पुस्तक | चष्मे बुद्दू | लेखक | अविनाश चिकटे |
---|---|---|---|
प्रकाशन | राईट फ्लाईट बुक्स | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ११८ | मूल्यांकन | ४.२ | ५ |
पुस्तक हातात आलं की, आधी मनात अनेक विचार चालू असतात. कसं असेल काय असेल? आपण आपलं मत बनवायला सुरवात करतो पहिल्या दोन तीन गोष्टींवरून. मुखपृष्ठ व त्यावरची चित्र, मागील सारांश आणि नाव. आणि माझंही तसच झालं! पुस्तकाचं नाव "चष्मे बुद्दू" त्यावर नमूद आहे विनोदी कथासंग्रह. त्यावर अतीशय छान असे चित्र रेखाटेलेले आहे जे साजेसं आहे नावाला आणि पुस्तकाला. आणि मागील बाजूस पुस्तकांची थोडक्यात माहिती सांगितली आहे.
आपल्याला नावावरून अंदाज आलाच असेल हे पुस्तक एक हलकं फुलकं विनोदी कथांची मेजवानी आहे. लेखक "अविनाश चिकटे" हे वायुसेनेत होते आणि त्यांनी त्यांच्याशी निगडित अशा काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट यामधे एक रोजच्याच आपल्या जगण्यातल काही, काही आपल्यासोबत घडत आलेलं आणि काही आपल्या नकळत आपल्यासोबत घडत आहे अशा गोष्टीची एक कथा अगदीच उत्तम आणि साध्या शब्दात मांडली आहे. यातील अनेक कथा आपल्यासोबतही घडत असतातच म्हणून आपण देखील अनेकदा पुस्तक वाचताना होकारार्थी मान डोलावतो. आपल्यालाही समाजातील अशा अनेक गोष्टी दिसत असतातचं, त्या लेखकाच्या नजरेतून पाहताना छान वाटतं.
साधी भाषा, रोजचेच प्रश्न आणि आपल्याला अनेक लोक कसे पडद्याआड ठेवतात किंवा आपणच कसे या जाळ्यात अडकत आहोत याची एक मिश्किल झलक हसत हसत आपले डोळे उघडेल. मला हे पुस्तक आवडलं याचं कारणच यातला साधेपणा आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर आपणही लक्ष्य द्यायला हवं असं वाटायला लागलं आहे मला. मी हे पुस्तकं खास प्रवासासाठी आहे असच सांगेल. प्रवासात आपल्याला आनंदी ठेवत वेगवेगळया प्रकारच्या गोष्टी आणि वेगवेगळी माणसं या पुस्तकातून मिळतील अस मला वाटतं.
पुस्तकात सर्व विषयांवर भाष्य केलेलं आहे. सिनेमा असो, समाजकारण(राजकारण), घर, दवाखाना, परदेश दौरा अशा एकूण बारा लहान कथा आहेत. त्याला साजेशी अशी चित्रही आहेत. मी हे पुस्तक पुढे देखिल प्रवासात घेऊनच जाणार आहे. वायुसेनेतल्या एका माणसाचा हा मिश्किल चष्मा माझ्यासाठी एक छान आकाश मार्ग मोकळा करत होता. अनेक धूसर गोष्टी हसत स्पष्ट होत आहेत. सगळ्यांनीच नक्की वाचावं अस पुस्तक आहे.