पुस्तक | गाइड | लेखक | आर. के. नारायण | उल्का राऊत |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २४० | मूल्यांकन | ४.६ | ५ |
'आर. के. नारायण' म्हणजे इंग्रजी साहित्यातील आपल्या विपुल लेखनाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं एक सुप्रसिद्ध नाव. त्यांच्या लिखाणांवर "मालगुडी डेज" सारखी मालिका लोकांच्या पसंतीस उतरली. हे सगळे त्याच्या सामान्य माणसाच्या अनुभवांचे लिखाणात केलेल्या रूपांतराचे यश आहे असे म्हणावे लागेल. गाइड हे पुस्तक देखील त्यांच्या याच लेखणीची कमाल आहे. या पुस्तकावर देखील "गाइड" हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मुळात इंग्रजी असणाऱ्या या पुस्तकाचा उत्तम अनुवाद रोहन प्रकाशनच्या 'उल्का राऊत' यांनी केला आहे. एका छोट्याशा मालगुडी नावाच्या गावातील ही कथा आपल्यासमोर हळूहळू येते आणि आपलं विश्व काबीज करून जाते.
अचानक एका तुरुंगातून सुरू होणारी कथा.. त्यात गुंफलेली माणसं.. आणि त्यांची परिस्थिती.. ही पुस्तकात अशा काही क्रमवारे मांडली आहे की, आपल्याला त्यांचा उलगडा करण्यासाठी, हे पुस्तक पुढे पुढे वाचावंच लागतं. मध्येच आपण ती गोष्ट विसरू लागतो आणि तेवढ्यात लेखक आपल्याला पुढ्यात जुन्या कथेचे मोहळ आणून सोडतो. त्यातल्या काही मधमाशा आपल्या विचारांना चावा घेऊन हैराण तर करतातच, पण कथेचे अनेक पैलू आपल्यासमोर मांडून आपल्याला भंडावूनही सोडतात.
साधी सरळ भाषा.. अगदी मोजकीच पात्रं.. कथेचा नायक राजू, त्याचे आई आणि अप्पा.. त्याची प्रेयसी रोझी.. नवीन 'मंगल' गावात झालेले त्याचे चाहते, वेलन आणि शाळा मास्तर.. त्याचा गाडी चालक मित्र गफूर.. आणि हॉटेलचा नोकर जोसेफ.. तसेच रोझीचा नवरा मार्को. अशी सरळ आणि एकसंध वाटणारी ही कथा.. तीन टप्प्यात आपल्यासमोर मांडली जाते लहानपणीचे दिवस, त्यानंतर तुरुंगाआधीचा काळ आणि वर्तमान. राजू जो पेश्याने गाइड आहे.. ज्याला प्रसिद्धीच वरदान मिळालेलं आहे, परंतु त्याच प्रसिद्धीच्या मागे लपलेले बोचरे सत्य, दुःख.. याची जाणिव होत जाते.. तशी ही कथा हळूहळू उलगडत जाते आणि आपण पुस्तकाच्या मोहजाळात अडकतो.
हे पुस्तक वाचून देखील, माझ्या मनाला अनेक प्रश्न भेडसावत आहेतच.. आणि म्हणूनच हे पुस्तक विसरणे शक्य नाही. म्हणजे कलासक्त रोझीचे प्रेम नक्की कुणावर होते? मार्कोला नक्की काय हवं होतं? वरवर चुकलेला वाटत असणारा राजू.. आधी बरोबर होता की आत्ता? यातला प्रत्येक प्रश्न तुमच्या रोजच्या विचारांच्या चौकटी मोडून, नव्याने विचार करायला लावणारा आहे. आयत्या विचारांचे हे पुस्तक नाही. जर हे पुस्तक आत्ताही मला, विविध विचारांचे कंगोरे दाखवत असेल.. तर समकालीन पुस्तकांच्या तुलनेत हे मला नक्कीच अनेक अंशी उजवे ठरताना दिसते.
भोगवादी राजूची साधू होण्याची प्रक्रिया तर आजही जशीच्या तशीच लागू पडताना दिसते. राजू गाइड नक्की कोणती दिशा दाखवेल हे तुम्हालाच पुस्तक वाचून पाहावं लागेल. तुम्हाला हे पुस्तक एक वेगळच विश्व दाखवेल, अशी माझी खात्री आहे. बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी आणि चालू वर्तमानाला समृद्ध करणारी, ही एक उत्तम कादंबरी आहे यात तिळमात्र शंकाच नाही. राजूचा हा प्रवास जरूर वाचा.. "प्रवासी गाइड ते अध्यात्मिक गाइड".