पुस्तक | मारवा [ऑडिओ बुक] | लेखिका | अनघा काकडे | ऋचा आपटे |
---|---|---|---|
प्रकाशन | स्टोरीटेल | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
वाचनवेळ | २ तास, ३० मिनिटे | मूल्यांकन | ४.८ | ५ |
"मारवा". नाव वाचूनच मी एकदम प्रसन्न झालो आणि हुरळून गेलो. या कथेत काय असेल म्हणून मी उत्सुक होतोच, आणि त्यात कथेचे छोटे छोटे पाच भाग आहेत. पुस्तक ऐकायला सुरवात केली. पुस्तकाची पात्र नव्या युगाची आहेत. भाषाही नव्या युगाची. त्याचसोबत छान आणि सुंदर मराठी इंग्लिश लहेजा. आणि सगळ्यात चपखल लागू पडणारी बाब म्हणजे "ऋचा आपटे" यांचा आवाज. खूपच सुंदर प्रकारे या पुस्तकाचं वाचन झालं आहे. त्यामुळे पुस्तक ऐकण्यात मजा येते. हा एक प्रकारे आपल्याला नवीन सिनेमा ही वाटतो, तर कधी पुस्तकाची पात्र मनात उतरत आहेत असंही वाटतं. खूपच सुंदर लिखाण.. अतिशय साजेसे संवाद आणि त्याहूनही सुंदर म्हणजे या कथेची सुबक बांधणी.
आताच्या पिढीला (यंग जनरेशनला) जस हवं असतं, अगदीं तशीच ही प्रेम कहाणी आहे. प्रेमाची व्याख्या स्वतःच्या मनात बांधू पाहणारी, स्वतःची नवी ओळख.. एका नवीन क्षेत्रात करू पाहणारी.. एक सुंदर मुलगी. तिचे मित्र, तिचा अभ्यास, तिचे समोर दिसणारे करिअर आणि प्रेम. नायिकेचं या पुस्तकात केलेलं वर्णन, तिच्या मनाची एक सतत होणारी द्विधा मनःस्तिथी या पुस्तकाला अजूनच सुंदर बनवते. हे पुस्तकं न थांबता सतत ऐकू वाटलं आणि संपल्यावरही ते ऐकू येत आहे असा भास मला झाला होता. यातच पुस्तकाची खरी जादू व प्रभाव तुम्हाला दिसून येईल. लिहिण्यासारखं खूप आहे पण अजून या पुस्तकातील गोष्ट उलगडली, तर ती मजा राहणार नाही. म्हणुन मला वाटत आहे कि तुम्ही हे पुस्तक स्वतः स्टोरिटेल वर ऐकावे आणि स्वतः तो सुदंर अनुभव घ्यावा.
मी सगळ्यांना आवर्जून सांगेल, एकदा तरी हे ऑडिओ बुक नक्की ऐका. तुम्हाला हमखास आवडेल. पुस्तकाची मांडणी, आणि कथा सगळ्यांच्या मनाला भिडणारी आहे. हे पुस्तक तुम्हाला एका नव्या विश्वात नक्कीच घेऊन जाते. माझ्या काही खास आवडीच्या पुस्तकात मी याला मोजू लागलो आहे. संभाषणाची ताकद या पुस्तकांतून तुम्हाला समजेल. आवर्जून ऐकावी अशी गोष्ट आहे. लेखिकेचे विशेष आभार, इतकी सुंदर कथा आमच्यासमोर मांडल्याबद्दल.