पुस्तक | ग्रेसच्या कविता : धुक्यातून प्रकाशाकडे | लेखक | श्रीनिवास हवालदार |
---|---|---|---|
प्रकाशन | कॉन्टिनेन्टल प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २१८ | मूल्यांकन | ४.१ | ५ |
ग्रेस या नावातच अनेक भावना सामावलेल्या आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यांनी लिहिलेल्या कविता या अनेकांनी दुर्बोध ठरवून त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेतली आहे. परंतु ग्रेसच्या कविता समजून घेणे ही एक प्रचंड शिवधनुष्य आहे आणि त्या मागचा खरा अनुभव आणि विचार समजुन मांडणे आणि हे दोन्ही एकत्रित करून दाखवून लेखक-समीक्षक श्रीनिवास हवालदार यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे हे दिसून येते. ग्रेस यांच्या कवितांमागचा गूढार्थ त्यातील अनेक संदर्भ व त्याचे पुरातन, समकालीन उदाहरणे देऊन ते आपल्या सर्वांसाठी सुलभ व सोपे करून दिले आहे. याबद्दल आपण लेखकाचे आभारी असायला हवे.
ग्रेस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आदीम दुःख, वानगीदाखल जरी दाखवायच्या म्हटल्या तरी कितीतरी कविता आहेत. म्हणूनच ते स्वतःला "दुःखाचा महाकवी" म्हणत.
"स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे?
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे.."
"ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता"
"जे सोसत नाही असले तु दुःख मला का द्यावे
परदेशी आपल्या घरचे माणूस जसे भेटावे"
"कोणी आपले म्हणणे ना कुणी बिलगेना गळा
कंठ दाटताना झाला रंग कावळ्याचा काळा"
"भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकवीली गीते"
अशा किती कविता सांगाव्यात... त्यांच्या प्रत्येक कवितेतून एक वेगळेपणाची जाणीव सतत भासत राहते.. मनाला टोचत राहते. नीट निरखून पाहिले तर त्यांच्यावर मर्ढेकरांच्या कवितांचा खूप मोठा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसतो.
ग्रेस यांच्या कवितेला आपण नीट बघितलं तर त्यांच्या अनेक कवितांमधून एकाच विषयाची पुनरावृत्ती आपल्याला अनेकदा पाहायला मिळते.. आई, उर्मिला, कर्ण, राधा-कृष्ण, सत्यभामा आणि रुक्मिणी, आणि याचसोबत संध्याकाळ, मुक्तता, उदासीनता आणि दुःख! दुःख आणि उदासीनता हा तर ग्रेस यांच्या कवितेचा मूळ गाभा असल्यामुळे हे श्रीनिवास हवालदार यांचे हे रसग्रहण खूपच महत्त्वाचे वाटते. त्यामागच्या भावना समजून घेताना याचा अर्थ लागतो. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या कविता निवडून त्याचा भावार्थ स्पष्ट केला आहे. त्याच सोबत ग्रेस यांच्या कवितेची कवाडं सर्वसामान्यांसाठी उघडी करून दिली आहेत.
प्रत्येक कवितेमागचा अर्थ, संदर्भ आणि या दोघांना जोडून एक पूल बांधून आपल्यासाठी साध्या सोप्या आणि रुचकर अशा शब्दात सर्व कवितांच रसग्रहण आपल्याला या पुस्तकातून बघायला मिळेल. ज्या रसिकांना कविता आवडते.. ज्यांना ग्रेस समजणं थोडं अवघड जातं.. अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मला वाटत एक मैलाचा दगड आहे अस वाटतं. कवितांची आवड असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे आणि आपले प्रामाणिक मत आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवावी.