कोवळे दिवस - व्यंकटेश माडगूळकर | Kovale Diwas - Vyankatesh Madgulakar | Marathi Book Review

कोवळे-दिवस-व्यंकटेश-माडगूळकर-Kovale-Diwas-Vyankatesh-Madgulakar-Marathi-Book-Reviews
पुस्तक कोवळे दिवस लेखक व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १४० मूल्यांकन .४ | ५

का कोण जाणे, एखादा लेखक आपल्या मनाला भिडला की आपण त्यांचीच अजून पुस्तके शोधू लागतो... काहीतरी कुठेतरी समानता प्रस्थापित करण्याचा उगाचच प्रयत्न करू लागतो. माझंही तसच झालं आहे. "व्यंकटेश माडगूळकर" लिखित "बनगरवाडी" हातात आली... अक्षरशः भाषेच्या, निसर्ग वर्णनाच्या, त्यांच्या सक्षम आणि अगदी तीक्ष्ण नजरेने हेरलेल्या बारकाव्यांच्या प्रेमातच पडलो. आपसूकच उत्साहाने "कोवळे दिवस" हातात घेतली, आणि अजून एक विलक्षण प्रवास सुरू झाला.

पहिली काही पाने भ्रमात पाडणारी होती, नक्की पुस्तकाचं स्वरूप काय आहे ते समजेना, कशावर आहे समजेना, पुस्तकाचा मजकूर हा नावाशी संबंधित असलेल्या गोष्टींशी मेळ खाईना. पण नंतर मात्र कथा पुढे झपाट्याने सरसावली. रात्रीची अंधुक वाट हळू हळू उजेडाने पाऊलापुरती दिसावी, तशी एक एक पात्र कथा आपल्या समोर नीट मांडत जातात आणि लेखकाचा खास हातखंडा असलेली.. गोष्ट समजू लागते.. जाणवू लागते. राजा नावाच्या एका स्वातंत्र्य पूर्व चळवळीत सक्रिय असणाऱ्या एका तरुणाच्या अनुषंगाने विविध घटना मांडल्या जातात. त्या वेळेची सामाजिक, राजकीय, व नायकाच्या घरातील परिस्थिती यावर एका तरुण मुलाची मते आपल्याला पुस्तकातून पहायला मिळतात.

माडगूळकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो, स्वच्छ सुंदर निसर्ग आणि त्यात आपण बुडून जातो. या पुस्तकातही अनेक प्रकारे निसर्गाशी मैत्री असणारा कथेचा नायक तो अजूनच खुलवून दाखवतो. प्राणी, पक्षी यांची बारीक निरीक्षणं वाचून हैराण व्हायला होतं. कथेतील नायकाला असणारी चित्रकलेची गोडी.. त्याने त्यासाठी निवडलेले विषय आणि त्यावर रेखाटलेली चित्र लेखकाच्या लेखणीतून.. वाचकांच्या अंगी भिनत जातात.

"काही दिवसातच माझ्या ध्यानात येऊन चुकलं की, यांच्या माझ्यात आता अंतर पडलं आहे. बालपणीचा तो झरा आता आटला आहे. मैत्री सुद्धा रोपासारखी जोपासली तर वाढते, नाहीतर सुकून जाते."

कोवळे दिवस एका तरुणाची कथा आहे. पुस्तकात त्याच्या मनात भेडसावणारे सारे प्रश्न आहेत, स्वतःशी प्रामाणिक संवाद आहे, स्वतःकडून काही मोजक्या अपेक्षा आहेत, आणि देशाप्रती.. समाजाप्रती बांधिलकी देखील आहे. या सगळ्यांमधेच माणसांच्या घोळक्यात एकटा पडलेला एक नायकही आहे. आणि अगदीच जाणून बुजून भाष्य न केलेले, मनातले प्रेम देखील आहे. पुस्तक वाचून आपणही निसर्गाकडे नवीन प्रकारे बघतोच, पण तारुण्याकडेही बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला सापडतो. एक उत्तम वाचण्याजोगे आणि वाखाणण्याजोगे पुस्तकं आहे. नक्की वाचा!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form