पुस्तक | समिधा | लेखिका | साधना आमटे |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १८५ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
समिधा या नावाप्रमाणेच मुरलीधर उर्फ बाबा आमटे यांच्या जीवनकुंडात स्वतःच्या आयुष्याची सहजपणे आहुती देणाऱ्या एका स्त्रीच्या त्यागाची, निर्विवाद प्रेमाची व एका तपसव्याची सहचारिणी म्हणून कराव्या लागणाऱ्या संघर्षाची ही कहाणी!
बाबांच्या अनेक कलागुणांची ओळख आपल्याला समिधा मधून होते. जगाला माहीत असलेले बाबा आणि साधना ताईंच्या सोबत आयुष्य जगलेले बाबा यात जमीन आसमानाचा फरक वाचकाला अनुभवायला मिळतो. बैराग्यासारखं कोपिष्ट आयुष्य जगणाऱ्या बाबांना जेंव्हा साधना ताई भेटतात तेंव्हा लग्न न करू इच्छिणाऱ्या बाबांमध्ये झालेला बदल, त्यांच्या मनाला ताईंनी घातलेली साद, त्यांच्यातल्या कवीने केलेल्या कविता आणि त्या उभयतांमधला पत्रव्यवहार केवळ अनाकलनीय. बाबा आणि साधना ताई यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग समिधा मधून आपणाला जवळून अनुभवायला मिळतात. आदिवासी, कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी उभारलेलं नंदनवन, मराठी साहित्यिकांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद, बाबांनी मनावर घेतलेल्या प्रत्येक उपक्रमासाठी राबणारी अनेक माणसं आणि त्या सगळ्यांना बाबांप्रती असणारा जिव्हाळा ह्या सगळ्या बाबी साधनाताईंनी उत्तमरीत्या समिधा मधून शब्दबद्ध केल्या आहेत. केवळ समाजसेवक म्हणून जगास ज्ञात असलेल्या मुरलीधर आमटेंचा साहित्याप्रती असलेला ओढा व त्यांनी विविध विषयांवर रचलेल्या कविता समिधामधून वाचकाच्या भेटीस येतात.
आपला संसार एका तपसव्यासाठी वाहून घेताना करावी लागलेली कसरत, तडजोड अन या सगळ्यातून मिळत गेलेली जिवाभावाची माणसं साधना ताईंनी आयुष्यभर मुलांप्रमाणे जपली. बाबा आमटे सारख्या साधकाच्या आयुष्यरूपी यज्ञात सामावून घेत स्वतःच्या आयुष्याची समिधा वाहणाऱ्या साधना ताईंची ही आत्मकथा. आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगाचा आपणास महोत्सव करता आला पाहिजे हा संदेश या दाम्पत्याकडून घेण्यासारखा आहे. समिधा वाचताना त्याची पदोपदी जाणीव देखील होते. आपल्याला मिळालेलं आयुष्य आणि त्यांनी जगलेलं आयुष्य यात खूप तफावत आहे, वाचक म्हणून वाचताना ते रोमांचकारी वाटत असलं तरी ते बिलकुलही सोपं नाही. अशा कित्येक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारी ही कथा नक्कीच वाचण्यासारखी आहे.
-© गिरीश अर्जुन खराबे.