पुस्तक | पावनखिंड | लेखक | रणजित देसाई |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १४० | मूल्यांकन | ४.६ | ५ |
नाव ऐकूनच डोळ्यासमोर उभी राहते ती वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या धिप्पाड देहाची छबी. अवघ्या १४० पानांत रणजित देसाई यांनी रेखलेला बाजींचा स्वराज्यासाठीचा पराक्रम हा नक्कीच त्यांना न्याय देणारा नसला तरी त्यांच्या बलिदानाची, धाडसाची अन त्यागाची जाणीव करून देणारा आहे. कृष्णाजी बांदल या स्वतःस राजा म्हणवून घेणाऱ्या व बारा मावळात आदिलशाहीची चाकरी करणाऱ्या जुलमी शासकाचा प्रधान म्हणजे बाजी. रोहिडा किल्ल्याच्या लढाईत कृष्णाजीस ठार केल्यानंतर राजांनी बाजींसारख्या वीर लढवय्याची स्वराज्याशी गाठ बांधली ती कायमचीच! माणसांची पारख असणाऱ्या शिवरायांची ही निवड बाजी अन त्यांचा भाऊ फुलाजी यांनी आयुष्यभर सार्थ ठरवली. राजा देईल ती कामगिरी फत्ते करत त्यांनी स्वराज्याची पालखी सबंध आयुष्य आपल्या खांद्यावर वाहिली. मोहनगड सारखा लयास गेलेला किल्ला बाजींनी कल्पकतेच्या अन राजज्ञेच्या जोरावर पुन्हा उभा केला. दांडपट्टा चालवण्यात बाजींचा हातखंडा मोठा, बाजींनी पवित्रा घेताच विजेच्या चपळाईने पट्टा चाले.
पन्हाळा ते विशाळगड दरम्यान झालेल्या घोडखिंडीच्या लढाईतला बाजींचा पराक्रम आपण सारेच जाणतो किंतु स्वराज्याच्या अनेक छोट्या मोठ्या कामात बाजींचा असलेला वाटा आपल्याला या कादंबरीतून समजून येतो. बाजी मुत्सद्दी होते, युद्धात निपुण होते, शत्रूवर योग्य वेळी वार करण्याची जाण त्यांना होती म्हणूनच की काय खुद्द राजांना ते वडीलांसमान होते. शिवरायांच्या आयुष्यातील कैक प्रसंग यात देसाई रेखाटतात, तेही अभूतपूर्व आहेत. स्वराज्याच्या कामात माणसं जोडण्याची राजांची हातोटी, गडांचे व आपल्या गर्द मूलखाचे असलेले महत्व आणि त्याचाच वापर करून त्यांनी केलेला अफझलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा वध वाखाणण्याजोगा आहे.
"बाजी! जगदंबेच्या कृपेनं आम्ही या संकटातून तरुन जाऊ, यात आम्हांला संशय नाही, पणदुर्दैवानं तसं घडलं नाही, तर कचदिल होऊ नका. माणसं कर्तव्यापोटी जगतात. कार्य करीत असता मरतात. पण त्यांच्या मृत्यूनं हताश न होता, ती का जगली, कशासाठी जगली आणि मेली, याची जाणीव ठेवायला हवी."
संकट बलाढ्य असलं तरी राजांनी आपल्या माणसात पेरलेली ही जाणीव लाखमोलाची आहे. यातून त्यांनी घडवलेला स्वराज्याचा डाव म्हणजे अग्निदिव्यच! सिद्धी जौहरच्या वेढ्यातून राजांना वाचविण्यासाठी केलेली बाजींच्या पराक्रमाची शर्थ, शिवा काशीदच बलिदान आणि बाजींच्या सहाशे धारकरी बांदलांच्या शौर्यातूनच स्वराज्य टिकलं, उभं राहिलं अन तडीस गेलं. लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा जगावा या हट्टापायी तोफेचा आवाज होईपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू न देणारा बाजी अन त्यांची निष्ठा यांचं मोल अतुलनीय आहे. जीव ओवाळून टाकणारी माणसं महाराजांना लाभली, प्रसंगी त्यांनी आपले प्राण वेचले ते केवळ अन केवळ शिवनिष्ठेपायी, स्वराज्यापायी. गजाखिंडीची पावनखिंड करणाऱ्या बाजीप्रभूंचा इतिहास, पराक्रम, शौर्य यांचं सार म्हणजे रणजित देसाई लिखित ही कादंबरी. प्रत्येक उताऱ्यागणिक आपल्या रोमारोमात इतिहास सळसळत जातो, बाजींच ते वेड, शिवा काशीद,फुलाजींची निष्ठा यांनी लेखक आपणास भारावून सोडतो. छोटीशी कादंबरी असली तरी मनाला चटका लावून जाते! बाजी या विराबद्दल अनामिक ओढ लावून जाते!
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी सत्तेला भुललेल्या स्वकीयांना स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी हाच प्रसंग निवडला आणि या घटनेवर पोवाडा लिहून जनजागृती केली, स्वातंत्र्याची गरज समजावून दिली आणि सोबतच बाजीप्रभूंची महती पुन्हा जनसामान्यांसमोर एका नव्या स्वरूपात मांडली. आपसूकच त्या पोवाड्याच्या काही ओळी खाली देत आहे. परंतु संपूर्ण पोवाडा तुम्ही स्वतः शोधून नक्की वाचावा ही अपेक्षा.
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥
-© गिरीश अर्जुन खराबे.