पुस्तक | अग्निपर्व | लेखक | मयुर खोपेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | न्यू एरा पब्लिकेशन हाऊस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २६८ | मूल्यांकन | ३.७ | ५ |
प्रत्येक पुस्तकाची कहाणी ही वेगळी असते. अशीच एक स्वातंत्र्यपूर्व घटना दर्शवणारी एक कादंबरी म्हणजे मयुर खोपेकर लिखित "अग्निपर्व". शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा आणि गोष्टी लहानपणापासून आपल्या आजोबांकडून ऐकून मोठया झालेल्या "सदा"ची ही गोष्ट आहे. त्याच्याच विचारातून ही कथा पुढे जाते. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने काम करत असताना, त्यांच्याच विरुद्ध मनात सलत असणाऱ्या सर्व गोष्टीतून ही कथा उभी रहाते. शिवरायांच्या शिकवणीतून पुढं जाणारं हे पुस्तक तुम्हाला कथेत गुंतवून ठेवते.
पुस्तकात वाचायला मिळणारी वर्णनं अगदी लाघवी आहेत. शहरी आणि ग्रामीण अश्या दोन्ही भागाचा प्रभाव या कादंबरीवर दिसतो. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणारं शिवरायांचं रेखाटन, आणि त्या मागची कथा, शेवटी आपल्याला उलघडते. प्रत्येक वेळेची बारीक माहिती आपल्याला पुस्तकात गुंतवून ठेवते. आपल्याला कथा माहिती आहे असं वाटत राहतं आणि तशातच प्रत्येक वेळी ती वेगळं वळण घेते. संपुर्ण पुस्तक हे नायकाच्या (सदाच्या) भावविश्वाचा एक धावता आराखडा आहे. पात्रांची हालचाल देखील त्याच अनुषंगाने होते.
स्वराज्य.. ते.. स्वातंत्र्य! या मधल्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात घडणारी ही कथा. एका खेड्यातील तरुणाच्या आयुष्याचं बदलतं चित्र आहे. इंग्रज आणि त्यांची विचारशैली. त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि खेड्यात उमटणारे त्याचे पडसाद या पुस्तकांत लेखकाने बारकाईने टिपले आहेत. आणि यात सगळ्यांत हेलकावे खाणारा नायक कसा पुढे प्रवास करतो हे वाचण्याजोगे आहे.
प्रवासात किंवा मोकळ्या वेळात वाचावे असे पुस्तक आहे. रायगडाचा संक्षिप्त इतिहास या पुस्तकात आहे अस मला वाटतं. ज्याने रायगड पाहायला आहे त्याला ते जाणवेल देखिल. तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर, तुम्हाला कसं वाटलं, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.