पुस्तक | क्रौंचवध | लेखक | वि. स. खांडेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २४४ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
प्रेम ही एक उत्कट भावना आहे. त्याबद्दल जाणून घ्यायला, त्याबद्दल वाचायला अनेकांना आवडतं. खास त्यांच्यासाठी ही कादंबरी आहे. "वि. स. खांडेकर" म्हटलं की डोळ्यांसमोर अनेक गोष्टी आल्यावाचून रहात नाहीत. त्यात प्रेमाबद्दल त्यांची कल्पना, सुंदर वाक्य, अनेक विचार मनात रुजवणारी पल्लेदार वाक्य आणि पदोपदी त्यांना असणारा निसर्गाचा उदाहरणादाखल संबोध. वाक्य नि वाक्य मनात साठवून ठेवावं अस वाटतं. प्रत्येक कादंबरीतून त्यांनी फुलवलेली प्रीती मनाला नेहमी अचंबित करून टाकते. त्यांचं तत्वज्ञान आणि त्यातील तर्कशुध्द वाद विवाद कधीच कालबाह्य वाटतं नाहीत. म्हणून मला हे पुस्तक वाचताना अनेक नवीन गोष्टी कशा नजरेस येत आहेत याची ओढ शेवटपर्यंत लागूनच राहिली.
सुलू, दिनकर, दादा, भगवंतराव या मोजक्या पात्रांवरच हे पुस्तक आधारित आहे, पण हो याचा आवाका मात्र नक्कीच मोजका नाही. अतिशय सुंदर प्रेमाची कल्पना यातून अनुभवायला मिळते. आणि प्रेमाचे सारे रंग पाहायला मिळतात. आई मुलाचं.. बापा मुलीचं.. पती पत्नीचं.. प्रियकराचं.. आणि मातृभूमीचं सुध्दा! त्यातली प्रत्येक बारीक छटा लेखकाने अत्यंत बारीक अभ्यास करून मांडली आहे अस वाटतं. आपण पुस्तकात अडकायला लागलो की पुस्तक नवीन वळण घेते. नवीन गोष्टी समोर येतात याने पुस्तकाची रंगत अजूनच वाढते. सोबत राहूनही आयुष्यभरासाठी सोबत राहू की नाही माहित नसताना देखील मनातून फुलणारे प्रेम त्यावरची सगळ्यांची मतं याचा सुंदर मेळ जमून आलं आहे. आणि पळा पळाला क्रौंच पक्षाचे ते जोडपे त्याचा झालेला वध, आणि त्या एका प्रसंगाचे प्रत्येक बाजूने, निर निराळ्या अंगाने दर्शन हे एक बुध्दीला सतत भेडसावत राहणारे संदर्भ आहेत.
बघता बघता कधी प्रेमाचं रूपांतर चळवळीत झालं समजलंच नाही. आणि त्यात मांडलेली ती स्वातंत्र्यपूर्व कथा. त्या चळवळी, त्या सभा ते समाजाचं प्रतिबिंब आणि अशाच सगळ्यांतून घडत जाणारी ती सारी पात्र. लिहिलेल्या प्रत्येक वाक्याला अर्थ आहे. जर लगेच नाही सापडलं तरी ती लक्ष्यात ठेऊन गोष्ट पूर्ण करण्याची पद्धत मला खूप आवडली आणि त्यामुळे पुस्तक बघता बघता संपलं. सगळ्यांना आवडेल अशीच प्रेम कहाणी आहे. आणि पुस्तकाला "क्रौंचवध" हे नाव का ठेवले आहे हे तुम्हाला पाना गानिक समजतं जाईल आणि त्या नावाचा खुलासा होईल.
"प्रीती हे क्रांतीचेच दुसरे नाव आहे."
अशी सुंदर आणि मनमोहक वाक्य या पुस्तकाची खासियत म्हणता येयील. पण फक्त वाक्यच नाही तर त्याला असणारा निसर्गाचा दुजोरा त्या वक्यांना अजून पल्लेदार बनवतो. भवनाचा वेध घेण्यास मदत करतो. मला फारसे प्रेमकथा आवडत नाहीत.. कारण त्याच रटाळ गोष्टी असू शकतात. पण या कादंबरीत मला बिलकुल तो अनुभव आला नाही. मला आवडली आहेच, तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा!