पुस्तक | पवनाकाठचा धोंडी | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १७२ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
स्वराज्याच्या रणसंग्रामात कित्येक किल्ले लढले, पडले, काळाच्या ओघात नाहीसे झाले. जसे गडकिल्ले नाहीसे झाले तशी त्यांची तजवीज राखणारी किल्लेदार, हवालदार इत्यादी मंडळींचाही काळाला विसर पडला. अशाच एका हवालदाराच्या आयुष्याची कथा "पवनाकाठचा धोंडी" मधून गोनीदा आपल्यासमोर मांडतात. हि कथा कुठल्या शत्रूयुद्धाची नाही, तर बदलत्या काळाबरोबर चालायचे नाकारणाऱ्या धोंडिबासारख्या जुन्या जाणत्या लोकांच्या काळयुद्धाची आहे.
मावळ प्रांतातल्या तुंगी गडाच्या हवालदाराची हि कथा आहे. महाराजांच्या काळात किल्लेदार पळून गेल्यावर ढमाले घराण्याचा हवालदार शर्थीने लढला आणि तेंव्हापासूनच हा किल्ला हवालदारांच्या स्वाधीन करण्यात आला. पातशाह्या आल्या, पेशवे आले, इंग्रजही येऊन गेले पण गड धोंडिबाच्या घराण्याकडेच राहिला. काळानुसार गडावरची सगळी वस्ती खाली पेठेत राहायला आली तसा धोंडिबाही गडाखाली राहायला आला. दिवसातून एकवेळ एका दमात गड पायाखाली घालून मावळ प्रांताची न्याहाळणी केल्याशिवाय धोंडिबाला चैन पडत नसे. त्याच्यातला हवालदार अजूनही तसाच जिवंत असल्याची जाणीव कथा आपल्याला सतत देत राहते.
कधीकाळी सगळ्या गावाचा आधार असणारा धोंडिबा दोन पैकं मिळायला लागल्यावर आपल्याच लोंकाना कसा दुरावत जातो याचे भीषण वास्तव या पुस्तकात रेखाटण्यात आले आहे. आपल्या लहान भावाचं आयुष्य, त्याचा प्रपंच योग्य मार्गी लावण्यासाठी अतोनात झटणारा वडील भाऊ धोंडिबाच्या रूपाने आपल्याला इथेच भेटतो. गाव गाड्यात चालणाऱ्या अनेक गोष्टी यात लेखकाने मांडल्या आहेत. आपल्याच लहान भावामुळे सोसावा लागणाऱ्या अपमानाची झळ धोंडिबा मोठ्या मनाने स्वीकारतो. जुन्या मूलतत्वांवर चालणारा धोंडिबा कालौघात गुरफटतो कि त्यावर मात करत पाय रोवून उभा राहतो हे जाणून घेण्यासाठी आपण पुस्तकच वाचायला पाहिजे.
नात्यांमधले भावनांचे अनेक पदर या पुस्तकाच्या निमित्ताने गोनीदांनी उलगडले आहेत. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी हे संपूर्ण कथानक साकारलं आहे. "जैत रे जैत" सारखाच भाषेचा पोत ह्या पुस्तकात वाचकांना आढळू शकतो. एका बैठकीत वाचून होण्यासारखं व सुरवातीपासूनच वाचकांना गुरफटून ठेवण्याचं सामर्थ्य या कथेला प्राप्त झालं आहे. कुमारांपासून ते पुढच्या कुठल्याही वयोगटाने वाचावं असं हे पुस्तक आपल्यासाठी गोनीदांनी लिहून ठेवलं आहे. काळ बदलाला तरी त्याला डोक्यावर न घेता आपल्यापरीने हाताळणाऱ्या झुंजार माणसाची हि कथा आहे. असे अनेक झुंजार धोंडी आपल्या आजूबाजूला वावरत असतात; हे त्यांचच कौतुक लेखकाने पुस्तक रूपात मांडलं आहे.
-© गिरीश अर्जुन खराबे.