पुस्तक | संवादिनी | लेखक | व. पु. काळे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ८२ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
वपु म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. एक निराळाच अनुभव आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील कोणती गोष्ट त्यांच्या मानला बिलगेल सांगता येत नाही. एरवी आपल्या समोर घडणाऱ्या लाखो घटना आपल्याला दिसत असतात, भासत असतात, पण आपण मात्र त्यात अडकलो जात नाही. मात्र वपुंना मध्यमवर्गीय कुटुंबातील समस्या दिसतात. सुखदुःख, हेवेदावे लक्षात येतात. कुचंबना, ताणतणाव यांचा त्रास होतो. ते आपल्या लिखाणात हे इतक्या सराईतपणे आपल्याला दाखवून देतात की आपल्या मनाची बंद झालेली कवाडं खुली होतात. माणसाला माणूसकी समजते, माणसाला माणूस गवसतो.
हे पुस्तक म्हणजे वपु यांनी नानाविध कथा संवादातून उलघडल्या आहेत. संवाद हा माणसाचा मूळ धर्म आहे, आणि त्यातूनच ही संवादिनी तयार होते. अनेक बारीक विषय, आपल्याच मनातील, आपल्याच घरातील, आपल्याच आजूबाजूचे. संवादातून एक एक कांगोरा दिसत जातो. पुस्तक अतिशय लहान आहे. मोजून ६ कथा.
प्रत्येक कथा वेगळी. त्याचा तुम्ही वाचूनच अनुभव घ्यायला हवा. मला यातली "आत्मनस्तु कामाय" ही कथा खूपच जास्ती आवडली. फक्त ही एक कथा जरी वाचली.. तरी देखील पुस्तक वाचून धन्यता वाटावी इतकी छान आहे. एका संस्कृत सुभाषितावरून हे नाव दिले आहे.
"आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवति।"
जेव्हा आपलं एखाद्या गोष्टीत हित असतं तेव्हा आपल्याला ती गोष्ट आवडू लागते अशा अर्थाचं हे सुभाषित आहे. कथा वाचून तुम्हाला अजूनच आशय समजेल.
मला हे पुस्तक आवडले आहेच, त्यामुळे तुम्हाला देखील हे पुस्तक आवडेल ही खात्री आहे. तुम्ही एकदा वाचून आम्हाला नक्की तुमचा या पुस्तकाचा अनुभव कळवा.