पुस्तक | सुवर्णगरुड | लेखक | मारुती चितमपल्ली |
---|---|---|---|
प्रकाशन | साहित्य प्रसार केंद्र | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १२० | मूल्यांकन | ३.७ | ५ |
निसर्ग वाचन करावं या हेतूनं मी मारुती चितमपल्ली यांची नऊ पुस्तकं विकत घेतली, त्यातील चार पुस्तकं मी या आधी वाचली आहेत. बहुतांश पुस्तकांमध्ये ललित लेख आहेत. सुवर्णगरुड हे पुस्तक देखिल अनेक ललित लेख एकत्र घेऊन तयार करण्यात आले आहे. पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला पुस्तकं घेऊ वाटतात आणि वाचू वाटतात. तसेच यादेखिल पुस्तकाच्या नावावरूनच हे पुस्तकं मला वाचू वाटलं.
लेखकाची जमेची बाजू म्हणजे त्यांची लेखन शैली. त्यात कुठेही मरगळ जाणवत नाही. कुठेही उगीच काहीतरी लिहिलं आहे अस वाटत नाही. पाच पुस्तक हातात घेऊनही आणि त्याच निसर्गावर वाचताना देखिल मला तितकाच उत्साह होता हे जरूर नमूद करावं वाटतं. या पुस्तकात त्यांनी गरुड, मोर, नाकेर, खंड्या या पक्षांची, साप, नाग व अजगर यांची वर्णनं केली आहेत तर त्याच सोबत खारुताई, मुंगूस, कोल्हा, हरिण, वाघ यांच्या बद्दल ची महिती आणि वर्णनं आपल्या आयुष्यातली घटनांसोबत गुंफून सांगितली आहेत.
यात फक्त वर्णन आहेत असं नाही.. अनेक अनुभव, अनेक परिस्थिती आणि त्या वातावरणात त्या त्या प्राण्यांचे पक्ष्यांचे निसर्गाशी असणारे नाते त्यांनी नमूद केला आहे. त्या वातावरणात त्यांच्या सवयी व वावराने तयार होणाऱ्या घटना, आपल्याला एका वेगळ्या निसर्गाची नक्कीच ओळख करून देतात.
या पुस्तकांत लेखकाने पहिल्यांदा दोन व्यक्तींबद्दल कथा लिहिल्या आहेत याचं मला विशेष वाटलं. परंतु या पुस्तकातील दोन लेख मी आधी वाचालेल्या "जंगलाचं देणं" याच पुस्तकात देखिल आहेत. त्यामुळे काहीसा हिरमोड देखील होतो. चितमपल्ली यांचं लिखाण नेहमीच मला आवडत आलं आहे. त्यांची चौकस, अभ्यासू बुद्धी.. अरण्याची जाण आणि आगळवेगळी लेखनशैली तुम्हाला पुस्तकाच्या प्रेमात पाडेल. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा.