हिंदू - भालचंद्र नेमाडे | Hindu - Bhalchandra Nemade | Marathi Book Review

हिंदू-भालचंद्र-नेमाडे-Hindu-Bhalchandra-Nemade-Marathi-Book-Reviews
पुस्तक हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ लेखक भालचंद्र नेमाडे
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ६०३ मूल्यांकन .९ | ५

मी कोसला वाचत असताना माझी नेमाडेंशी ओळख झाली ते पुस्तक म्हणजे त्यांच्या जीवनाचा सार आहे. त्यातील मनीच्या रडण्याच्या हुंदक्यांनी, अजूनही माझ्या मनात कासावीस होते. आणि मग मी हाती घेतलं "हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ" आणि त्याला दिलेल्या नावाप्रमाणेच ती एक खरच अडगळ आहे. जी आपल्याला हळूहळू समृद्ध बनवत जाते आणि हवीहवीशी वाटते. "मी खंडेराव" इथून सुरू होणारी कहाणी अगदी वेड लावून टाकते. या पुस्तकाला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविले आहे आणि हे पुस्तक आहेही तसे. 

मोरगाव या एका छोट्याशा खेड्यातील एका गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या एका पुरातत्व संशोधक खंडेराव मोरगावकर याची ही कथा. ही कथा बोटावर मोजण्या सारखी नाहीच मुळी. अगदी विस्तृत विवेचन, अगणित प्रसंग आणि अगणित पात्र यांनी या कथेला एक नवीन ओळख दिली आहे. प्रत्येक तऱ्हेचे पात्र, प्रत्येक पात्राचे वेगळे स्वभाव नेमाड्यांनी सगळ अगदी बारीक टिपल आहे. अश्मयुगापासून ते आत्ताच्या प्रगत मानवजाती पर्यंतच्या संपूर्ण वाटचालीचा एक शोध निबंध पाकिस्तान मध्ये सादर करणारा खंडेराव. शोधनिबंध सादर करताना त्यांनी मांडलेला हिंदू संस्कृतीचा उत्क्रांतीवर मोहनजोदडो हडप्पा यासारख्या ऐतिहासिक अवशेषांवरील अधिकार एकच गोंधळ उडवून टाकतो.

स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्योत्तर काळ, हिंदुस्थान आणि पाकिस्तान, अश्मयुग ते प्रगत आणि विज्ञानयुग. या प्रत्येकाची लेखकाने घातलेली सांगड म्हणजे डोकं हैराण करून टाकणारी एक महा विक्राळ अशी कादंबरी आहे. प्रत्येक पात्र हे स्वतःशी पूरक आहे, त्यातून कथेचा नायक सूत्रधार खंडेराव म्हणजे कथेचा आत्माच आहे. स्वतःचे भावविश्व कधीही न समजलेल्या नायकाला जेव्हा दुनियेचा सार कळायला लागतो तेव्हा खरी कहाणी खुलते आणि तिथेच संपते देखील. आणि मग आपण विचार करायला लागतो की हे जे झालं ते काय होत? यातून बोध काय घ्यावा? ही सुरुवात होती की शेवट? आपण खरंच सुधारत आहोत की विकृत विज्ञानात अडकून पडत आहोत? शेतीमध्ये दुष्टचक्र का? व्यापार काय? दलाल काय? त्यातून उलगडणारी राजनीति काय? या साऱ्यांनी शेतकऱ्याला जखडून ठेवले आहे. कामगार कष्टकरी वर्ग ऑफिसला जात आहे का? या सऱ्यानी तुम्ही भांबावून जाल.

नेमाड्यांच्या अनुभवातून उलघडणारी एक सुंदर वीण, भव्य संस्कृतीचे पाल्हाळ, मानवी जाणीवांचा अभूतपूर्व सोहळा आपल्या जिभेवर एक बेमालुम चव रेंगाळत ठेवते. भाषा समजायला अतिशय कठीण आहे परंतु त्यातील सार आणि त्यातील मजा, लहेजा अगदी अवर्णनीय आहे. त्यातील मातीची ओल तुम्हाला पुस्तकाशी जोडत जाईल. त्यातील पहिल्या पानावरचा मजकूर माझा जसाच्या तसा पाठ आहे... आणि तो तुम्हालाही आवडेल असेच वाटते.

"ह्या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्रफेसात, निरर्थक न ठरो तुझ्या माझ्या प्रेमाचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा."

या ओळी तुम्हाला मंत्रमुग्ध तर करतीलच पण त्या विचारांच्या आणि पुस्तकाच्या प्रेमात देखील पाडतील. आयुष्याच्या वाटेवर एकदा तरी मराठी भाषेत गाजलेल, नावाजलेल आणि सर्व मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलेल हे पुस्तक नक्की वाचावे.

या पुस्तकासाठी भालचंद्र नेमाडे यांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमीच!! मराठीत अशी साहित्यकृती निर्माण करून देणे म्हणजे साहित्यविश्वातील मोनालिसाच.

-© अक्षय सतीश गुधाटे.

1 Comments

  1. Chan lihalay malahi vachyach pn bghu kadhi yog yetoy🙌🙌

    ReplyDelete
Previous Post Next Post

Contact Form