पुस्तक | जैत रे जैत | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | कॉन्टिनेन्टल प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १८३ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
महाराष्ट्र म्हणजे अनेक वेगवेगळे लोक, अनेक वेगवेगळे अनुभव आणि अनेक प्रकारे साहित्याच्या माध्यमातून अनेक लेखकांनी मांडलेली त्याची छबी आपल्याला सुखकर अनुभव देत असते. "गो.नी." हे त्याच वांशावळीतले असे मला वाटतं. निसर्गवर्णन, दुर्गभ्रमण, अनेक अपरिचित कथा आणि ताशीच अद्भुत लेखनशैली. मग ती कोकणची "शितू" असो.. की "मोगरा फुलला" असो... अथवा "दुर्गभ्रमणगाथा"... या सगळ्याच पुस्तकातून विविधांगी लेखणी आणि त्यातून येणारा प्रत्यय थक्क करणारा आहे.
"जैत रे जैत" ही गोनीदांची अशीच एक संकीर्ण कादंबरी. अनोखी कलाकृती. ठाकर लोकांच्या जीवनाचा एक लहानसा भाग इथे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सोबतच त्यांच्या प्रतिभेचं आणि कलेचं एक सुंदर दर्शन सांगडरूपी मांडलं आहे. यात अगदी जेमतेम चारच पात्र आहेत. यातील नायक नाग्या भगत आहे, कलावंत आहे. त्याची पत्नी, प्रेयसी चिंधी त्यावर जीवापाड प्रेम करत असते, त्यावर जीव उधळून टाकत असते. बापाने शिकवलेली आणि अंगात जन्मताच मिळालेली कला नाग्या अगदी सुंदर प्रकारे लोकांसोर मांडत आहे! त्याची देवावर भक्ती आहे, श्रद्धा आहे.
लिंगोबाच्या डोंगरकड्यावर लटकलेल्या एका मधाच्या पोळ्यातील राणी माशीने त्याचा डोळा फोडल्याने तो मनोमन दुखावतो, त्याच्या श्रद्धेला धक्का बसतो, आणि तो राणी माशीला हुसकावून लावण्याचा घाट घालतो. अशी एक अगदी लहान पण विलक्षण अनुभव देणारी कथा. उत्कट प्रेमकथा आणि सोबतच निसर्ग आणि माणूस यातील एक गोड नातं उलगडण्याचा प्रयत्न करणारी ही कादंबरी. गोनीदांच्या शब्दसामर्थ्याचा आणि कल्पक बुद्धीची एक आगळीवेगळी कलाकृती. मनास भुरळ घालणारी आणि गरीब, सामाजिक जाणिवेची एक हलकीशी झलक दाखवणारी कथा.
"जैत रे जैत" म्हणजे झालेला विजय... तो जैताचा क्षण येण्यासाठी झालेले सगळे कष्ट आणि कथेची मांडणी, कथेची जमेची बाजू आहे. त्याच सोबत या पुस्तकावर चित्रपट देखील आला होता. त्यातील प्रत्येक गाण्याने महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला आहे. मग ते गाणं कोणताही असो.. मी रात टाकली, लिंगोबाचा डोंगुर, जांभूळ पिकल्या झाडाखाली.. अशा बहुचर्चित गाण्यांनी चित्रपट देखील सर्वांचा लाडका झाला होता. मला ही प्रेमकथा खूप सुंदर वाटली, सहजतेने मनाला भावली आणि त्यात मी अडकून गेलो. १-२ तासात संपणारी पण मनाला अगदी खिळवून ठेवणारी ही कादंबरी सर्वांनी नक्की वाचावी! मला आवडलीच, तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा!