पुस्तक | तुका आकाशाएवढा | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २८० | मूल्यांकन | ४.३ | ५ |
गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ आप्पासाहेब दांडेकर उर्फ गोनीदा हे नाव प्रत्येक मराठी वाचकाच्या परिचयाचं असेलच असं मला वाटतं. अनेक कथा-कादंबऱ्यांची आप्पांनी आपल्या ओघवत्या शैलीतून मराठी साहित्यात भर घातली आहे. अन् त्या अनेकांपैकी त्यांनी लिहलेल्या संत चारित्र्याच्या कादंबऱ्यानी मराठी मनाला विशेष आकर्षित केलं आहे. त्यातीलच एक महान चरित्र म्हणजे संत तुकोबाराय. तुकाराम महाराजांचा तुकाराम आंबिले ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज हा प्रवास आपल्याला तुका आकाशाएवढा या संत चरित्रात वाचायला मिळतो. वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून तुकाराम महाराजांची ओळख का आहे ते ह्या पुस्तकातून आपल्याला समजून येईल.
देहू गावच्या एका सावकाराच्या मुलाची ही एक जीवन कथा आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर पांडुरंग भक्तीतून मार्ग काढणाऱ्या एका भक्ताची ही कथा आहे. आजपर्यंत तुकड्या तुकड्यांमध्ये वाचलेली, ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला ह्या कादंबरीत एकसंध वाचायला मिळते. घर गृहस्थी सांभाळुन परमार्थ, भक्तिभाव कसा साधावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुकारामांचा जीवनप्रवास होय. समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचं समाधान भक्तीमार्गातून, स्व:आचरणातून महाराजांनी तत्कालीन समाजाला दाखवून दिले. वर्णभेद, जातीय विषमता, एका विशिष्ठ समाजाची असलेली मक्तेदारी या सर्वांवर आपल्या गाथांमधून महाराजांनी ताशेरे ओढले आहेत. समाजसुधारणेचा पाया महाराजांनी आपल्या अभंगांमधून रचला, कीर्तन रूपातून तो तळागाळात पोहोचवला आणि आपल्या जन्माचे सार्थक होताच वैकुंठाचा मार्ग स्वीकारला.
असा हा सगळा जीवनप्रवास आपल्या शाब्दांमधून अजरामर करण्यात गोनीदांनी कुठेही कमी पडून दिली नाही. त्या काळाला शोभेल अशी मराठी भाषा त्यांनी या पुस्तकात वापरली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपणही त्याच काळात वावरत असल्याचा भास वाचकाला झाल्याखेरीज राहत नाही. वैकुंठ गमनाचा प्रसंग वाचताना लेखकाची प्रचंड कल्पनाशक्ती आपल्याला सुन्न करून जाते. आणि आपसूकच मग आपणही बोलून जातो,
"अणुरेणिया तोकडा, तुका आकाशाएवढा"
हे चरित्र वाचताना आपणही वारकरी होऊन जातो, तुकारामांच्या कीर्तनातून रंगू लागतो. देहभान विसरायला लावणारा, इंद्रायणीच्या धारांसारखा खळखळणारा हा प्रवास आपल्याला तुकोबांच्या गाथेसारखा अलगद तरंगत ठेवतो. म्हणून हा जीवनप्रवास प्रत्येकाने एकदातरी उपभोगला पाहिजे.
-© गिरीश अर्जुन खराबे.