पुस्तक | कौंतेय | लेखक | वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) |
---|---|---|---|
प्रकाशन | कॉन्टिनेन्टल प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ८३ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
अत्यंत नाट्यमय, अपमानित व आयुष्यभर लोकनिंदा सहन करावं लागणारं जीवन लाभलेला, परंतु तितक्याच सहनशीलतेने त्याला तोंड देणाऱ्या, महाभारतातील महारथी कर्णाच्या महागाथा अनेकांनी रंगवल्या आहेत. मृत्युंजय, राधेय सारख्या कलाकृतींमधून कर्णाची जीवन परिक्रमा रेखाटलेली आपण बहुदा वाचली असावी. त्यातून उलगडत गेलेला कर्ण अनेक अंगांनी मानवी जीवन भारावून टाकतो. त्याच कर्णाच्या जीवन संग्रामातील परमोच्च क्षण घेऊन वि.वा. शिरवाडकरांनी कौंतेय या नाटकाची सुरेख रचना केलेली आहे. अवघ्या ८३ पानांची कलाकृती मात्र त्यातील संवाद, शब्द, रचना यांनी वाचक पुरता तृप्त होऊन जातो. भीष्माचार्य व द्रोणाचार्य यांचा पाडाव झाल्यानंतर सेनापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालावी याने या नाटकाला सुरवात होते. तेच औचित्य साधून लांच्छनाचे अगणित बाण कुरुसभा कर्णावर चालवत असते. नीच कुलातील योध्याने उच्च कुलातील आर्यांचे नेतृत्व करावे ही बाब सभेला अमान्य असते. त्यातून घडणारी संवादांची देवाण घेवाण लेखकाने अचूक रेखाटली आहे. शेवटी शकुनीच्या युक्तिवादातून सर्वानुमते कर्णाचीच सेनापती म्हणून निवड होते.
ही बाब पांडव शिबिरात कळताच कुंतीच्या मातृ हृदयाची होणारी चलबिचल व त्यातून ऐन रात्री कर्णाची तिने घेतलेली भेट, त्यातून व्यक्त होणारे भाव, शिरवाडकर सूचक शब्दांत मांडतात. आई सापडल्या नंतरची प्राथमिक अन तितकीच स्वाभाविक भावना यातून व्यक्त होणारा कर्ण आणि इतक्या वर्षांनी जिला शोधत होतो तिला आपण क्रोध भावनेत नाही नाही ते बोललो म्हणून पस्तावणारा कर्ण, लेखकाने तितक्याच सहजपणे रेखाटला आहे.
कौरव, पांडव युद्धात नक्की कोण जिंकणार आणि परिणामी उद्याच्या जगात प्रत्येक योध्याची ठरणारी ओळख यावर लिहताना लेखक म्हणतो,
"इतिहास हा जेत्यांचा खुशमस्कर्या आणि पराभुतांचा निंदक असतो."
जिंकणाऱ्याची वाहवा आणि परभुताची निंदा हा जगतमान्य नियमच नाही का? जिंकणाऱ्याला शिरावर घेऊन नाचणारं जग आपणही भवताली पाहत नाही का? धर्म, अधर्म देखील विजयावरच ठरत नसावा का? कौंतेय वाचताना असे अनेक प्रश्न आपल्याला देखील पडतात.
कौंतेय ही काही कर्णाची विरगाथा वा पांडवांची विजयश्री रेखाटणारी कलाकृती नाही. आयुष्यभर आई बापाचा शोध घेत फिरणाऱ्या, उच्च कुळात जन्म होऊन देखील सतत उकिरड्यावरील किड्याची अवहेलना वाट्याला आलेल्या, सुतपुत्र म्हणून जगताना आपण राधेय देखील नाही या जाणिवेने विषण्ण झालेल्या, ऐन युद्धाच्या परमोच्च क्षणी आपण कौंतेय आहोत याची जाणीव होताच, मित्रद्रोह कि बंधुद्रोह या द्वंदात फसलेल्या एका महारथीची कथा आहे.
"शब्द ही एक गोष्ट अशी आहे की जिच्यावर शहाण्यांनी कधीही विश्वास ठेवू नये! अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यापेक्षा त्या लपवण्यासाठीच शब्दांचा उपयोग अधिक होतो."
अशा एक ना अनेक संवादानी हे नाटक खचाखच भरलेले आहे. एक दोन तासात सहज वाचून होणारी एक छोटेखानी परंतु भावविवश कथा वाचताना आपणच अनेक पात्र रंगमंचावर साकारत असल्याची भावना मनात आल्याशिवाय राहत नाही. अशी ही कर्ण जीवनावर रेखाटली गेलेली नाट्यकथा शिरवाडकरांनी मोजक्या व मार्मिक संवादांत मांडली आहे. तुम्हीही त्याचा आस्वाद घ्या अन तुम्हाला त्यातील भावलेलं पात्र अभिप्रायाद्वारे आम्हाला नक्की कळवा.
-© गिरीश अर्जुन खराबे.