पुस्तक | चाणक्य | लेखक | भा. द. खेर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ३४८ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
लहानपणापासूनच आपण चाणक्य हे नाव अनेक वेळा ऐकले असेलच. कुटनिती, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, भावशास्त्र आणि अशा अनेक शास्त्रांमध्ये पारंगत असलेले, एक तेजस्वी ब्राह्मण म्हणजे चाणक्य. अशी त्यांची जगभर ख्याती आहे. ऐकिवातील गोष्टींनी भारावून गेलो असतानाच मला हे पुस्तक हाती लागले. साधी सोपी भाषा, चौकस विचारी दृष्टी आणि प्रसंग वर्णन हे या पुस्तकाचे तीन मुख्य पैलू आहेत.
लहानपणी वडिलांना मिळालेली प्राणघाती शिक्षा, त्यासोबतच स्वतःचा झालेला छळ, घरातील परिस्थितीही बेताची आणि अशातच राज्यातील ढासळलेली सुव्यवस्था, वाढत चाललेली बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांना बंद करण्यासाठी आपण स्वतः काहीतरी पाऊल उचलायला हवे ही मनीची इच्छा. या अशा जिद्दीने पेटलेल्या लहान मुलाची ही एक प्रेरणादायी कथा. "माजलेल्या आणि दुर्व्यवहारी राजाला आपण स्वतः धडा शिकवणार" अशी शपथ घेऊन तक्षशिला जाऊन आणि तिथून सगळ्या विषयात पदव्युत्तर होऊन तिथेच काही काळ शिकवून पुन्हा राज्यात चाणक्य येतात.
पुस्तकात अगदी चाणक्य लहान असल्यापासून त्यांचा स्वभाव, त्यांचे गुण आणि त्यांच्यातील सर्व सुप्त कला यांचे मिश्रण. त्याचा त्यांच्या आयुष्यभर असलेला एक प्रभाव दाखवलेला आहे. कूटनीति बद्दल जरी या पुस्तकात खूप काही वाचायला मिळाले नाही तरीदेखील त्यांच्या प्रभावाने आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव मिळेल. लेखकाने अगदी बारीक गोष्टींचा तपशील देऊन हे पुस्तक अजून सुरेख बनवले आहे.
आपण कितीही लहान, कितीही बारीक आणि कितीही शक्तीहीन असलो तरीही आपण संपूर्ण जग बदलू शकतो हे या पुस्तकाने दाखवून दिले आहे आणि हेच चाणक्य यांच्या व्यक्तिमत्वातून आपण शिकू शकतो. चंद्रगुप्त मौर्य ला सोबत घेऊन आणि त्याचे संगोपन करून धनानंद राजाची सत्तापालट हिच पुस्तकाची जमेची बाजू आहे. अनेकांचे दुमत असले तरीही मला हे पुस्तक नक्कीच आवडले आहे आणि आयुष्यातील लहानसहान गोष्टींमध्ये याची शिकवण कामी आली आहे.