडलेल्या प्रसंगामधून त्यांनी या कथेत रेखाटलं आहे. 'परिक्षकाची परीक्षा', कवीचं लग्न' यातून माणसाच्या अनोख्या स्वभावाच दर्शन आपल्याला होतं. 'कोकिळा' व 'धरण' सारख्या नैसर्गिक कथांमधून प्रीती व गर्व यांसारख्या भावना खांडेकरांनी आपल्यासमोर मांडल्या आहेत.
या आपल्याच कथांबद्दल बोलताना वि. स. खांडेकर म्हणतात,
"या संग्रहातल्या गोष्टी म्हणजे काही पिकलेले आंबे नाहीत; त्या कैऱ्या आहेत. पण कैऱ्या आंबट असल्या, तरी त्या मिठाला लावून आवडीने खाणारे लोक असतातच. इतकेच नव्हे तर कैऱ्यांचे पन्हे केले तर प्रसंगी त्यातला आंबटगोडपणा नुसत्या गोडपणापेक्षा अधिक अवीट असू शकतो."
१९२५-३० च्या काळात केवळ हौसेने म्हणून खांडेकरांनी ह्या कथा लिहिल्या आहेत. अगदी सुरवातीच्या काळातल्या लिखाणातल्या ह्या कथा असल्यामुळे त्यात अस्सल खांडेकरशैली असण्यापेक्षा गडकऱ्यांचा प्रभाव जास्त जाणवतो. तसं खुद्द लेखकानेही आपल्या प्रस्तावनेत कबूल केले आहे. परंतु तरीही त्यांची रंजकता कमी झालेली नाही. मानवी स्वभावाची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न सगळ्याच कथांमधून साधला गेला आहे; असं माझं मत आहे. एकदा ही सूर्यकमळे तुम्ही तुमच्या वाचनबागेत लावून पहा, त्यांतून उमलणारा अनुभव तुम्हाला माणसं जोखण्यात कामी येईल अशी आशा बाळगतो.