पुस्तक | दंशकाल | लेखक | हृषीकेश गुप्ते |
---|---|---|---|
प्रकाशन | राजहंस प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ४२० | मूल्यांकन | ४.२ | ५ |
दंशकाल... नावाप्रमाणेच काळाच्या प्रत्येक टप्प्यात दंश सहन करत वाताहत होत गेलेल्या एका घराची ही कहाणी आहे. गावची देशमुखी सांभाळणारं कुटुंब हळूहळू काळाच्या तडाख्यात सापडून उध्वस्त होतं आणि हे सगळं आपल्या डोळ्यादेखत घडत असताना ते पाहण्यापलिकडे काहीही करू न शकणाऱ्या नायकाची (मानसोपचारतत्ज्ञाची) कथा या कादंबरीतून लेखकाने मांडली आहे. कोकणात घडणारी ही कथा वेगवेगळी वळणं घेत वाचकाला अडकून ठेवते. कोकण म्हटलं की भुताखेतांच्या सुरस कथा आपण सर्रास ऐकतो, त्याचाच आधार घेत एक रहस्यमय कथानक वाचकांसमोर दंशकाल मधून उभं राहतं. मानवी मनावर होणाऱ्या आघातांमधून निर्माण होणारं एक अजब विश्व आणि त्या विश्वात अडकून पडलेल्या मानसिक रुग्णाची, कथानायकाच्या काकाची धडपड लेखकाने मांडली आहे. स्वतः यशस्वी डॉक्टर असून आपल्या चुलत्याच्या अंतर्मनात शिरण्याचे धाडस न करू शकलेला नायक, त्याचा गैरफायदा उठवणारी घरातलीच माणसं, त्यातून घराण्याचा झालेला ऱ्हास, समाजात झालेली नाचक्की याची शब्दरूपी बांधणी दंशकाल मध्ये लेखकाने केलेली आहे.
अंधविश्वास, देवभोळेपणा, भोंदूगिरी, शारीरिक वासना, वासनेतून घडणारी दांभिक कृत्ये व या सगळ्याला बळी पडणारा आपला भवतालचा समाज असे अनेक जिवंत प्रश्न या कादंबरीमधून लेखकाने वाचकांसमोर मांडले आहेत. एकत्र कुटुंबामधले नातेसंबंध, गृहकलह व त्यातून विस्कटत जाणारी घडी यावर पद्धतशीर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रसंग रेखाटण्याची हातोटी, जागोजागी जपलेला कथेचा रहस्यमयी गूढ बांध आणि हळूहळू त्या सगळ्यावरचा उठणारा पडदा यामुळे कथानकातील रोमांचकता अबाधित राहिली आहे. गूढ गोष्टींची आवड व उत्सुकता असणाऱ्या वाचकांसाठी दंशकाल एक उत्तम खाद्य आहे असं मला वाटतं. कादंबरी वाचत असताना आपली विचारचक्र त्यातल्या पात्रांभोवती सतत फिरत राहतील याची काळजी लेखकाने घेतलेली आहे. अशा या रहस्यमयी कथेचा शेवटही उत्तम जमला आहे, त्यात कुठेही अपूर्णतेचा अंश राहिलेला नाही. एक चांगलं पुस्तक वाचल्याचं समाधान नक्कीच यातून वाचकांना मिळेल. तसेच वाचून झाल्यावर आपण दुसऱ्यांनाही ते वाचण्याचे आवाहन कराल यातच कथेच्या जिवंतपणाची खरी ताकद दिसुन येईल.
दंशकाल व त्यातले घटनाक्रम तुमच्या मनाला नक्कीच काही सुखद व काही दुःखद असे दंश देऊन जातील. केवळ एक पुस्तक म्हणून त्याकडे बघणे मला तरी सोयीचं वाटतं नाही, हे सगळं कुठेतरी आपल्या आसपासही घडत आहे, घडत असेल. मात्र त्याची जाणीव आपल्याला होत नसेल किंवा ती अस्पष्ट झाली असेल तर समाज म्हणून आपल्या जाणीवा घट्ट करण्याचं काम या कादंबरीने केलेलं आहे असं मला वाटतं. ऋषिकेश गुप्ते लिखित या उत्तम कथानकाचा भरपूर आस्वाद वाचकांनी घ्यावा म्हणून हा माफक सारांश इथे मांडला आहे. तुम्हाला या कादंबरीबद्दल काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका...
तोपर्यंत... दिसामाजी एकतरी पान वाचत रहा!!
-© गिरीश अर्जुन खराबे.