झेन गार्डन - मिलिंद बोकील | Zen Garden - Milind Bokil | Marathi Book Review

झेन-गार्डन-मिलिंद-बोकील-Zen-Garden-Milind-Bokil-Marathi-Book-Reviews
पुस्तक झेन गार्डन लेखक मिलिंद बोकील
प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या २३२ मूल्यांकन ४.५ | 

मिलिंद बोकील म्हटलं की आपल्याला आठवते ती शाळा कादंबरी परंतु मानवी भावभावनांसोबत सामाजिक प्रश्न, समस्या यांची जाण समोर ठेवून त्यांनी कथासंग्रहही लिहिले आहेत. तळागाळातील समाज आणि त्यांच्या समस्यांचे विसंगत दर्शन त्यांनी आपल्या कथांमधून मांडले. झेन गार्डन हा बोकीलांचा दुसरा कथासंग्रह, यातील अनेक कथा संग्रहातून वाचकांपर्यंत पोहोचण्याआधी दिवाळी अंकातून पूर्वप्रसिद्ध झाल्या आहेत. एकूण आठ कथांच्या एकत्रीकरणातून झेन गार्डन हा संग्रह प्रकाशित झाला आहे.

“यंत्र” पासून सुरू होणाऱ्या कथा “झेन गार्डन” पाशी येऊन थांबतात. मात्र झेन गार्डनला पोहोचण्याआधी तुम्ही “अधिष्ठान” मधल्या गायत्री ला भेटता. स्त्रीच्या आयुष्याला जवळून पाहताना, संघर्षातून संकल्पाकडे वळणारी दृढ गायत्री आपल्याला खूप काही शिकवून जाते. आदिवासी पाड्याच्या प्रश्नांना सोडवता सोडवता त्यांच्याच कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनलेल्या रमाकांतची होणारी मिश्र अवस्था “निरोप” मधून रेखाटली आहे. सामाजिक प्रश्न हाताळताना वैयक्तिक आयुष्यातले दुःख मागे सोडून आलेली  तेरेझिया “आभास” मधून आपल्याला भेटते. या सर्व कथांनी मिळून अर्धा कथा संग्रह व्यापला गेला आहे. पुस्तकाच्या मध्यापर्यंत लेखक अनेक प्रश्न, संवाद आपल्या शैलीत मांडताना एक माफक संदेश द्यायला अजिबात विसरलेला नाही असं मला वाटतं.

उदाहरणादाखल गायत्रीच्या तोंडी दिलेला एक संवाद वाचून आपण ह्या कथासंग्रहाचा अंदाज बांधू शकतो, 

“मला झाडांचा फार हेवा वाटतो. ते कसं ठाम, निश्चिंत उभं असतं. पाऊस, वारा, ऊन सगळं अंगावर घेत. त्याच्यासारखं होता आलं तर किती बरं होईल.”

“आरंभ” ह्या काल्पनिक परंतु भविष्याचा वेध घेणाऱ्या कथेने पुस्तकाच्या उत्तरार्धाला सुरवात होते. कझान या अपरिचित जमातीच्या शोधात निघालेल्या संशोधकाची ही कहाणी मनाला सुन्न करून जाते. एकीकडे विज्ञानयुग व दुसरीकडे अजुनही पाषाणयुगात जगणारी कझान जमात, अणुयुद्धात भस्मसात झालेलं जग मात्र त्याचा कसलाही परिणाम न झालेली कझान जमात वाचल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने कथेच्या शिर्षकाचा अर्थ समजू लागतो. “साथिन” मधून भेटणारी रेवती स्त्रियांच्या जटील विषयाला हात घालत आपल्यालाही जागं करू पाहते. “पायऱ्या” मधून एक वेगळाच दृष्टिकोन लेखकाने मांडला आहे. मानवी स्वभावाचे वास्तव पण तितकेच विचित्र दर्शन यातून आपल्याला होते. अशा या सर्व कथांना वळसा घालून शेवटी आपण पोहोचतो “झेन गार्डन” या कथेकडे. मला वाटतं गोष्टी जशा आपल्या समोर आहेत त्या तशा पाहण्यापेक्षा आपण बऱ्याचदा त्यात दडलेला अर्थ शोधत बसतो. कधी कधी आपण इथेच चुकतो व जे आपल्या समोर आहे ते गमावून बसतो. झेन गार्डन मधून कदाचित हाच अंतर्भाव लेखकाने आपल्यापर्यंत पोहोचवला आहे.

स्वतःचा कणा असलेली भाषा, कथेची घट्ट वीण यातून बोकिलांच्या कथा स्वतःच्या ओळखीने उठून दिसतात. स्वच्छ, सुंदर भाषा; सोप्पे विश्लेषण व खिळवून ठेवण्याच्या कलागुणांमुळे मी तरी मिलिंद बोकीलांचा चाहता झालो आहे. प्रत्येक कथेमधून वेगळा व मार्मिक संदेश देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. एका वेगळ्या अनुभवासाठी तुम्ही हा कथासंग्रह वाचायला घ्या, कोणत्याही पानावर तुम्ही निराश होणार नाही.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form