निओ नचिकेत आणि इतर कथा - स्वप्नील भूमकर | Neo Nachiketa and Other Stories - Swapnil Bhumkar | Marathi Book Review

निओ-नचिकेत-स्वप्नील-भूमकर-Neo-Nachiketa-Swapnil-Bhumkar-Marathi-Book-Reviews
पुस्तक निओ नचिकेत आणि इतर कथा लेखक स्वप्नील भूमकर
प्रकाशन स्वप्नील भूमकर समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १२४ मूल्यांकन ४.६ | ५

काही पुस्तकं पाहता क्षणीच आपल्या मनात घर करून जातात.. त्यांची आपल्याला एक अनामिक ओढ लागलेली असते, ती कधी वाचून संपवतोय आणि आपण कधी पुढे जातोय.. यातच आपलं मन अडकलेलं असतं. असंच एक मनात हुरहूर जागवणारं पुस्तक म्हणजे... "स्वप्नील भूमकर" लिखित.. "निओ नचिकेत आणि इतर कथा". पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं बोलकं आहे की.. पाहताक्षणी आपल्याला यात काहीतरी गूढ लपलेलं आहे हे जाणवतं.. ते काय पाहण्यासाठी आपण पुस्तक हातात घेऊन काही पानं चाळतो. मलपृष्ठावरील मजकूर वाचतो.. आणि मग तर आपण अजूनच, पुस्तकाच्या गूढपणात अडकत जातो. मनात विचारांचं काहूर तयार होतं.

हे पुस्तक म्हणजे एक लघुकथा संग्रह आहे. सहा स्वयंभू कथा.. विशेष म्हणजे यात असणारी कथांची मांडणी, त्यांना दिलेली नावं.. इतकंच काय तर पृष्ठसंख्येचा आकडा देखील तुम्हाला चौकटीच्या आत डोकवायला भाग पाडेल. रहस्यमयी आणि गूढ कथांसाठी लागणारी भाषा लेखकाला अवगत आहे. या पुस्तकातली कोणतीही कथा आपण वाचताना आपल्याला त्याचा आधीच अंत समजत नाही. हळूहळू बनत जाणाऱ्या इमल्याप्रमाणे कथेचा एक एक भाग समोर येत जातो, हळूहळू कथा आकार घेते आणि संपूर्ण झाल्यावर आपल्याला त्यातील काही अस्पष्ट अंशाचा उलगडा होतो. परंतु तरीही प्रत्येक कथा आपल्या मनातल्या विचारांना सुरुंग लावते हे मात्र नक्की.

'वखवख' मधला त्रासलेला तरस.. वासनेचा मृगजळात अडकणाऱ्या माणसाचे नेतृत्व करतो असे मला वाटते. 'कॅथारसिस' मधला विष्णू जन्मतः हुशार.. परंतु पुढ्यात आलेल्या एकलकोंडेपणाचा व प्रतिभेच्या जाणिवांनी, आणि त्याचमुळे नकळत तयार होणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली, स्वतःच्याच शोधात दबला गेला आहे. 'उद्देगनगरी' मधला व्यसनाधीन अर्जुन तुम्हाला गावागावात दिसत असेलच.. ज्याने स्वतःचे विश्व स्वतःभोवती बांधले आहे. त्याला कुंपणही व्यसनाचंच आहे. 'फॅन्टासमगोरिया' ही एका कल्पनेला त्रासलेल्या तरुणाची व्यथा आहे. 'जय बटुक महाराज' मधील लक्ष्मण तुम्हाला नक्की आवडेल. या पुस्तकातील माझी ही सर्वात आवडती कथा आहे. लक्ष्मण आणि महाराज यांच्यातील संवाद.. मनात उठणारे प्रश्न.. त्यावरची उत्तरं.. जरी सापडली तरीही आपण फसलो आहे.. आपली गफलत झाली आहे.. हे जेव्हा त्याला समजते तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. 'निओ नचिकेत' कथेतले साधनासंपन्न, अध्यात्मिक योगगुरु जेव्हा सर्वकाही प्राप्त करून देखील, अजूनही प्रवाहाच्या गर्तेत अडकलेले आहेत. "पुढे काय?" हा जगविख्यात प्रश्न त्यांनाही पडलेला आहे.

अशा अतिशय वेगळ्या धाटणीच्या कथा या पुस्तकात आहेत. लेखकाने सामाजिक जाणिवांना, प्रश्नांना वेगळ्या प्रकारे, आपल्या समोर मांडले आहे. कथेतील नायकांची नावे ही पौराणिक आहेत.. कथेच्या सुरवातीला नेहमी ती नावे तुम्हाला सुखद द्विधा मनस्थितीत नेऊन ठेवतात. अनेक कथा वाचताना "जी. ए." यांची आठवण झाली. काहीश्या तश्याच प्रकारचं हे लिखाण आहे असं माझं वयक्तिक मत आहे. पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी ती छबी आपल्याला दिसून येते.

"एका रात्री, चंद्राने अंधाराला गिळलं. तो सूर्याइतकाच तेजस्वीपणे तळपत होता."

हे पुस्तक एखाद्या प्रवासाच्या वेळी मला पुन्हा वाचायला नक्की आवडेल! सर्वांनी वाचावं असं पुस्तक.. तुम्ही देखील पुस्तक वाचून, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form