आभाळमाया - अस्मिता मराठे | Abhalmaya - Asmita Marathe | Marathi Book Review

आभाळमाया-अस्मिता-मराठे-Abhalmaya-Asmita-Marathe-Marathi-Book-Reviews
पुस्तक आभाळमाया कवयत्री अस्मिता मराठे
प्रकाशन यशोदीप पब्लिकेशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ९६ मूल्यांकन ४.२ | ५

मला सगळयात जास्ती आवडणारा साहित्य प्रकार म्हणजे कविता, त्याचं कारण देखिल तसच आहे. कविता ही एक अगदीच कमी शब्दात, साचेबद्ध पणाने आपल्याला हवा तो संदेश इतरांपर्यंत पोहचवण्याचे एक माध्यम आहे. यात साचेबद्धता महत्वाची तर असतेच पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे असते ते म्हणजे त्यातून दिला जाणारा संदेश! मग बाकी कवितांचेही पुढे अनेक उपप्रकार आहेत. छंद, मुक्त, गझल, ओवी, बालगीत.. आणि असेच इतरही.

आभाळमाया हे पुस्तक माझ्या हाती आले आणि मी चकितच झालो, एका १६-१७ वर्षाच्या मुलीचा हा दुसरा काव्यसंग्रह! यात एक मुक्त कविता सोडली तर बाकी सगळ्याच छंदात लिहिलेल्या आहेत. एकूण ७४ कवितांचा हा खजिना अनेक वेगवेगळया ढंगातून हाताळला आहे. आपल्या मातीची मशागत करणाऱ्या बळीराजाला अर्पण केलेला हा काव्यसंग्रह आहे. त्याचसोबत अनेक भवनाचे या कवितांमधून आपल्याला दर्शन होते.

"रानावनात मनात, काळजात पाणी पाणी"

या सारखी ओळ आपल्या डोळ्यांसमोर देशातील अनेक शेतकऱ्यांचे होत असणारे हाल, त्यांच्यावर येणारी संकटे अचानक पुढ्यात आणून ठेवतात.

"निळ्या पाण्याचा आरसा, त्याला चांदणी झालर

काळ्या नभा लावू तीट, ती देखणी चंद्रकोर"

हे असे रात्रीचे वर्णन अनेक अर्थांनी आपल्याला साहित्याचा एक उत्तम नमुना म्हणून बघता येतो.

हीच या पुस्तकाची मजा आहे. कविता म्हटल की चिंतन आलच. प्रत्येक कवितेला वेळ देऊन त्यातून त्याचा मुळ गाभा समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. या पुस्तकात अशा अनेक कविता आहेत ज्या आपल्याला प्रश्न विचारतील, "गणपती बाप्पा" ला विचारलेला प्रश्न तुम्हाला खरचं त्रास देत राहतो. समाजाचा एक भाग असताना त्यात समोर असणारे संकट, त्यात समोर दिसणारी अनेक परिस्थितीउत्पन्न शंका, प्रश्न आणि त्यांना आपल्या एका वेगळ्या शैलीने मांडण्याचा प्रयत्न, कवयत्री "अस्मिता मराठे" हिने केला आहे.

अनेक प्रकारे समृद्ध करणारा हा काव्यसंग्रह आहे. आणि याला लाभलेली "श्रीपाल सबनीस" यांची प्रस्तावना देखील अगदीच योग्य आणि चोख आहे. तुम्हाला कविता आवडत असतील तर नक्की वाचा एकदा "आभाळमाया".

-© अक्षय सतीश गुधाटे.

1 Comments

Previous Post Next Post

Contact Form