पुस्तक | सत्तांतर | लेखक | व्यंकटेश माडगूळकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ८४ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
मुळातच मानवाच्या उत्पत्तीपासून त्याला अधिकार गाजवण्याची भारी हौस आहे. पाठीचा कणा सरळ होऊन दोन पायांवर चालू लागताच त्याने निसर्गावर हक्क दाखवायला सुरवात करत आज पूर्ण पृथ्वीच गिळंकृत केली आहे. मानवी उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या वा ज्यापासून मानव प्रजाती विकसित झाली त्या वानरांच्या टोळ्यांमध्ये घडणाऱ्या, सत्ता बदलांबाबतची कथा व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्या "सत्तांतर" या पुस्तकातून मांडली आहे. सूक्ष्म निरीक्षण, अनुभव आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी मांडलेला हा सत्तेचा डाव वाचकाला मोहिनी घालून जातो. ताकदवर त्याचीच सत्ता हा जगरहाटीचा साधा नियम वानरांच्या टोळीत देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी होणारा संघर्ष, त्यातून होणार नुकसान आणि सर्व खटाटोप करून मिळवलेली सत्ता जपण्यासाठी आयुष्यभर करावी लागणारी धडपड यांच प्रतिबिंब आजच्या समाजात देखील आपल्याला जागोजागी पाहायला मिळतं.
कथेला सुरवात होते ती जंगलातल्या पानगळीने अन बोथरी नावाच्या एका म्हाताऱ्या वानरीची शिकारी कुत्र्यांकडून होणाऱ्या शिकारीने. जंगलात असणाऱ्या अनेक वानरझुंडीच्या सवयी, त्यांच्या जगण्याच्या, वावरण्याच्या पद्धती लेखकाने दोन झुंडीच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडल्या आहेत. मुडा आणि लालबुड्या या दोन वानर नायकांच्या टोळीभोवती संपूर्ण कथा फिरत असते. त्यातल्याच काही वानरांना त्यांच्या रुपावरून लेखकाने नावे दिली आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात शेपूट गमावलेली लांडी, ऐन तारुण्यात प्रवेश केलेली तरणी, इकडे तिकडे उनाडपणे फिरणारी उनाडी, एक हात कोपरापर्यंत असणारी थोटी, एका डोळ्याने अधू असणारी काणी आणि वय सरलेली बोथरी अशा एकूण सात माद्यांच्या समूहाचे नेतृत्व करणारा तरणाबांड, टोकदार सुळे असलेला मुडा "सत्तांतर" मधून आपल्या भेटीला येतात. नर तारुण्यात आला की त्याला टोळीतून हद्दपार केलं जात ही वानर टोळीची रित आहे. असे हद्दपार केलेले नर एकतर पेंढारी बनून फिरतात किंवा दुसऱ्या टोळीच्या नायकाशी संघर्ष करून त्याची जागा बळकवतात. असाच संघर्ष करून आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुडाही नायक झालेला असतो. रात्री झोपण्यासाठी झाड शोधणे, आपल्या प्रदेशाच्या सीमा परकीय आक्रमणापासून सुरक्षित राखणे, टोळीचे रक्षण करणे आणि टोळीला खाण्यासाठी फळांनी लगडलेले झाड शोधणे ही नायकाची प्रमुख कामे असतात.
असाच एके दिवशी पक्ष्यांची अंडी खाताना सर्पदंश होऊन लालबुड्या मरून जातो व मुडाच्या शेजारी असलेली लालबुड्याची टोळी पोरकी होते. हीच संधी साधून मुडा आपला प्रदेश व टोळी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु माद्यांमुळे त्याला त्यात यश येत नसते. टोळीतील खाणारी तोंडे वाढली तर उपासमारीची वेळ येऊ शकते म्हणून वानर माद्या वीस बावीस च्या पलीकडे सदस्यांची संख्या वाढू देत नाहीत. अशा पोरक्या झालेल्या टोळीचा पेंढारी बनून फिरणाऱ्या मोगा आणि त्याच्या चार साथीदारांना सुगावा लागतो. आयत्या चालून आलेल्या संधीच सोनं करण्यासाठी मोगा मुडाला आव्हान देतो. मुडा ते आव्हान परतून लावतो परंतु घुसखोरांपुढे त्याचा प्रतिकार कमी पडत असतो. या सगळ्यातूनच मग कालचे पेंढारी कसे आजचे सत्ताधारी होतात? मुडाची आणि लालबुड्याची जागा मोगा आणि त्याचे साथीदार कसे मिळवतात? गर्भधारणा झालेल्या तरणीचं मुल या सगळ्यात कसं बचावत? त्याच्या जन्मानंतर तो नर आहे की मादी हे चाचपून पाहणाऱ्या व तो ही मोठा होऊन आपल्या बापासारखं मोगाला आव्हान देऊन पुन्हा सत्तांतर घडवून आणेल या उमेदीत भरडून निघणार आईच मन इत्यादी गोष्टी समजून घेण्यासाठी पुस्तकच वाचायला हवं.
जीवनचक्राप्रमाणे हे सत्तांतराच चक्र ही अजरामर आहे व ते फक्त वानरांमध्येच नसून सर्वत्र पसरलेलं आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात ते आहे ज्यात कचदिल व कमजोर असणारा सामर्थ्यवानाकडून सतत भरडला जातो. आयुष्याचं वास्तव कधी कधी किती भयानक असू शकतं हे सत्तांतर वाचताना लक्षात येतं. जीवन सुरूही न झालेल्यांचा सत्तांतराच्या खेळात केवळ साम्राज्य टिकावं म्हणून मृत्यू होत असताना मानवी मन द्रवल्याशिवाय राहत नाही. व्यंकटेश माडगूळकरांच्या सहज सुंदर लेखणीत मांडलेला हा डाव एकदातरी नक्की वाचावा इतका रंजक आहे. त्यातून आपल्याला काय मिळेल हे तूर्तास तरी गूढ आहे. कारण या खेळाचे प्रत्येकाचे आपले नियम असल्याने त्यातून मिळणारा बोधही निराळाच असेल यात शंका नाही.
-© गिरीश अर्जुन खराबे.