पुस्तक | इकिगाई | लेखक | फ्रान्सिस मिरेलस, हेक्टर गार्सिया | प्रसाद ढापरे |
---|---|---|---|
प्रकाशन | मायमिरर पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १९२ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
रोजच्या धकाधकीच्या जीवनात दैनंदिन गोष्टी, कामे करताना तुम्हाला कंटाळा येतो का? जर येत असेल तर तो घालवण्यासाठी तुम्ही मोबाईल किंवा इंटरनेटचा आधार घेता का? आणि इतकं करूनही कंटाळा दूर व्हायला तुम्हाला खरंच मदत होते का? याच उत्तर जर नाही असेल तर तुम्हाला सतत उर्जावान, व्यस्त आणि आनंदी ठेवणारा, विनामूल्य सोबत राहणारा कोणी सोबती मिळाला तर? विश्वास नाही ना बसत? पण असा एक सोबती आपल्या आजूबाजूला, आपल्यामध्ये सतत वावरत असतो. तो तुमचा एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकतो. तुम्हाला उत्साही, कार्यरत राहायला मदत करेल. मुख्य म्हणजे तो तुम्हाला तुमच्या जीवनाचं नेमकं उद्दिष्ट शोधायला मदत करेल. जपानी भाषेत सांगायचं झालं तर तो तुमचा "इकिगाई" बनेल. अर्थपूर्ण जीवन असा या इकिगाई शब्दाचा अर्थ जपानी भाषेत सांगितला आहे.
जगभरातल्या लाखो लोकांनी गौरवलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक असणारं इकिगाई हे पुस्तक आपण नक्की वाचायला पाहिजे. आयुष्याच्या तणावात सुखाने जगण्याच्या अनेक पद्धती या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतील. दीर्घायुषी जगण्याची, निरोगी राहण्याची अनेक उदाहरणे यात आपल्याला वाचायला मिळतील. सगळ्यात जास्त दीर्घ आयुष्य जगलेल्या लोकांच्या तोंडून तुम्हाला ते ऐकायला मिळेल. जपानमधल्या काही बेटावरच्या चिरतरुण लोकांच्या मुलाखती घेऊन लेखकाने हे सगळे मार्ग आपल्या पर्यंत पोहोचवले आहेत. लोगोथेरपी, मोरीत थेरपी सारख्या पद्धती आपल्याला जगण्याचं रहस्य शोधायला मदत करतात. खाद्यसंस्कृती, व्यायामाचे प्रकार या सगळ्याचा आपल्या जीवनावर होणार परिणाम आपल्याला यातून वाचायला मिळेल. आपण जे खातो तेच आपण बनतो हा सृष्टीचा नियम आहे; असं आपण ऐकलं असेल. इकिगाई मधून नेमका याच गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सहजसोप्या पद्धतीने आत्मसात करण्यासारख्या अनेक कला तुम्हाला यातून नक्कीच अनुभवायला मिळतील. त्यातील बऱ्याचशा आपण वडिलधाऱ्यांकडून ऐकल्याही असतील. दीर्घायुष्याचे रहस्य उलगडताना ओगिमीमधे (जपानी शहर) राहणाऱ्या एका शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलेने सादर केलेली कविता वाचल्यावर तुम्हाला सहज कल्पना येईल कि आयुष्य किती सोप्पं आहे. जपानी बोलीभाषेतल्या त्या कवितेच्या काही ओळींचा अर्थ खाली देत आहे; त्यावरूनच संपूर्ण कवितेचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
"तुमची बोटं किती वयाची आहेत याची काळजी करू नका.
तुमच्या मेंदूच्या मदतीने आणि हातांच्या साहाय्याने काम करत रहा.
सतत कामामध्ये व्यस्त रहा आणि काम करत रहा.
शंभर वर्ष तुमच्या दिशेने चालत येतील."
सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी तुम्ही नक्की हे पुस्तक संग्रही बाळगू शकता. सहज सोपी भाषा, समजावून सांगण्याच्या पद्धती, संवादातून उलगडत जाणाऱ्या लघु कथा अशा अनेक जमेच्या बाजू या पुस्तकाला लाभल्या आहेत. एका बैठकीत वाचून होण्याजोगं व पुन्हा पुन्हा वाचत राहण्यासारखं हे पुस्तक सगळ्यांनी वाचायला हवं; असं मला वाटतं. आपल्या जवळच्या माणसांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी तुम्ही हे पुस्तक त्यांना भेटही देऊ शकता. तुम्हाला तुमचा इकिगाई शोधायला मदत झाली का? त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला ते आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.
-© गिरीश अर्जुन खराबे.