पुस्तक | टारफुला | लेखक | शंकर पाटील |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २९२ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
टारफुल म्हणजे शेतात, रानात उगवणारं अनावश्यक तण/गवत जे कितीदा जरी काढलं तरी जरासं खतपाणी मिळताच डोकं वर काढतं. त्याच्या नष्ट होण्याच्या प्रक्रियेतूनच त्याच्या नव्या अस्तित्वाची सुरवात होते असं म्हणतात ते याचमुळे. अशी कित्येक टारफुले आपणास समाजात जगत असताना, वावरत असताना पाहायला मिळतात आणि त्यातून जर प्रश्न राजकारणाचा, सत्ताचक्राचा असेल तर असं अनावश्यक तण सर्रास माजायला वेळ तरी किती लागतो. १९६४ साली लिहलेल्या आपल्या पहिल्यावहिल्या कादंबरीमधून शंकरराव पाटलांनी गावागावात पसरलेल्या या विषयाला आपल्या अस्सल गावरान भाषेत हात घातला. तत्कालीन पाटीलकी सारख्या हुद्द्यावर हे कथाचक्र फिरतं. राजकारणातील ईर्ष्या व त्यातून बदलत जाणाऱ्या मानवी स्वभावाचा प्रवास या कथेतून आपल्याला घडतो. तसं पाहता राजकारणासारख्या क्षेत्रात नायक हा केवळ काही काळापूरता स्थायी असतो, कारण सत्तेची चक्र बदलताच नायकही बदलतो. शंकररावांनी बहुदा याच निरीक्षणाच्या जोरावर कथेतला नायक कोणा एका पात्राला/व्यक्तीला केले नाही. कादंबरी वाचताना जो सुरवातीला नायक वाटतो तो पुढच्या क्षणी बदललेला पाहायला मिळतो आणि ही सगळी किमया शंकररावांच्या लिखाणाची आहे.
वर्षानुवर्षे पाटीलकी सांभाळणाऱ्या सुभानराव पाटलांच्या मृत्यूनंतर टारफुलास खऱ्या अर्थाने सुरवात होते. पाटलांचा कारभार सांभाळणाऱ्या कुलकर्ण्यांना त्यांच्या निधनानंतर गावगाडा सांभाळण्यात आलेल्या असमर्थतेचा फायदा गावातला बंडखोर गट उठवतो. पाटीलकी सोबत होणाऱ्या गावाच्या हेळसांडीमध्ये आबा कुलकर्ण्यांचा निर्घृण खून होतो. हे सगळं बेबंदपणे सुरू असताना अचानक एक दिवस गावात दादा चव्हाण नावाचं वादळ येऊन धडकत. थोरल्या महाराजांनी नेमलेल्या या नवीन पाटलामुळे गावगाडा सुरळीत चालू होतो. सनदी काम करू लागतात, चावडीवर नेमाने जोहार सुरू होऊन दादा पाटलांचा एकछत्री अंमल सुरू होतो. किंतु सत्ता कधी एकटी येत नाही त्यासोबत येणारी सत्तेची नशा, पैशांची लालसा माणसाला पोखरून टाकते. आपसूकच मग त्यातून विवेकबुद्दीचा लोप होत जातो आणि सुरवात होते माणसाच्या ऱ्हासाची! अशीच काहीशी अवस्था दादा चव्हाणांची झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्वस्वाचा ऱ्हास होत असताना, सत्ताचक्र बदलत जाऊन, उगम पावतो पुन्हा नवा नायक.
तीन अंकांमध्ये रंगणारी ही कथा अनेक रंगानी नटलेली आहे शंकररावांनी ते मुक्तपणे उधळले देखील आहेत. वाचक म्हणून आपल्याला गुरफटणाऱ्या अशा कथा कधीच संपत नाहीत, त्या सत्ताचक्रात अडकलेल्या मानवी वृत्तींमुळे अजरामर होतात. गावातली संस्कृती, तिथल्या रीती रिवाज आणि मानवी विचारांमधली विविधता यांचं सांगोपांग दर्शन कादंबरीतून घडतं. एका साध्या खेडेगावातील सत्ताकारण देखील किती भयंकर असू शकत याच वास्तव दर्शन शंकरराव आपणास घडवतात, पिढ्या बदलल्या तरी राजकारणाचा पोत बदलत नाही याची जाणीव देऊन जातात.
असं हे अनावश्यक असणार, समाजात खोलवर फोफावलेलं व वेळोवेळी आपली मान जमिनीतून वर काढणार तण काही क्षणात होत्याच नव्हतं करून जातं. ते मरत नाही, मिटतही नाही कारण त्याच्या नाशातच त्याच बीज रोवलेले असतं. असं हे टारफुल सत्ताचक्रातही आढळतं, ते अव्याहत पणे पसरतं, त्याला ना आदी ना अंत! माणसांना मात्र ते सत्ताधारी व विरोधक या दोन गटांत सहज विभागून टाकतं अन त्यातून उद्भवत जातो राजकारणाचा रक्तरंजित डाव! टारफुला साहित्यकृतीच्या साडेचार दशकानंतरही ते तसंच आहे, जनमानसात फोफावत आपलं काम चोख बजावत आहे. शंकररावांनी ते शब्दातीत केलं तेच या कथेचं अन त्यांचं यश!
टारफुला नक्की वाचा, ते जीवनाचाच भाग आहे, इर्षेने पेटलेल्या समाजाचं वास्तव त्यात आहे, आज गरज आहे त्यातून धडा घेत या माजणाऱ्या टारफुलाला प्रत्येकवेळी थोपविण्याची अन माणूस म्हणून त्यावर विजय मिळविण्याची!
-© गिरीश अर्जुन खराबे.