पुस्तक | मोगरा फुलला | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ३४५ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
गोनिदा आणि संतचरित्रे यांचा एक अनोखा संगम आहे. महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त पंढरीच्या वारीनेच केलं आहे असं म्हटलं तर ते गोनिदांवर अन्याय केल्यासारखं होईल. आपल्या लेखणीच्या जोरावर गोनिदांनी अनेक संत चरित्र लोकांसमोर खुली केली आहेत. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला व अवघ्या विश्वाच्या शांतीसाठी ज्यांनी पसायदान मागितलं त्या जगदमाऊलीच्या जीवनपटाचा उलगडा गो. नि. दांडेकर उर्फ आप्पांनी "मोगरा फुलला" ह्या कादंबरीमधून केला आहे. काही काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन, त्यांच्या तोंडी संवाद देऊन माऊलींच्या जीवनाची कथा या कादंबरीमधून लेखक आपल्यासमोर मांडतो. कावेरी या रुक्मिणीच्या बालमैत्रिणी मार्फत कथा पुढे पुढे सरकत जाते.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांची जेवढी हि कथा आहे तेवढीच विठ्ठलपंत कुलकर्णी व रुक्मिणी या दाम्पत्याच्या जीवनाची देखील कथा आहे. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या विठ्ठलपंत व रुक्मिणी यांची भेट व त्यातून हळहळू उलगडत गेलेला त्यांच्या नात्याचा प्रवास. तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांचा झालेला विवाह व काही कालांतराने संसारातून संन्यास घेत काशीला निघून गेलेले विठ्ठलपंत यांच्या भूमिका रेखाटताना समकालीन भास निर्माण करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे. संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकलेल्या या चार भावंडाबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती असते. परंतु संन्यासातून विठ्ठलपंत माघारी संसारात का आले? याची माहिती क्वचितच कोणाला ठाऊक असेल. आळंदी व चऱ्होली सारख्या गावांची त्यावेळची परिस्थिती वाचकांसमोर उभी करण्यात गोनिदांनी कुठलीही कसूर केलेली नाही. चारही भावंडानी सोसलेल्या सर्व त्रासाबद्दल, जाचाबद्दल एकूणएक बारकावे यातून वाचकांना वाचायला मिळतात.
निवृत्तीचा निवृत्तीनाथापर्यंतचा, ज्ञानदेवांचा माऊलीपर्यंतचा व मुक्ताबाईचा मुक्ताईपर्यंतचा संपूर्ण प्रवास या पुस्तकातून आपल्याला समजून घेता येईल. अवघ्या विश्वाची माऊली बनलेल्या ज्ञानदेवाचा गुरु निवृत्ती कसा झाला? सगळ्यात धाकटी मुक्ता त्यांची मुक्ताई कशी झाली या सगळ्याची उकल गोनिदांनी या पुस्तकात केली आहे. मोगरा फुलला वाचत असताना आपल्याला नकळत भावार्थदीपिका तथा ज्ञानेश्वरीचे सार लेखक समजावून सांगतो. सर्वसामान्यांसाठी गीतेचा अर्थ ज्ञानदेवांनी प्राकृत मराठी भाषेत मांडला. रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखवत ब्रह्म तुमच्या आमच्यात वसलेलं आहे याचा साक्षात्कार घडवून दिला. आळंदी ते पंढरपूर प्रवासात रोज एक श्लोक सांगत त्यातून अखंड हरिपाठ निर्माण केला. आणि तेंव्हापासूनच वारीचा आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला. असे एक ना अनेक प्रसंग या कादंबरीमधून आपल्याला बारकाईने वाचायला मिळतात. नकळत का होईना आपलं तन आणि मन आपण त्यात हरवून बसतो. जगोद्धाराचं आपलं कार्य संपवून वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ज्ञाना समाधिस्थ झाला. अशा या ज्ञानोबा माऊलीचा जीवनप्रवास, कार्य आणि समाधी आपण मोगरा फुलला मधून अनुभवू शकतो.
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥
इवलेंसे रोप लावियलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बापरखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥
गोनीदांच्या लिखाणातून खरोखर हा मोगरा फुलला असून त्याचा वेलू गगनावरी गेला आहे; असं मलातरी हे पुस्तक वाचल्यावर वाटलं. ज्ञानोबांनी आपल्या आत्मिक बोधाचा शेला बापरखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला तसा गोनीदांनी पुस्तकरूपी शेला वाचकांच्या हाती सोपविला आहे. लेखकाला भाषेची आणि समकाळाची असलेली जाण, उत्कृष्ट भाषाशैली, प्रसंगांची यथायोग्य निवड, पात्रांमुखी दिलेले चपखल संवाद यांनी पुस्तकाची गोडी अजून वाढली आहे. असा हा "मोगरा फुलला" तुम्ही तुमच्या पुस्तक संग्रहात भर घालून जोपासू शकता. तुमच्या प्रियजनांना त्याचा उपभोग घेण्यासाठी भेट देऊ शकता. प्रत्येकाच्या जीवनात त्यातून बहरच येईल याची शाश्वती मला आहे. तर आजच मोगरा फुलला वाचायला घ्या आणि आपला अभिप्राय आम्हाला कळवा.