रातवा - मारुती चितमपल्ली | Ratava - Maruti Chitampalli | Marathi Book Review

रातवा-मारुती-चित्तमपल्ली-Ratava-Maruti-Chitampalli-Marathi-Book-Reviews
पुस्तक रातवा लेखक मारुती चितमपल्ली
प्रकाशन साहित्य प्रसार केंद्र समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १२१ मूल्यांकन .१ | ५

आपण अनेकदा शून्याच्या गर्तेत अडकून कशाकडे तरी एकटक पहात असतो, बहुतांश वेळा माझी ही अवस्था निसर्गाच्या सानिध्यातच होते. अवती-भोवतीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. आजूबाजूला झाडं वेली डोलत असतात.. कैक प्रकारचे पक्षी किलकिलाट करत असतात, प्राणीही दिसत असतात..किड्या मुंग्यांचाही वावर असतो.. पण आपण मात्र शून्याच्या गर्तेत अडकलेलोच असतो.

रातवा हे चितमपल्ली यांचे पुस्तक वाचताना मात्र अगदी या उलट झाले. प्रत्येक लेखासोबत मी निसर्गामध्ये अडकत होतो. मारूती चितमपल्ली यांनी या पुस्तकात त्यांचे १६ ललित लेख दिलेले आहेत. प्रत्येक लेखातून नवीन माहिती. निसर्गाच्या विविध अंगाचे त्यांनी लेखन केले आहे. पुस्तकात रातवा, हरोळी, घुबड, पंकोळी वटवाघूळ या काही पक्ष्यांची महिती सांगितली आहे. सोबतच कीटक वर्गातील कोळी, रातकिडे व चातुरांबद्दल माहिती दिली आहे. वाघाचा छावा आणि त्याची कथा आहे. कडई, रानकेळी, वड, बहावा(अमलताश), बांबू, सागवान, कुसुंबी वृक्षांची अतिशय मनमोहक वर्णन वा त्यांची खासियत सांगितली आहे. बोर, जांभूळ या सारखी झाडं देखील त्यांनी आपल्या लेखणीने आपल्यापर्यंत पोहचवली आहेत. फक्त माहिती नाही तर त्याच्या मागील दंतकथा त्यांची प्राचीन माहिती, त्यांचा औषधी म्हनून होणारा उपयोग व गुण त्यांनी आपल्याला या पुस्तकातून दाखवून दिले आहेत.

या पुस्तकातील लेख तुमच्या बुद्धीची क्षितिजं तर वाढवतातच, सोबतच आपल्या मनात निसर्गाच्या अनेक रंगरुपांच एक एक चित्र उभी करतात. निसर्गाशी जवळीक होते.. त्यात आपण हरवून जातो. मी "मारुती चितमपल्ली" यांची नऊ पुस्तकं घेतली आहेत.. तीच सतत वाचत आहे तरी देखील एकाही पुस्तकात मला अरसिकता वाटली नाही उलट हे पुस्तक संपवून नवीन कधी हाती घेऊ असच होतं.

निसर्ग प्रेमींनी तर नक्कीच ही पुस्तकं वाचायला हवीत परंतु कोणत्याही पुस्तक वाचणाऱ्याला हे लेख मोहात पडतील असेच आहेत. मारूती चितमपल्ली यांना "अरण्यऋषी" का म्हणतात याचा पुरेपूर अनुभव तुम्हाला ही पुस्तक वाचताना येईल. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form