आपण सारे अर्जुन - व. पु. काळे | Aapan Sare Arjun - Va. Pu. Kale | Marathi Book Review

आपण-सारे-अर्जुन-व-पु-काळे-Aapan-Sare-Arjun-Va-Pu-Kale-Marathi-Book-Reviews
पुस्तक आपण सारे अर्जुन लेखक व. पु. काळे
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १४० मूल्यांकन ४.५ | ५

अज्ञानात सुख असतं हे ऐकलं आहे परंतु अडगळीत देखील सुख असू शकतं याचा प्रत्यक्ष अनुभव तेंव्हा आला जेंव्हा कपाट साफ करत असताना प्रदीर्घ काळापासून वाचायची इच्छा असणारं पुस्तक सहज हाताला लागलं. एका वाचकासाठी याहून वेगळं सुख ते दुसरं काय? एकशे चाळीस पानांतून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सगळे अर्जुन का आणि कसे बनतो हे उदाहरणांसकट वपु काळे आपणाला पटवून देतात. वपुंना जीवन कळले होते असे आपण सहज म्हणून जातो ते यामुळेच! घडणाऱ्या व घडविल्या गेलेल्या कलाकृतींबद्दल बोलताना लेखक म्हणतो कि, "कलाकृती निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही." कारण एखादी गोष्ट घडवताना माणसाला असलेल्या ज्ञानापेक्षा किंवा त्याच्या कक्षेबाहेर जाऊन ती कधी घडवता येत नाही. आपल्या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहत असतो आणि त्याप्रमाणेच ती आकार घेत असते. अशी कित्येक निरीक्षणे "आपण सारे अर्जुन" या वैचारिक पुस्तकातून वपुंनी मांडली आहेत. आपण सगळ्यांनीच ते पाहिलेलं, उपभोगलेलं आहे. परंतु जे वपुंनी पाहिलं ते आपल्याला कधी पाहताच आलं नाही. वैवाहिक जीवनाबद्दलचे अनेक प्रसंग यात रेखाटले आहेत वा वपुंनी त्यावर आपले विचार मांडले आहेत. वपु म्हणतात,
"हे असं का? या तीन शब्दांनी माझा अर्जुन केला. मला वाटतं प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतः सारखं करण्याच्या खटाटोपात असतो. संघर्षाचं हेच कारण आहे."
विधात्याने हर एक तऱ्हेची माणसं घडवली आणि त्या प्रत्येकाला आपापलं स्वरूप दिलं, विचार दिला. इतकी माणसं घडवताना त्याने गफलत केली नाही, प्रत्येकाला स्वतंत्र विचार, मत दिले आहे; परंतु माणूस म्हणून आपली इथेच गल्लत होते व आपण दुसऱ्याला बदलायचा खटाटोप करत बसतो. मग यातूनच मानसिक, वैचारिक संघर्ष पेटत जातो. नवरा-बायको या नात्यावर वपुंनी आपल्या सहज शब्दांत प्रकाश टाकला आहे. तो इतका प्रखर व सत्य आहे की आपण त्याला नाकारू शकत नाही. ते सांगतात,
"शुभविवाह इथेच आम्ही थांबलो आहोत. शुभसंसार ह्याच्याशी किती जणांना कर्तव्य आहे? दोघांपैकी एकाने अरेरावी वाढवायची, दुसऱ्याने सहनशक्ती."
आज देखील कित्येक संसार असेच सुरू आहेत आणि जोपर्यंत आपण त्या समस्येच्या पातळीपर्यंत जाऊ शकत नाही तो पर्यंत आपण सगळे अर्जुनच! वपु म्हणतात जगात तीन प्रकारची माणसं आहेत; अविचारी, विचारी आणि निर्विचारी. ज्याला कशाशी काहीही घेणं नाही, परिणामांची चिंता नाही तो अविचारी. उदाहरणार्थ दुर्योधन ज्याला कसलीच पर्वा नव्हती. जो सगळ्याच गोष्टींकडे तटस्थ अन त्रयस्थपणे पाहू शकतो. शक्यता अशक्यतेपलीकडे जाऊन पाहू शकतो तो निर्विचारी आणि जो संभ्रमात पडतो तो विचारी. कारण ज्याला परिणामांची चिंता भेडसावते, कृती करण्याआधी जो त्याच्या परिणामाचा विचार करतो तो विचारी. म्हणूनच कुरुक्षेत्रावर आपलेच सगेसोयरे, गुरुजन पाहून अर्जुन संभ्रमात पडला त्याने कृष्णाला विचारलं हे युद्ध कशासाठी आरंभल आहे? यातून काय हाती लागणार आहे? हा विचार अर्जुनाने केला मात्र मला हे राज्य नको, थांबवं हे युद्ध असं तो म्हणाला नाही कारण सत्तास्वार्थ त्यात दडला होता आणि म्हणूनच अर्जुन विचारी व कृष्ण निर्विचारी ठरतो. कृष्णाने केलेल्या सगळ्या कृत्यांमध्ये त्याचा स्वार्थ कोठेच नव्हता. म्हणूनच जेंव्हा जेंव्हा आपण स्वार्थरूपी संभ्रमात पडतो तेंव्हा तेंव्हा आपला अर्जुन होतो हे वपु पटवून देतात. मनाच्या एका कोपऱ्यात कोरून ठेवाव्यात अशा कितीतरी ओळी आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. त्या वाचत असताना आपण त्या अनुभवलेल्या देखील असतात पण त्यातील दडलेला अर्थ वपुंनी आपल्याला नव्याने उलगडून दाखवला आहे. कोणत्याही वयाच्या वाचकाला भुरळ घालू शकेल असे हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवं. आयुष्यात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं यातून मिळतील असं नाही मात्र त्या समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण नक्कीच सुधारू शकतो. अनेक प्रसंगात आपण स्वतःला अर्जुन होण्यापासून वाचवू शकतो. समस्येच्या पातळीपर्यंत जाऊन ती सोडवण्याची कृष्णबुद्धी आपल्याला मिळेलच याची शाश्वती तर नाही मात्र कोणत्याही समस्येत आपला अर्जुन होत असताना आपण कृष्ण शोधायची धडपड नक्कीच करू शकतो. जीवनक्रम आचरताना भेडसावणाऱ्या सर्व समस्या, व्यथा व टोचत राहणारे शल्य याची थोडक्यात जाणीव करून देणारा हा वैचारिक ग्रंथ आहे. असं म्हटलं तर वावगं ठरू नये, इतक्या सुलभतेने वपुंनी ते सगळं "आपण सारे अर्जुन" मधून व्यक्त केलं आहे. पुस्तक वाचून झाल्यावर आपल्या सहज लक्षात येईल की आपण सारे अर्जुन हेच नाव त्यांनी या पुस्तकाला का म्हणून दिले असेल. एकदातरी हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि आपल्या प्रियजनांना आठवणीने भेट द्या!

गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form