पुस्तक | कोल्हाट्याचं पोर | लेखक | किशोर शांताबाई काळे |
---|---|---|---|
प्रकाशन | ग्रंथाली प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ११६ | मूल्यांकन | ४.४ | ५ |
आपण सगळे कोणत्या ना कोणत्या कारणाने वेगळे आहोत. हे वेगळेपण माणसाला जितकं प्रगल्भ बनवते, तितकेच त्याला खालीही खेचू शकते. हे वेगळेपण समाजनिर्मित, मानवनिर्मित तर कधी परिस्थितीनुरूप आलेल्या विविध बदलांमुळे येऊ शकते. अशाच एका आपल्यासारख्याच.. पण तरीही वेगळ्या.. समाजाने निर्माण केलेल्या चौकटीत न राहता, आपलं विश्व गवसू पाहणाऱ्या आणि पंख पसरून आभाळाकडे झेप घेत, स्वैर भरारी घेणाऱ्या नायकाची ही आत्मकथा आहे. त्यांचं नाव आहे किशोर शांताबाई काळे.
अनेकांना आश्चर्य वाटेल की, अरे यांचं नाव अस का असू शकेल? हा प्रश्न मलाही पडला होता. पण पुस्तक वाचताना समजू लागलं आणि अगदी गहिवरून आलं. मनात काहूर माजलं आपण किती आनंदात आहोत, आपलं आयुष्य किती सहजतेने जातंय, यासाठी देवाला धन्यवाद म्हणवे वाटले. पण त्यातलं काहीच बाकीच्यांना मिळत नाही याची खंत मनाला सतत बोचत राहील. कोल्हाटी समाजातील एका लहान मुलाची ही गोष्ट आहे.. ज्याला आपल्या बापाचं नावही माहीत नाही. तिथूनच पुढे आपण, आपली आई आणि शिक्षण यासाठी सतत आयुष्यभर झगडत राहिलेले ते पोर जेंव्हा डॉक्टर होते, तेंव्हा उर भरून येतो. पण त्यांनी सोसलेल्या त्या काळात, लेखकाची अवस्था काय झाली असेल, यावर सतत मनात एक प्रश्नरूपी टाचणी टोचत राहते आणि मनात अस्वस्थता पसरत जाते.
घरातील बिकट परिस्थिती, आईचं नाच-गाण्याच काम.. त्यातून समाजानं सतत डावलल्यामुळे जाणवणारा, एक दुजा भाव आणि अशातच शिक्षणाची आवड. या साऱ्याच एक मेतकूट या पुस्तकात वाचायला नक्की मिळेल. मनात अनेक प्रश्न उभे राहतील. समाजाची नवी बाजू आपल्या समोर उभी राहील आणि मन कशातच लागणार नाही. हे पुस्तक जितकं तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल त्याहून अधिक विचारांची आणि समाजाची एक मुंगी सतत चवल्याचा भास देत राहील. नक्की वाचा आणि जाणून घ्या की लेखकाच्या नावात "शांताबाई" का?
दलित साहित्य प्रकारात या पुस्तकाचं जे स्थान आहे, ते कोणालाही खोडून काढता येणार नाही. नक्की वाचावं असं पुस्तकं. तुम्ही देखी वाचून आम्हला तुमचं अभिप्राय नक्की कळवा.