संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली - रॉबिन शर्मा | The Monk Who Sold His Ferrari - Robin Sharma | Marathi Book Review

संन्यासी-ज्याने-आपली-संपत्ती-विकली-रॉबिन-शर्मा-The-Monk-Who-Sold-His-Ferrari-Robin-Sharma-Marathi-Book-Reviews
पुस्तक संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली लेखक रॉबिन शर्मा
प्रकाशन जयको पब्लिशींग हाऊस समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १८३ मूल्यांकन ४.८ | ५

लाखो प्रति विकल्या गेलेल्या अनेक पुस्तकांपैकी एक असणारं हे पुस्तक कोणत्याही माणसाच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन, एक नवीन संधी देऊन कायापालट घडवू शकतं. गडगंज श्रीमंत असणाऱ्या एका वकिलाच्या आमुलाग्र जीवन परिवर्तनाची ही कहाणी आहे. आयुष्याच्या एका पायरीवरून तोल ढासळल्यानंतर व मरणाला बगल देत जीवनस्थैर्याकडे होणाऱ्या वाटचालीचा हा प्रवास आहे. आयुष्यात सर्वकाही मिळवण्याच्या आपल्या दैनंदिन धडपडीला एका सुकर वळणावर घेऊन जाण्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक बनू शकतं, असं मला वाटतं. अत्यंत यशस्वी असा एक वकील कोर्टामध्ये केस लढता लढता हृदयविकाराच्या धक्क्याने कोसळतो मात्र त्याचं पुढे काय होतं याची कसलीच माहिती कोणाला ठाऊक नसते. त्याची सगळी संपत्ती, घर, गाडी विकल्याच्या बातम्या पसरू लागतात. पण या सगळ्यात तो स्वतः कुठे गायब झाला आहे याचा कोणालाही थांगपत्ता नसतो. त्याच्याच एका जॉन नावाच्या विद्यार्थी वजा मित्राकडून मग ज्युलियनच्या आयुष्याची कथा हळूहळू या पुस्तकातून उलगडत जाते. असेच दिवस जात असताना एक दिवस जॉनच्या घरी तो प्रकट होतो. हृदयविकाराच्या प्रसंगाआधी अगदी वार्धक्याकडे झुकलेल्या ज्युलियनमध्ये अचानक इतकं तेज आणि तारुण्य आलेलं पाहून जॉन अवाक होतो. पूर्वीपेक्षा अधिक टवटवीत झालेल्या मित्राच्या रहस्याला जाणून घेण्याच्या त्याच्या उत्कंठेमधून कथा पुढे पुढे सरकत राहते. इतक्या जवळून मृत्यू पाहिल्यानंतर अनेक वर्षे गायब असणारा ज्युलियन हिमालयात जाऊन निर्वाणा मधील योग्यांकडून जीवनसूत्री शिकून घेतो. त्याच जीवनसूत्रीच्या बळावर आधीच त्रासिक, थकलेला ज्युलियन नव्याने जीवन आत्मसात करतो. ही जीवनसूत्री राबवण्याचे सात मुख्य प्रकार या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात. ज्युलियनने समजून सांगितल्याप्रमाणे या सूत्रांचा वापर आपल्या आयुष्यात केला तर तुम्हीही तसेच टवटवीत जीवन जगू शकाल. झोपण्याच्या सवयींपासून ते मनाच्या आरोग्यापर्यंत सगळ्या गोष्टी या सूत्रांमधून वाचकांपर्यंत पोहोचवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. मुद्देसूद मांडणी, वाचकाला खिळवून ठेवण्याची कला व चपखल उदाहरणे देऊन रॉबिन शर्माने आपल्याच अनुभवातून हे पुस्तक साकारलं आहे. ज्युलियन आणि जॉन या दोन जिवलग मित्रांच्या केवळ संभाषणातून हे कथानक साकारण्यात आलं आहे. एकाच बैठकीत वाचून होण्यासारखं छोटेखानी परंतु अत्यंत प्रभावी असं हे सेल्फ हेल्प प्रकारचं पुस्तक प्रत्येकाने स्वतःला भेट द्यायला हवं! ज्या बदलासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तो बदल ह्या पुस्तकामधील सूत्रांना आत्मसात करून तुम्ही सहज घडवू शकता. अतिशय माफक अशा किमतीत उपलब्ध असल्यामुळे, तुम्ही हा मार्गदर्शक अगदी सहज तुमच्या संग्रही ठेऊ शकता. जर अजूनही हे पुस्तक तुमच्या वाचनात आलं नसेल तर अजून जास्त वेळ न दवडता तुम्ही ते वाचून बघावं असं मला वाटतं. त्याचा तुम्हाला काय आणि कसा फायदा झाला ते आम्हाला प्रतिक्रियेद्वारे कळवायला बिलकुल विसरू नका!

गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form