पुस्तक | कंबोडायण: अद्भुत मंदिरे अफाट देश | लेखक | रवी वाळेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | कॉन्टिनेन्टल प्रकाशन | समीक्षण | कौस्तुभ पाटणकर |
पृष्ठसंख्या | ३१२ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
प्रवास कोणाला आवडत नाही.. आणि त्यातून भारतीय संस्कृतीशी नाळ जोडून असणारे, ऐतिहासीक बाजू असणारे देश, त्यातील मंदिरे.. त्याला असणारी कल्पकतेची आणि कलेची जोड नेहमीच आपल्याला एक अकस्मात आनंदाची अनुभूती देत असते. अश्याच एका प्रवासाची पर्वणी म्हणजे "कंबोडायण: अद्भुत मंदिरे अफाट देश". खमेर साम्राज्याच्या काळात भरभराटिला आलेला हा कंबोडिया थायलंडच्या बाजूला मकाँग नदीच्या प्रदेशात आहे. मंदिरांचा देश अशी ह्या देशाची ओळख. जगातले सर्वात मोठे असे प्राचीन हिंदु मंदिर ह्याच देशात आहे. अशा या अद्भुत देशाच्या सफरीचे तितकेच कमाल प्रवासवर्णन ह्या पुस्तकात केले आहे.
पुस्तकाची सुरवात होते ते लेखक "रवी वाळेकर" यांच्या कंबोडियाला जाण्याच्या उत्कट इच्छे पासून. तब्येतीची अनेक आव्हाने, अनंत अडचणी पार करत लेखक कसा कंबोडियाला पोहोचला इथून या प्रवासाचा श्रीगणेशा होतो. हे सगळे लेखकाने इतकं उत्कटपणे लिहिले आहे की ते आपल्याला फारच भावतं आणि जणू कंबोडिया आपल्याला खुणावू लागतो. लेखकाने पाहिलेल्या अंगकोर वाट, बेयॉन, बंते त्साय तसेच इतर अनेक मंदिराचे अतिशय सुंदर आणि चपखल वर्णन केले आहे. वर्णन करताना काही ठिकाणी स्थापत्य शास्त्रामधील बारकावे देखील सांगितले गेले आहेत. पण त्यात कुठेही रटाळपणा नाही, अत्यंत सध्या सोप्या आणि काहीश्या विनोदी शैली मध्ये हे सगळे वर्णन केलेले आहे, की लेखका सोबत आपण पण त्या मंदिरा मध्ये उभे आहोत असेच वाटते. प्रत्येक मंदिराचे विशेषत्व, बारकावे अतिशय सुरेखपणे नमूद केले आहेत. अंगकोर वाटचा सूर्योदय असो, की बेयॉनवर पाहिलेला सूर्यास्त किंवा तेथील प्रत्येक मंदिरात केलेले सुंदर कोरीव काम असो.. प्रत्येक गोष्टीचे अगदी इत्यंभूत वर्णन लेखकाने केले आहे.
कंबोडिया हा मंदिरांचा देश असल्यामुळे त्यांची माहिती या पुस्तकात असणे क्रमप्राप्तच होते पण त्याबरोबरच देशातील लोकजीवनाचे वर्णन देखील लेखक करतो. तेथील सामान्य लोकांचे जीवन, त्यांची उत्पनाची साधने, गरीबी, तेथील ग्रामीण भाग, याचसोबत सरकारी बाबुंची एकाधिकारशाही आणि अरेरावी, काही बाबतीतील तिथल्या सरकारची अनास्था या सगळ्यावर लेखकाने भाष्य केले आहे.
कोणताही प्रवास हा संस्मरणीय बनवतात, ती प्रवासात भेटलेली माणसं. अशीच काही विलक्षण माणसं या प्रवासात लेखकाला भेटली. बायको पळून गेल्यावर लहानग्या मुलीला एकटा सांभाळणारा त्यांचा टूक टूक चालक चाकी, फ्रान्स मधील आपला वैद्यकिय व्यवसाय सोडून या परक्या देशात रुग्णांची मोफत सेवा देणारे फ्रेंच डॉक्टर डॉमिनिक, ऑस्ट्रिया मधून येऊन सायकलवर कंबोडिया फिरणारी त्यांची रूम मेट, रस्त्यावर प्रत्येकाकडे एक डॉलर् भीक मागणारी ती गोंडस मुलगी, आपल्या घरातील मुलीच्या वाढदिवसाला लेखकाला बोलावणारं कंबोडियन कुटुंब, दुसऱ्या देशातून येऊन इथली हॉस्टेल चालवणारी मारिया.. हे सगळे प्रवासातील सोबती आपल्यावर प्रभाव टाकतात.
अगदी शेवटा पर्यंत थोडंसं मार्मिक व विनोदी वाटणार हे प्रवासवर्णन शेवटच्या टप्यात थोडं भावनिक होतं. कंबोडिया मध्ये १९७६ ते १९७९ च्या दरम्यान पोल पॉट नामक हुकूमशहा ने अनन्वित छळ मांडला होता, त्यामध्ये बळी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकांविषयी लेखक प्रवासवर्णनाच्या शेवटच्या भागात लिहितो. हे सर्व वर्णन आपल्याला अतिशय भावनिक करतात. आनंद, आश्चर्य, समाधान आणि दुःख आशा सगळ्या भावनांचा अनुभव देणारं कंबोडियाचं हे प्रवास वर्णन तुमच्या मनात त्या देशा बद्दल कुतूहल निर्माण करेल हे नक्की..!!
-© कौस्तुभ पाटणकर.