पुस्तक | लक्ष्यवेध | लेखक | रणजित देसाई |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १३० | मूल्यांकन | ४.१ | ५ |
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला अनेकांचा हातभार लाभला आहे. महाराजांच्या नेतृत्वाखाली अनेक रणधुरंधरांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करत स्वराज्यासाठी, स्वामीनिष्ठेसाठी बलिदानही केलं आहे. अशा या हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी अनेक सल्तनतींचा सामना केला. कित्येक संकटांतुन शिवराय आपल्या हुशारीच्या जोरावर बाहेर पडले. अशाच एका संकटाची भीषणता सांगणारी ही कादंबरी लक्ष्यवेध च्या रूपाने रणजित देसाई यांनी मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. हिंदवी स्वराज्य अगदी सुरवातीच्या टप्प्यात असतानाचा हा चित्तथरारक प्रसंग आहे. आदिलशाही सरदार अफझलखान स्वराज्यावर चालून आल्यावर मराठ्यांनी जो रणसंग्राम केला त्याचा वेध घेणारी हि शौर्यगाथा आहे .
विजापूरच्या दरबारात शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणण्याचा विडा उचलून प्रचंड फौजफाटा सोबत घेऊन अफझलखान स्वराज्यावर चालून आला. मराठ्यांना मोकळ्या मैदानात लढायला भाग पाडण्यासाठी वाटेत येताना त्याने हिंदूंची देवळे उध्वस्त केली. पंढरपूर, तुळजापूरसारखी भक्तीपिठे अक्षरशः खणून काढली. पण शिवाजी महाराजांनी कुठलाही विरोध न करता त्याला स्वराज्यात येऊ दिलं. सुपे, इंदापूर सारखी ठाणी खानाला मोकळी करून दिली. एकदंर शिवाजी खूप घाबरला आहे, खानसाहेबांच्या माफीसाठी आतुर झाला आहे असा भास त्यांनी निर्माण केला. खानासारख्या बलाढ्य शत्रूचा सामना रणांगणात करणं शक्य नाही हे महाराजांना पुरतं ठाऊक होतं. परंतु शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याचा बारकाईने अभ्यास करून, आपल्या ताकदीवर त्याला लढायला भाग पाडण्यात महाराज यशस्वी झाले. कुठल्याही प्रकारची गल्लत इथे परवडण्यासारखी नव्हती, कारण प्रश्न स्वराज्याच्या अस्तित्वाचा होता.
महाराजांनी खानाशी बोलणी करून त्याला वाईच्या निबिड अरण्यात, प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला भाग पाडलं. इथेच अर्ध यश पदरात पडलं असतानाही शिवरायांनी अत्यंत बारकाईने हि मोहीम फत्ते केली. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी कोणती माणसं निवडली, त्यामागे महाराजांचा काय हेतू होता? याच उत्तम विश्लेषण रणजित देसायांनी लक्ष्यवेध मध्ये केलं आहे. अफझल वधानंतर मराठयांनी केलेला रणसंग्राम अविश्वसनीय आहे. शत्रू फक्त मारून विजय मिळवणं महाराजांना मान्य नव्हतं; त्याला पुरता नेस्तनाबूत करण्याचे धोरण त्यांनी आखलं आणि सफल करून दाखवलं. रडतोंडीच्या घाटात मराठयांनी केलेल्या कत्तलीला इतिहासात तोड नाही. गर्विष्ठ अफझलखानाचा वध करून महाराजांनी बारा मावळातच नव्हे तर आदिलशहा, मुघलांसारख्या शत्रूच्या मनात आपली दहशत निर्माण केली. ह्या रणसंग्रामाचे एकूणएक बारकावे लेखकाने आपल्या पुस्तकातून अचूक मांडले आहेत. अफझल भेटीसाठी प्रतापगड उतरणारा शिवसूर्य वाचत असताना आपलंही हृदय आपोआप धडधडू लागतं, श्वास रोखला जातो. इतिहास माहित असतानादेखील एक अनामिक भीती मनात रेंगाळत राहते, वेळोवेळी अंगावर काटा येत राहतो. असा हा मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारा क्षण रणजित देसायांनी ज्या ताकदीने पेलला आहे त्याला सलाम करावसा वाटतो.
इतिहासाला जराही धक्का न लावता केवळ एका प्रसंगावर पूर्ण कादंबरी लिहिण्याचं काम रणजित देसायांसारखा तुल्यबळ लेखकचं करू शकतो. अलंकारिक भाषा, ऐतिहासिक माहितीचा खजिना आणि न संपणार शब्द भांडार यांनी हि कादंबरी उत्तमरित्या जुळून आली आहे. काही ऐतिहासिक पण थोडक्यात वाचायच असेल तर हि कादंबरी तुम्ही वाचू शकता. आणि एकदा का हि वाचून झाली तर श्रीमान योगी वाचण्याचा मोह तुम्हाला कदापि आवरणार नाही याची मला खात्री आहे. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक ज्याला म्हणतात तो अफझल वध नक्की वाचावा म्हणून खास वाचकांसाठी "लक्ष्यवेधचा" थोडक्यात घेतलेला हा वेध.
-© गिरीश अर्जुन खराबे.