महाश्‍वेता - सुधा मूर्ती | Mahashweta - Sudha Murty | Marathi Book Review

महाश्‍वेता-सुधा-मूर्ती-Mahashweta-Sudha-Murty-Marathi-Book-Reviews
पुस्तक महाश्‍वेता लेखक सुधा मूर्ती | उमा कुलकर्णी
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १५२ मूल्यांकन ४.५ | 

समाजातील अनेक ज्वलंत प्रश्न हाताळण्याचे व विशेषतः महिलावर्गाचे प्रश्न मांडण्याचे काम सुधा मूर्तींनी आपल्या अनेक पुस्तकांमधून केलेलं आहे. असाच एक प्रश्न घेऊन त्यांनी आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला विचार करायला भाग पडणारी कथा "महाश्वेता" मधून मांडली आहे. सौंदर्याचं देणं लाभलेली ती परंतु जन्मजात गरीब असलेली व घरंदाज धनवान असा देखणा डॉक्टर असलेला तो यांच्या अवतीभोवती फिरत राहणारी हि कथा सरतेशेवटी वाचकांच्या मनाला चटका लावून जाते. अनुपमा आणि आनंद यांच्या प्रेमाची, विभक्तीची हि कथा महाश्वेता मधून हळुवारपणे उलगडत जाते. 

स्त्री कितीही पुढारलेली असली तरी काही सामाजिक बंधनांपुढे आजही तिची पिळवणूक होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सुशिक्षित डॉक्टरची पत्नी असूनदेखील अनुपमा याला अपवाद ठरत नाही. पायावर एक पांढरा डाग ज्याला आपण कोड म्हणतो तो उठल्यामुळे तिच्या आयुष्याची सगळी चक्र उलटी फिरू लागतात. अनुपमाच्या प्रेमात वेडा होऊन सगळ्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊन आनंद तिच्याशी लग्न करतो. लग्नानंतर त्याला काही कारणास्तव परदेशात जावं लागतं, त्याचवेळी आनंदच्या आईला अनुपमाच्या पायाला असलेल्या डागाबद्दल समजतं. अंगावर पांढरा डाग असणं म्हणजे अभद्रपणाचं लक्षण असून आनंदाची आई अनुपमाला तिच्या वडिलांकडे गावी नेऊन सोडते. समाजाने आपल्याला इतकं नाकारावं असा आपल्यात काय बदल झाला या भावनेतून अनुपमात न्यूनता निर्माण होऊ लागते. 

शिक्षणाचं पाठबळ असलेली अनुपमा या न्यूनतेच्या गर्तेत स्वतःला हरवून बसते का? कि ह्या सगळ्यातून मार्ग काढत ती आपलं स्वतंत्र अवकाश उभारत उंच भरारी घेते? आनंदच पुढं काय होतं? आपल्या आईच्या निर्णयाला आव्हान देण्याची ताकद त्याच्यात असते का? डॉक्टर असून देखील कोड हा केवळ एक चर्मरोग असून अभद्रपणा नाही हे समजून घेण्यात तो यशस्वी होतो कि अपयशी ठरतो? असे अनेक प्रश्न या कथेच्या निमित्ताने वाचकांच्या मनात उपस्थित होऊ शकतात. "महाश्वेता" मधून या सगळ्याची सविस्तर उत्तरे सुधा मूर्ती आपल्याला देऊन टाकतात. कथेला मिळत गेलेलं योग्य वळण आणि समर्पक असा शेवट हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. कुठल्याही क्षणी ती भरकटल्यासारखी वाटत नाही. 

एका महत्वाच्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्यात लेखिका यशस्वी झाली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्या चर्मरोगाने त्रासलेल्या स्त्री व पुरुष दोघांच्या आयुष्याला यानिमित्ताने उभारी देण्याचं काम लेखिकेने केलं आहे. कन्नड भाषेत उत्तम प्रतिसाद मिळालेलं हे पुस्तक मराठीमध्ये देखील उपलब्ध असल्यामुळे मराठी वाचकांसाठी हि एक पर्वणीच आहे. छोटेखानी परंतु प्रभावी असं हे पुस्तक तुम्ही नक्की वाचून बघा आणि तुम्हाला ते कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमधून कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form