पुस्तक | माचीवरला बुधा | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ११२ | मूल्यांकन | ४.२ | ५ |
आपल्या उतारवयात मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्याला कंटाळून, पुन्हा आपल्या पूर्वजांची नाळ असणाऱ्या आपल्या वाड-वडीलांच्या परंपरागत जमीनीत जाऊन पुन्हा एकदा मोकळा श्वास घ्यावा म्हणून कादंबरीचा नायक "बुधा", राजमाची किल्ल्यावरच्या ट्येमलयीच्या पठारावर जाऊन पुन्हा राहायला लागतो. हीच पुस्तकाची कथा आहे. पण कथा जरी एवढीच असली तरी ती पुस्तक वाचताना प्रत्येक ओळीला एक एक अनुभव डोळ्यांसमोर घडण्याची अनुभूती देते.
"माचीवरला बुधा" हे पुस्तक वाचताना गोनीदांचच आत्मवृत्त वाचतोय की काय असं वाटतं. गोनीदांनी तितकंच त्या पुस्तकाला जिवंत केलं आहे. अतिशय मोजकी पात्र. आणि त्या पात्रातही निसर्ग पात्रच प्रमुख. बुधाच्या अवतीभवती असणारी निसर्गरम्य वातावरणाचीच पात्र झाली, कथा पुढे सरकत गेली. एकाच ठिकाणचं वर्णन अनेक प्रकारे आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि पुस्तक सुंदर होत जाईल. लिखाणाची शैली वेगळी आहे, ती अप्पांच्या अनुभवसिद्ध हातांची आहे. ती तुम्हाला भुरळ पाडेल यात शंका नाही. पण या पुस्तकाचा नायक डोळयात फुल पडलेला बुधा, आणि त्याची निसर्गाकडे पाहण्याची नजर तुम्हाला समृद्ध करेल.
उतारवयातील बुधा माचीवर आला. त्याने जुनी जमीन पुन्हा कसली. भाताची लागवड झाली. सोबतीला कुत्रा आला. खारुताई व तिची पिलावळ आली. चिमण्या आल्या.. झाडं आली.. हळू हळु वाढत जाणारा बुधाचा गोतावळा आपल्याला भुरळ घालतो. आपणाला त्याचं अप्रूप वाटतं, त्या कथेत आपण बुधासोबत अडकून जातो. अचानक येणाऱ्या म्हशीने.. सगळं बदलत जातं. मनास पुस्तक एक गोडी लाऊन जातं.
गोनीदा आणि त्यांची लेखणी सर्वपरिचित आहेच. त्यामुळे तुम्हाला पुस्तक आवडेल ही खात्रीच आहे. तुम्ही एकदा वाचून.. आम्हाला नक्की तुमचा या पुस्तकाचा अनुभव कळवा.