पुस्तक | दुनिया तुला विसरेल | लेखक | व. पु. काळे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ६८ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
"जिंदादिली" म्हणजे नक्की काय? शायरी मधे किती आणि काय काय असू शकतं? मराठी संस्कृतीत झालेले संस्कार आणि त्यातून निपजलेली कविता शायरी पहायची असेल तर भाऊसाहेब पाटणकरांची शायरी आपण एकदातरी नक्कीच वाचली पाहिजे, त्या मैफलीचा एकदातरी आस्वाद घेतलाच पाहिजे. आयुष्याची वाटचाल फक्त आखून दिलेल्या चौकटीतून न करता, स्वतःच्या मनाप्रमाणे, लयलूट करून आणि प्रत्येक विषयाची मजा घेत आयुष्य जगणारे भाऊसाहेब आणि त्यांच्या शायरीचे रसग्रहण करणारे वपु काळे, दोघेही उत्तुंग व्यक्तिमत्व. वपुंच्या लेखणीतून वावांची मैफल पाहणे म्हणजे एक मोहत्सवच!
कोणत्याही कवितेचा अर्थ समजून घेणे त्यावर काहीतरी अजुन लिहिणे ही जितकी सोपी तितकीच अवघड गोष्ट आहे. आणि त्यात वा. वा. पाटणकर यांच्यासारखे रसिक ज्यांनी आयुष्याला लोलकाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून निरखून त्यावर स्वतःच्या एका मिश्किल आणि बेफिकीरीने केलेली शायरी व प्रत्येक वळणाला एक एक खट्याळ पण स्वतःशी प्रामाणिक वृत्तीतून लीहलेल्या कवितेची मीमांसा आणि रसग्रहण म्हणजे खूप अवघड काम. पण वपुंच्या विचारांनी अनेक पैलू अगदी अलगद समजावले आहेत. संदर्भ स्पष्ट केले आहेत.
पुस्तक वाचताना आपण स्वतः भाऊसाहेबांच्या मैफलीत बसलो आहे असा भास होतो, त्याला वपुंच्या सुरेख आवाजात साथ ऐकू येते आणि पुस्तक खुलत जातं. एक एक शेर डोक्यात बसून राहतो. त्यामागची भूमिका लक्षात येते आणि आपण आधी हे का वाचलं नाही अशीही मनाला चुटूक लागून जाते. अगदीच छोटेखानी पुस्तक आहे त्यात निवडलेले शेरदेखील भाऊसाहेबांनी मैफल आणि त्यातील एक भववस्था दर्शवणारे आहेत. त्यामुळे काही अंशी आपल्याल ती मैफल जगता येते.
ज्यांना भाऊसाहेबांनी गाजवलेल्या आणि कब्जा केलेल्या मैफली पुन्हा अनुभवायचा असतील त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचा. "दुनिया तुला विसरेल" असे नाव असेल तरी देखील हा संपुर्ण शेर मात्र तुम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि हे पुस्तकही नाही. मला हे पुस्तक मराठी ढंगाच्या शायरी यामुळे खुप आवडलं, तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा! यातली मला आवडणारी भाऊसाहेबांनी एक शायरी मी खाली देत आहे. या कारणास्तव तरी तुम्ही पुस्तक नक्की घ्याल!
"जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी
कीर्तने सारीकडे, चोहीकडे ज्ञानेश्वरी..
काळजी अमुच्या हिताची एवढी वाहू नका
जाऊ सुखे नरकात आम्ही, तेथे तरी येऊ नका"