शहेनशहा - ना. सं. इनामदार | Shahenshah - Na. Sa. Inamdar | Marathi Book Review

शहेनशहा-ना-सं-इनामदार-Shahenshah-Na-Sa-Inamdar-Marathi-Book-Reviews
पुस्तक शहेनशहा लेखक ना. सं. इनामदार
प्रकाशन कॉन्टिनेन्टल प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ८०८ मूल्यांकन ४.३ | 

हिंदूस्थानचा पदपातशहा ही बिरुदावली आयुष्यभर मिरवणारा, शेवटच्या श्वासापर्यंत बादशहापद उपभोगणारा आणि नजर जाईल तेवढ्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या महत्वाकांक्षी सत्ताधीशाची कहाणी म्हणजे शहेनशहा!

मुघल साम्राज्याच्या औरंगाबाद भागाची देखरेख करणारा शहजादा ते सत्ता संघर्षात स्वतःच्याच बाप अन भावांविरुद्ध बंड करून बादशाह बनलेला, प्रचंड सामर्थ्य, सत्ता, विलासी आयुष्य व हे सगळं उपभोगण्यासाठी हवं असणारं दीर्घ आयुष्य लाभलेला मुघल बादशाह म्हणजे शहेनशहा गाझी औरंगझेब. कादंबरी वाचताना औरंगझेब समजायला लागतो. तो असा का होता? खरचं तो इतका क्रूर होता का? या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळून जातात. औरंगझेबाने जर भावांना ठार मारले नसते तर कोणी तरी त्याला मारून बादशहा झालाच असता हा विचार ना. सं. इनामदारांनी कादंबरीत सुरवातीलाच मुरवला आहे. तो थोर सेनानी होता, तसा तो धूर्तही होता, कोणाही शत्रूला तो कधी कमी समजत नसे, शत्रूचा समूळ नाश करणे का महत्वाचं आहे हे औरंगझेब समझल्यावर लक्षात येत.

"समुद्राच्या लाटा तटाला भिडतात ते केवळ चुंबन घेण्यासाठी नव्हे, त्यांचा उद्देश तट उध्दवस्त करण्याचाही असू शकतो; त्यामुळे गाफील राहू नका."

असं जेंव्हा तो मिर्झाराजा जयसिंगाला सांगतो त्यावरून त्याच्या विचारांची सीमा लक्षात येते. संपूर्ण हिंदुस्थानचा बादशहा असल्यामुळे सतत सतर्क राहावं लागतं यावर तो ठाम आहे आणि त्यामुळेच त्याच्याच शहजाद्याचं बंड मोडुन काढण्यात तो यशस्वी होताना दिसतो. तो अंत्यत धार्मिक असून अल्लाने आपल्याला आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलं आहे आणि हे जे काय आहे हे त्यामुळेच आहे अशीही त्याची विचारसरणी आहे आणि त्यामुळेच की काय धर्माच्या अनुयायांनी त्याला परवरदिगार ही उपमा दिली आहे.

सम्राटपद भोगून, ऐषोआरामात आयुष्य कंठून देखील शेवटी त्याला समाधान लाभत नाही आणि या विचारानेच तो अजून व्यथित होतो. आपल्याच बापाला आणि बहिणीला आपण आजिवन तुरुंगवास दिला तो ही केवळ सत्तेसाठी या भावनेतून जेंव्हा तो त्यांची शेवट माफी मागतो त्यातून तो ही माणूसच होता ह्याची जाणीव होते. आदिलशाही, निजामशाही काही दिवसात संपवणारा औरंगजेब जेंव्हा मराठ्यांपुढे किंवा आपण म्हणू शकतो संभाजी महाराजांपुढे हतबल होतो तेंव्हा आपल्या मराठी मनाला अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. आयुष्यभर फक्त महत्वाकांक्षा कुरवाळत राहिलेल्या शहेनशहाची कहाणी ना. सं. इनामदारांनी ज्या शब्दांत मांडली ते शब्द मनात साठून राहतात. असा हा शहेनशहा जो एक माणूस होता याची दुनियेने कधी दखलच घेतली नाही, त्यालाही वेदना होतात, त्यालाही व्यथा होत्या आणि बादशाह असूनही त्या त्याला चुकल्या नाही यावर इनामदार अचूक बोट ठेवतात. शहेनशहा वाचताना आयुष्याचे अनेक पैलू समोर आल्याशिवाय राहत नाहीत आणि इनामदारांनी ते वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहेनशहा सारखी कलाकृती घडवली हे केवळ आपलं भाग्यच!

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form