पुस्तक | जंगलाचं देणं | लेखक | मारुती चितमपल्ली |
---|---|---|---|
प्रकाशन | साहित्य प्रसार केंद्र | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १३५ | मूल्यांकन | ३.६ | ५ |
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात निसर्गाचं काहीना ना काही योगदान हे आहेच. माणसाच्या मनाचे अनेक पैलू असे आहेत की ज्यामुळे, आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडते. यात खूप मोठा प्रभाव हा जंगलांचा आहे, कारण निसर्गाच्या सर्वात जवळ जंगल आहे. तिथे झाडवेली आहेत, पशुपक्षी आहेत, झरे, तलाव आणि धबधबे आहेत. माणसाची उत्क्रांती देखील तिथूनच झाली आहे. पण आता जसे जसे आपण शहराकडे जात आहोत तसे आपले जंगलाची माहिती कमी कमी होत आहे. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर असणारे अनेक पक्षी ओळखता येत नाहीत.. आपण निसर्गाच्या बाबतीत मात्र अनभिज्ञ असल्याचे आढळून येत आहे.
मारूती चितमपल्ली यांनी अनेक वर्ष निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत केले आहेत. अनेक जंगलांची पाहणी केली आहे, पशू-पक्ष्यांच्या हालचालींचा अनेक वर्ष अभ्यास केला आहे. "जंगलाचं देणं" या पुस्तकांत त्यांनी आपल्याला निसर्गाच्या अनेक माहित नसणाऱ्या गोष्टी समोर आणून दिल्या आहेत. अनेक वैशिष्ट, अनेक प्रकारचे उपयोग त्यातले बारकावे या पुस्तकातून पुस्तक प्रेमींसाठी आणि तसेच निसर्ग प्रेमींसाठी त्यांनी पुस्तकातून पोहचवले आहेत. यामुळे मला हे पुस्तक वाचताना खूपच मजा आली.
पुस्तकात "पलाश, मोह" अशा काही झाडांबद्दल सुंदर माहिती दिली आहे आणि त्याचसोबत "रातवा, ढोकरी, पानपिपोई" अशा सुंदर पक्षांबद्दल माहिती दिली आहे. झाडांचे उपयोग, त्यांचे फायदे, त्याच सोबत अनेक पक्ष्यांची दिनचर्या त्यांच्या आयुष्यातील अनेक नवीन गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करतात. पुस्तकांच्या मधल्या काही भागात काही गोष्टी संथ वाटतात पण पुस्तकाच्या शेवटी मात्र पुन्हा ते अनुभवाचे बोल आपल्याला मस्त वाटायला लागतात. चितमपल्ली यांचे लिखाण मोहक आहे. त्यात त्यांनी केलेली वर्णने आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. निसर्गाचे अनेक बारकावे आणि संदर्भ आपल्यालाही माहिती असतात त्यामुळे पुन्हा वाचताना छान वाटते. त्यातले विज्ञान आणि जंगलाची माहिती अतिशय मौल्यवान आहे आणि सोबतच एक उर्जा देणारी आहे.
कोणत्याही प्रवासाच्या वेळी चितमपल्ली यांची पुस्तके तुम्ही घेऊन बसू शकता. हेही तसेच अगदीच छोटेखानी पण तितकेच सुंदर असे पुस्तक. छोट्या छोट्या गोष्टीतून निसर्गाची एक झलक मिळते. तुम्ही वाचले नसेल तर नक्की हे पुस्तक वाचून पाहू शकता.