मोसाद मिशन्स - आशिष काळकर | Mossad Missions - Ashish Kalkar | Marathi Book Review

मोसाद-मिशन्स-आशिष-काळकर-mossad-missions-ashish-kalkar-Marathi-Book-Reviews
पुस्तक मोसाद मिशन्स लेखक आशिष काळकर
प्रकाशन रोहन प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १६८ मूल्यांकन ४.३ | ५

कोणताही देश.. कोणतेही राष्ट्र.. जर कशाच्या आधारावर उभं असेल तर मला वाटतं ते म्हणजे, त्या देशाची गुप्तहेर संघटना. देशाच्या उभारणीमध्ये, त्याच्या जडणघडणीत, वाटचालीत आणि अंतर्गत व बाह्य राजकारणात देखील, अशा संघटनांचा मोठा हात असतो. भारताची "रॉ", रशियाची "केजीबी" आणि अमेरिकेची "सीआईए" आहे हे नाव तुम्ही ऐकलेच असतील. पण या सर्वांहून भयंकर आणि अतिशय निष्णात अशी अजून एक संस्था जी तुम्ही सतत ऐकली असेल..ती म्हणजे इस्राईल या देशाची "मोसाद". मोसाद हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांची भंबेरी उडते.. अनेकांना कापरे भरते.. अनेक देशांना आपल्या काटेकोर नियोजनाच्या आणि अंतर्गत एकसंधतेच्या जोरावर अनेक खडतर मोहिमा आखल्या आणि त्या आपल्या धूर्त, चालाख पण स्वतःच्या देशाशी एकनिष्ठ अशा हेरांच्या जोरावर त्या तडीस देखील नेऊन दाखवल्या. अशा कथा कोणाला वाचायला आवडणार नाहीत.

"आशिष काळकर" यांनी अशाच काही महत्वाच्या मोहिमा या पुस्तकांत कथारुपात आपल्या समोर मांडण्याचा एक सुंदर प्रयत्न यशस्वी करून दाखवला आहे. ज्यांना मोसाद ची महती ठाऊक आहे त्यांच्यासाठी तर हे पुस्तक एक मोलाचा भाग असेलच परंतू ज्यांना मोसाद ला जाणून घेण्याची उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे. यात मोसाद चा इतिहास.. त्याचा जन्म.. त्याची गरज.. कामाची हाताळणी.. यंत्रणेचा कणा असणाऱ्या अनेक व्यक्ती.. त्यातून घेतलेले निर्णय व त्यांची पार्श्वभूमी. असे सगळे बारीक-बारीक पण अगदीं महत्वाचे असे भाग या पुस्तकांत अगदी चपखल उदाहरणासहित गुंफले आहेत. प्रत्येक मोहिमेच्या कथेसोबत त्यातून जन्माला येणारा नवीन घटक.. त्या मोहिमेचे परिणाम, जागतिक पातळीवर त्याचे पडसाद आणि त्यावर इस्राईलने (मोसादने) घेतलेले निर्णय, काळजी किंवा प्रतिक्रिया आपल्याला थक्क करते.

असे पुस्तक लिहिणे थोडेसे अवघड काम आहे असं मला वाटतं. कारण इथे एकाचा फायदा दुसऱ्याचा तोटा असू शकतो, मग प्रत्येकाच्या अनुषंगाने गोष्ट बदलते आणि लेखकाला मांडवी वाटत असणारी बाजू एका बाजूला राहते. पण लेखकाने हा तराजू अगदीं हातसफाईने हाताळला आहे. आपल्याला कोणत्याही घटनेची सर्वांगीण माहिती देऊन, त्यातून झालेले परिणाम आपल्या समोर मांडले आहेत. या पुस्तकाची मजा अजूनच वाढते कारण यात फक्त मोसादच्या यशस्वीच नाही तर अयशस्वी मोहिमांचा देखील आढावा घेतला आहे. इस्राईल, अमेरिका, इराण, इराक, रशिया, लेबनॉन, सिरिया, इजिप्त अशा अनेक देशातील अनेक मोहिमा.. आपले लक्ष वेधून घेतात. मुख्यतः अण्वस्त्र आणि लष्करी हालचाली, सोबतच मिग-२१ लष्करी विमानाची चोरी मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे.

एकंदरीत पाहता पुस्तकातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. अशा प्रकारच्या गुप्तहेर संघटना कशा चालतात.. त्यातील यंत्रणा कशा असतात.. आणि त्यावर अवलंबून असणारे त्या देशाचे आणि आसपासच्या किंवा विरोधी देशांचे राजकारण कसे बदलते यामुळे अंगावर रोमांच उभे राहतात. लेखकाने जशी सुरवातीला मोसादची ओळख करून दिली आहे.. हळू हळू प्रत्येक मोहिमेतून मोसादची उकल केली आहे.. तसेच शेवटी आत्ताच्या इस्राईलने-हमास युध्दाचे देखील बारकावे अगदी नीट समजून सांगितले आहेत. नक्की वाचावं अस पुस्तक आहे. अनेक चित्त थरारक अनुभव देऊन जातं. तुम्ही देखील नक्की हे पुस्तक वाचा आणि पुस्तकाबद्दलचा तुमचा मौल्यवान अभिप्राय कळवा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form