पुस्तक | डिजिटल मार्केटिंग | लेखक | शुभम मेदनकर |
---|---|---|---|
प्रकाशन | न्यू ईरा पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १९६ | मूल्यांकन | ४.४ | ५ |
"डिजिटल मार्केटिंग".. हा शब्द कोणाला माहीत नाही? सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्तीला, आपलं स्वतःचं अस्तित्व असावं असं वाटतं असतं. त्यासाठी शिक्षण.. प्रशिक्षण.. आणि व्यवसाय.. याची महिती असणं.. त्यातील ज्ञान असणं.. आणि त्या ज्ञानाची योग्य प्रकारे केली गेलेली अंमलबजावणीच तुम्हाला चौकटी बाहेरचं विश्व दाखवू शकेल. त्यासाठी तुम्हाला फक्त उत्पादकता.. उद्योग क्षेत्र महिती असून उपयोग नाही. त्याचसोबत, आपला उद्योग सर्वांपर्यंत पोहोचवता येणे हेही, विक्रीसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याचसोबत त्याच्या हातात हात घालून येणारी मार्केटिंग (विक्रीकला) शिकणे आणि समजून घेणे महत्वाचे ठरते. म्हणूनच डिजिटल युगात ही कला अवगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचा उद्योग तर वाढवू शकताच... पण फक्त तेवढेच नाही.. त्याचसोबत तुम्हाला नोकरीच्याही अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
याआधी मराठी भाषेत अश्या प्रकाराची पुस्तकं उपलब्ध नव्हती. त्यामुळे भाषेचे बंधन तुमच्या व्यवसायाच्या आड येण्याची शक्यता होती. परंतू आता "शुभम मेदनकर" यांच्या निरिक्षणातून आणि अनुभवातून साकार झालेलं हे पुस्तक, अनेक मराठी भाषिक व्यक्तींसाठी एक मैलाचा दगड आहे.
या पुस्तकांत लेखकाने अगदी सोप्या पद्धतीने, मार्केटिंगचे अनेक पैलू आपल्यासमोर मांडले आहेत. मार्केटिंगची बाराखडी महिती असणं आवश्यक आहेच, पण ते ज्ञान कसं वापरावं हेही लेखकाने इथे व्यवस्थित नमूद केलं आहे. या क्षेत्रासंदर्भात माहिती.. त्यात असणारी स्पर्धा.. ग्राहकांची मानसिकता.. ग्राहकांच्या गरजा.. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग.. आणि यात सगळ्यात मोठा वाटा असणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. लेखकाने असे अगदी बारीक बारीक विषय.. तुमच्यापर्यंत सूक्ष्म निरीक्षणाच्या जोरावर पोहचवले आहेत. त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. त्यातून आपल्याला पुस्तकाचा फायदा करून घेता येतो.
नवीन पिढीने.. प्रत्येक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणाने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे.. नुसतेच संग्रही ठेऊन उपयोग नाही.. इत्यंभूत वाचावे.. आणि समजून त्याची अंमलबजावणी करावी.. असे मला वाटते. तुम्ही हे पुस्तक आधीच वाचले असेल तर तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. आणि वाचले नसेल तर आत्ताच एक नवीन विषय तुम्हाला साद घालत आहे.. तेही आपल्या मायबोली मराठी भाषेत.