रूपकुंड - ओंकार जोशी | Roopkund - Omkar Joshi | Marathi Book Review

रूपकुंड-ओंकार-जोशी-Roopkund-Omkar-Joshi-Marathi-Book-Reviews
पुस्तक रूपकुंड लेखक ओंकार जोशी
प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १३८ मूल्यांकन ४. | ५

हिमालयाची बर्फाळ शिखरे आणि तिथल्या अनेक बहुचर्चित कथा कोणाला महिती नाही, असे होणारच नाही. रूपकुंड म्हणजे अशीच एक घटना, जागा, कथा आणि बरच काही. रूपकुंडला सापडलेले अस्थिपंजर, आणि कवट्या आणि त्यात त्यांचा महाराष्ट्रातील (कोकण) चित्पावन ब्राह्मण यांच्याशी असणारा संबंध आपल्या सर्वांनाच परिचित आहे. पण त्यामागची गोष्ट कोणाला माहिती नाही. नक्की काय झालं असेल?? हिमालयात कोकणचे डी.एन.ए. कसे गेले?? अशा अनेक वर्षांपासूनच्या अनुत्तरीत प्रश्नाची एक सबंध यादी असेल. याच प्रश्नांच्या उत्तराची ही एक काल्पनिक कथा आहे. त्यात अनेक संदर्भ खरे आहेत.. रुपकुंड आणि त्याच्याशी निगडित साऱ्या घटना एका सुंदर काल्पनिक कथेत रचून लेखकाने आपल्याला एक मेजवानीच दिली आहे.

अक्षरशः एका बैठकीत मी हे पुस्तक वाचलं. कथेचे दोन भाग केलेले आहेत. चालू वर्तमान आणि १२०० वर्षापूर्वीचा भूतकाळ. आणि विशेष गोष्ट म्हणजे.. दोन्ही हातात हात घालून आपल्याला पुस्तकांत पुढे घेऊन जातात. आणि आपण आपल्या कल्पनेत एक एक पात्र उभे करत जातो. अवनी, निखिल, आणि आजी वर्तमानात... तर नचिकेत, आजोबा, आणि उद्धव भूतकाळात कथा सुरू ठेवतात. पात्रातील सुसंगती, कथेतील कल्पकता आणि त्या त्या जागेची बारिकता लेखकाने खूपच निरखून ही गोष्ट लिहिल्याने आपल्याला वाचयला मजा येते.

ओंकार जोशी यांच हे दुसरं पुस्तक, पुस्तकातून अनेक वेगवेगळे विषय मांडण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. अनेक लोककथा यातूनच लोकांपर्यंत पोहचतात. या पुस्तकात तुम्हाला ते नक्की पाहायला मिळेल. मग ती निळावंती असो की राजा राणीच्या बहुचर्चित लोककथा, कल्पनाशक्तीच्या जोरावर यात असे अनेक पात्र आणि त्यातली संबंध फुलवून दाखवले आहेत. आणि याहून विशेष होता म्हणजे, यातूनही कथेला दिलेला प्रेमाचा बाक... किंवा सहवासाने उलगडणारे प्रेम यात हळूहळू तुम्हाला पाहायला मिळेल.

इतिहास, भूगोल, पौराणिक संदर्भ आणि प्रेमाची झालर अस एकूण हे पुस्तक... अगदी लहान आहे आणि तितकच आपल्याला पकडुन ठेवणारं देखील. सर्वांनी नक्की वाचयला हरकत नाही. एक नवीन गोष्ट आणि एक नवीन विषय! मला आवडलच, तुम्ही देखिल वाचून कसं वाटलं मला नक्की कळवा!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form