इत्रनामा - हिनाकौसर खान | Itranama - Heenakausar Khan | Marathi Book Review

इत्रनामा-हिनाकौसर-खान-Itranama-Heenakausar-Khan-Marathi-Book-Review
पुस्तक इत्रनामा लेखिका हिनाकौसर खान
प्रकाशन रोहन प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ३४० मूल्यांकन ४.३ | ५

तारुण्य आणि प्रेम नेहमीच एकमेकांच्या हातात हात घालून धावत असतं. प्रत्येकाने कधी ना कधी आयुष्यातल्या या भावनेला अनुभवलेलं असेलच! पण प्रेम झालं म्हणजे ते आयुष्यात मिळतच असं नाही. आपल्या इथे प्रेमाला अनेक परीक्षा द्याव्या लागतात अन त्यातून तावून सुलाखून जे बाहेर पडतं तेच या जगात टिकून राहतं. भारतासारख्या देशात प्रेम ही केवळ दोन माणसांमधली भावना असली तरी धर्म, जात, पंथ यांच्या बंधनात ती आजही अडकलेली आहे. दोन जीवांचा सोबत राहण्याचा निर्णय हा फक्त त्याच दोघांचा असला तरी खूप मोठ्या प्रमाणात त्यात समाजाची ढवळाढवळ आपल्याला पाहायला मिळते. प्रेमाच्या प्रवासात येणारे अडथळे, मानसिक चलबिचल, हरवण्याची भावना, हिरावण्याची भावना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेमात अपयशी होण्याची भावना यांनी अनेकांना छळलेल आहे. अशाच प्रकारच काहीसं कथानक "हिनाकौसर खान" यांच्या “इत्रनामा” मध्ये आपल्याला वाचायला मिळेल.

नाझिया, असद आणि सुमित या तीन मुख्य पात्रांभोवती फिरणारी ही कथा भावनांच्या अनेक पदरांमधून वाचकांपुढे उलगडत जाते. धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम करणारा सुमित आणि आपल्याच धर्मात लहानपणापासून सोबत वाढलेला असद यांच्यात समतोल साधण्यात एक नायिका म्हणून नाझिया यशस्वी झाली आहे असं मला वाटतं. हाडाची पत्रकार असलेली नाझिया मुळातच या सगळ्या भावनांच्या खेळातून स्वतःला अलिप्त ठेवत आपलं काम करत असते. कामाच्या निमित्ताने तिची सुमितसोबत ओळख होते. हळूहळू या ओळखीचं रूपांतर एका अनामिक ओढीत होतं आणि कथानक वेग धरू लागतं. सुरवातीला उद्धट वाटणारा सुमित नाझियाला आवडू लागतो, असदच तिच्यावर असणार प्रेम ठाऊक असूनही मैत्रीच्यापलीकडे ती जात नाही. याउलट सुमित मध्ये तिला आपला जीवनसाथी सापडल्याची जाणीव होते.

एके दिवशी अझरभाईंच्या घरी इफ्तार पार्टीला जमल्यानंतर तिथल्या मुस्लिम धाटणीच्या वातावरणात सुमितची घुसमट व्हायला सुरवात होते. नाझियाबद्दल असणाऱ्या भावनेमुळे कधीकाळी मुस्लिम व्हायला तयार असणारा सुमित हे सगळं पाहून हेलावून जातो. त्यातच असद आणि नाझियाची जवळीक त्याला बघवत नाही. असद आणि नाझिया या दोघांच्या नात्यात आपण उगीच आलो का? ही भावना त्याला टोचू लागते. एकंदरीतच रिलेशनशिपच्या तणावामुळे सुमितचा मानसिक तोल ढळू लागतो, आणि त्यातच नाझिया आणि सुमितच ब्रेकअप होतं. मानसिकरित्या गोंधळळेल्या सुमितला नाझिया समजून घेते का? की आयुष्याच्या सोयीनुसार ती असदसोबत जाते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही इत्रनामा वाचून बघा.

लेखिका स्वतः पत्रकार असल्यामुळे भाषेचा लहेजा उत्तम जमला आहे. पत्रकारितेचे अनेक पैलू या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जवळून पाहायला मिळतात. मित्रांचे संवाद, असदच्या कविता, सुमितचे वेडेपण आणि नाझियाचा समंजसपणा आपल्या शब्दांच्या प्रभावातून लेखिकेने उत्तमरित्या मांडले आहेत. एक सहजगत्या वाचून होणार पुस्तक सरतेशेवटी तुम्हाला आनंद देऊन जातं. या पुस्तकाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातल्या अनेक आठवणी मनाच्या पटलावर दाटून आल्यास नवल वाटता कामा नये. ह्या इत्रनामाचा सुगंध तुमच्या मनात दीर्घकाळ दरवळत राहील असं मला वाटतं; त्यामुळे हे पुस्तक तुम्ही वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form