पुस्तक | आयुष्याचे धडे गिरवताना | लेखिका | सुधा मुर्ती | लीना सोहोनी |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २१२ | मूल्यांकन | ४.१ | ५ |
"आयुष्याचे धडे गिरवताना" हे पुस्तक वीसहून अधिक लहान-लहान गोष्टींचा, एक रंजक आणि वळणदार स्त्रोत आहे. अगदी साधी, सोपी आणि सरळ भाषा. नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती या जेंव्हा इन्फोसिस फाऊंडेशनच्या मदतीने, समाजासाठी काम करत होत्या, त्यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या लहान-सहान घटना, त्यांना भेटलेली अनेक प्रकारची, विविध ढंगाची माणसं, आणि त्यांचे स्वभाव, त्यातून निर्माण होणारे अनेक प्रसंग हे सर्व लेखिकेने अगदी उत्तम टिपले आहेत. मूळ इंग्रजी भाषेत असलेले 'The Day I Stopped Drinking Milk' या पुस्तकाला लीना सोहोनी यांनी अगदी व्यवस्थित आणि साजेसा असा अनुवाद केला आहे.
पुस्तकातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काही देऊन जाते. काही कथा मनाला हळवं करतात.. तर काही उस्फुर्त आनंद, काही खिन्न तर काही कुतुहलाने विचार करायला भाग पाडतात. प्रत्येक कथेला तिचे स्वतःचे असे एक वेगळे अंग आहे. यातील अनेक गोष्टी आपल्याला जीवनाची जाणीव करून देतात. आपल्याही नकळत आपण आपल्या सोबत घडणाऱ्या घटनाशी त्याची जुळवाजुळव करतो, लोकांना पडताळतो आणि कुठेरी एक समान धागा शोधतो. आपल्याला नाविन्याची कास मिळाली असे वाटायला लागते. हे या पुस्तकाचे सामर्थ्य आहे.. गुपित आहे असं म्हणू शकतो. आणि तरीही काहीतरी उणिव जानवतेच.
प्रत्येकच कथा तुम्हाला आवडेल, असं आश्वासन मी देऊ शकत नाही. काही कथा अगदी उत्तम गुंफल्या आहेत, परंतु काही कथा जराश्या निरास वाटू शकतात. त्यामुळे माझे या पुस्तकाबद्दल मिश्रित असे मत आहे. सुधा मुर्ती यांनी त्यात वेगवेगळी ठिकाणं, माणसं आणि विचार एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.