पुस्तक | सुखाचा शोध | लेखक | वि. स. खांडेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १३२ | मूल्यांकन | ४.७ | ५ |
मला सवय आहे, कोणतंही पुस्तकं वाचत असताना त्यातील काही आवडीची, मनाला भिडणारी, काहीतरी शिकवणारी वाक्य वहीत उतरवून ठेवायची. मी पुस्तक हातात घेतलं आणि वाचता-वाचता पुस्तकंच लिहावं लागेल की काय, असं वाटू लागलं. प्रत्येक वाक्य म्हणजे सारांश! प्रत्येक वाक्य मनाला भिडणारं, जगाला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक वाक्यातून वेगळा. भाषेचं सौंदर्य त्या वाक्यांना कोण वरचढ आहे हे ठरवू देईना. असं हे पुस्तक आहे.
"वि. स. खांडेकर" लिखित "सुखाचा शोध"! प्रत्येक माणसाला सुख म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय हे आपल्याला समजावं अस वाटतं, किंबहुना आपल्याला सुख मिळाव असच! पुस्तकाची सुरवात अशाच सुख शोधू पाहणाऱ्या काही पात्रांपासून होते, आणि तिथेच संपते.
घरच्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखावर तिलांजली देऊन, सुखात सुख शोधणारा "आनंद". लहान वयात लग्न आणि घरातल्याच नराधमाकडून अतिप्रसंग, म्हणून जीव द्यायला निघालेली "उषा". समाजसवेचा भाव मनात बाळगणारी एक वेगळ्याच विश्वात असणारी "माणिक". अशा या तीन मुख्य पात्रां सभोवतीची ही कथा, आणि मीरा, आप्पा, चंचला, धनंजय अशी लहान सहान पात्र त्यात अनेक प्रकारे निराळे अंश आणि वेगळी विचारांची सजावट पुस्तकास देऊन जातात. "वि. स. खांडेकर" म्हटलं की आपल्याला त्यांची मंत्रमुग्ध करणारी भाषा तर आठवतेच पण त्या भाषेला साजेशी अशीच या पुस्तकातील पात्र आहेत, या पुस्तकाची गोष्ट आहे.
"स्त्री वर खरं प्रेम फक्त मृत्यूच करू शकतो."
या वाक्यामागे असणारी ती महाभयंकर टाचणी तुम्हाला पुस्तकाच्या प्रत्येक पानावर मिळेल. आणि असे अनेक वाक्य तुमच्या मनाला सुखाची नवी व्याख्या देतात आणि पुन्हा वाळूच्या किल्ल्याप्रमाणे मोडून टाकली जातात.
"अगदीं सत्याग्रह करायचा बेत दिसतोय तुमचा!! ज्याचा आग्रह धरावा, अशी जगात "सत्य" ही एकच गोष्ट आहे!"इतकं तीक्ष्ण वाक्य कोणाला विचार करायला भाग नाही पाडणार.
"त्यागाने देव प्रसन्न होतात, भुते नाहीत!"
त्याचप्रमाणे असं वाक्य वाचलं की मनात एक वादळ घर करून राहत.
हे पुस्तक प्रत्येकानं एकदा तरी वाचावं, आनंदात असाल तर दुःख समजेल, दुःखात असाल तर सुखाचा शोध घ्यावा वाटेल आणि काहीच नाही तर जगाला पाहण्यासाठी एक नवीन डोळा तरी नक्कीच मिळेल. मराठी भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे काय हे सर्वतोपरी आपल्याला दाखवणारं एक छान पुस्तक आहे. अनेक नाती, अनेक गंध, अनेक दृष्टिकोन आणि प्रत्येकाचं त्यावरचं मत. प्रत्येक पात्राची आपली दुःख यातूनच हे पुस्तक जास्ती खुलतं!
-© अक्षय सतीश गुधाटे.