पुस्तक | रुह | लेखक | मानव कौल | नीता कुलकर्णी |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २०० | मूल्यांकन | ४.८ | ५ |
अनेक दिवस उशाशी असणारं हे पुस्तक.. का कोण जाणे हातात मात्र घेऊ वाटत नव्हतं.. आणि अचानक हाती घेतल्यावर मात्र एक वेगळीच दुनिया समोर हळू हळू उलगडत गेली. मग मात्र पुस्तक खाली ठेऊ वाटलं नाही. पुस्तकाचं पान नि पान मनात हक्काची जागा करून बसलं आहे. मुखृष्ठावर असणारं चित्र आणि त्यावर लिहिलेलं एक वाक्य तुमच्या मनाला सुरवातीलाच ओरखडे घेते... "काश्मिरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची हळवी कथा.." आपल्याला जरी पुस्तकाचा अंदाज आलाय.. असं वाटलं, तरीही पुस्तक वाचताना तो अंदाज कसा फोल ठरला हे समजतं.
प्रत्येक माणसाच्या वर्मी लागेल, असे काहीतरी दुःख प्रत्येकाकडे असतेच. ते दुःख कधी आपल्याला व्यक्त करता येते.. कधी करता येत नाही.. मनात एक खदखद कायम असते.. त्या दुःखाला एक मोकळी वाट करून देणारं हे पुस्तक आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. काश्मिरी पंडित आणि मुसलमान.. यातील नात्याची वीण.. कशी उसवली गेली.. कसा तिथला समाज दुभंगला गेला.. तिथली सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती कशी बदलली.. त्याचे झालेले परिणाम, दुष्परिणाम.. कोविड.. कलम ३७०.. असे एक ना अनेक विषय. प्रत्येक विषयावर लेखकाचे असणारे विचार.. त्यामुळे मनात होणारी चलबिचल.. हुरहूर.. घालमेल.. या पुस्तकांत अगदी चपखल दाखवली आहे.
"मानव कौल" आणि "रुह" हे समीकरण पुस्तकातून विविध रूपाने समोर येतं.. सुरवातीलाच असणारी कविता.. घराची डोक्यात असणारी कल्पना.. वडिलांची मांडलेली छबी.. भूमिका.. आणि त्याच्या जोडीला असणारं मनातील विचारांचे समालोचन, या पुस्तकाला एक वेगळी झालर चढवून जाते. मनात सतत उद्भवणारी दुटप्पी भावना.. परकेपणा.. तिऱ्हाईतपणा.. उपरेपणा.. उदासीनता.. या पुस्तकाचा मुळ गाभा आहे. मनात विचारांचं काहूर माजलेलं असताना समोर उभ्या असलेल्या आयुष्याकडे नक्की कसं पहावं हे न समजल्याचा भाव पुस्तकाचा स्थायीभाव आहे. आणि इतकं असूनही पुस्तक कुठेच अरसिक होत नाही.. कुठेच उगीच लांबट लावलीये.. असं वाटत नाही.
काश्मिरी पंडित घरात जन्मला येऊन.. काश्मिर मध्ये न राहता येणाऱ्या वडिलांचं हळहळतं मन.. त्यांच्या भावना कधीच समजू न शकणाऱ्या लेखकाला.. त्यांच्या जाण्यानंतर होणाऱ्या वेदना.. हळू हळू त्यांची मनस्थिती समजतना लेखकाला होणारी अनुभूती.. आणि त्यातून जाग्या होणाऱ्या जाणिवा तुम्हाला साचेबद्ध चौकटीतून बाहेर डोकावताना दिसतात.. हीच या पुस्तकाची खरी ओळख आहे. सर्वांच्या मनात घर करू शकणाऱ्या या पुस्तकाला.. तुम्ही नक्कीच तुमच्या घरात एक जागा द्याल ही अपेक्षा. सर्वांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे.. आणि तुम्हालाही अजूनही हे पटतं नसेल तर... मला आवडणारी पुस्तकाच्या सुरवातीची कविता खाली दिली आहे.. ती वाचून तुम्ही नक्कीच पुस्तक विकत घ्याल ही खात्री आहे.
"घर आपला उंबरठा ओलांडून जात नाही,
घर सोडलं तेव्हा
माझ्यातूनही काहीही निसटून गेलं नव्हतं
शुभ्र ढगांनी वाकलेलं निळ आकाश
माझ्यासोबत होतं
आता मला जर विचारलंत
की तू कुठे राहतोस
तर मी सांगतो
मी घरात राहत नाही
माझ्या हृदयात घर घेऊन
मी भटकत असतो."