पुस्तक | कृष्णवेध | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २६९ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
कृष्ण म्हटलं कि आपल्याला त्याच्या बालक्रीडा, खट्याळपणा, गोकुळ इत्यादी गोष्टी आठवतात. कृष्ण म्हटलं कि आठवते यशोदा, राधा, देवकी वगैरे वगैरे. आजही कृष्ण नावाने करोडो लोकांना भुरळ घातली आहे. बहुतेक हे वेडच असं असावं कि त्यातून भक्तीरस आपोआप माणसांच्या मनात खोलवर स्रवत असावा. त्याच्या सानिध्यात आलेल्या कित्येक जिवांचं जीवन त्याने सार्थकी लावलं आहे. असेच काहीसे वेध गोनीदांना लागले असावेत म्हणूनच कि काय त्यांनी कृष्णवेध ह्या कादंबरीचा घाट घातला असावा.
कृष्ण जीवनाशी निगडित असलेले राधिका, पेंद्या आणि कुब्जा यांच्याविषयी लीळाचरित्रात व इतरत्र कुठे जी काही माहिती उपलब्ध होती; त्या माहितीच्या जीवावर गोनीदांनी हि कादंबरी लिहली आहे. तीन चरित्रांचे दर्शन घडवताना कृष्णजीवनातले अनेक बारकावे देखील या पुस्तकात लेखकाने वाचकांसमोर मांडले आहेत. राधिका पासून सुरु होणारी हि चरित्रकथा कुब्जापाशी येऊन जरी थांबत असली तरी वाचकांसाठी ती तिथेच थांबते असं मला वाटत नाही. आपणही कृष्णलाटेवर काही काळ तरंगत राहतो याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः उपभोगला आहे.
आपल्याला ठाऊक असलेली प्रेयसी राधा आणि गोनीदांनी रेखाटलेली राधिका कदाचित वेगळी असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला त्यात साम्यही आढळू शकतं. राधिकेच्या वयाच्या निकषावर व गोनीदांनी रचलेल्या चरित्रगुणांवर मी ह्या निष्कर्षाला पोहोचलो आहे. तेवढं सोडता राधिकेची कृष्णप्रीती आपल्यासमोर सादर करताना गोनीदांनी कसलीही कसर सोडलेली नाही. कृष्णप्रीतीमध्ये वेडावलेली राधिका आपल्याला इथे भेटल्यानंतर गोनीदा आपली ओळख पेंद्यासोबत करून देतात. लहानग्या कृष्णाला छोट्या छोट्या गोष्टी शिकवणारा पेंद्या, सगळ्यांची थट्टा करणारा पेंद्या कधी आणि कसा कृष्णमय होऊन जातो याची रोचक कहाणी या चरित्रात आपण वाचू शकतो. सगळ्यांनी दूर केलेली, विद्रुप रुपामुळे लाथाडलेली कुब्जा कृष्णभक्तीमुळे सगळ्या त्रासातून मुक्त होत शेवटी अकलंक शांती प्राप्त करते. अशा या तीनही चरित्रांमधून कृष्णाचे विविधांगी दर्शन आपल्याला गोनीदांनी करवले आहे.
तुम्ही कृष्णाचे झालात कि कृष्ण तुमचा झालाच म्हणून समजा; असाच काहीसा संदेश कृष्णवेध मधून आपल्याला गोनीदांनी दिला आहे. गोनीदांचं भाषेवर असणारं प्रभुत्व, समकालीन पात्र हुबेहूब उभी करण्याची शैली तुम्हाला या पुस्तकातही अनुभवायला मिळेल. सर्व भारतीयांचा जिव्हाळयाचा विषय असलेला कृष्ण गोनीदांच्या नजरेतून वाचण्यासाठी "कृष्णवेध" वाचून बघा. माझ्या तोंडून इतकं ऐकल्यावर कदाचित तुम्हालाही कृष्णवेध लागले असतील तर कृष्णार्पण होण्याची हि संधी अजिबात न गमावता तुम्ही कृष्णवेध वाचायला घ्या. आणि त्यातून तुम्हाला प्राप्त झालेला कृष्णगंध आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.