पुस्तक | ययाति | लेखक | वि. स. खांडेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ४३२ | मूल्यांकन | ४.७ | ५ |
मराठी माणसाच्या मनात घर करून असलेली व जनमानसांकडून चर्चा ऐकलेली "ज्ञानपीठ पुरस्कार" प्राप्त कादंबरी! कुरु वंशातील राजा ययाती आणि त्याच्या जीवनचरिताचा आधार घेऊन मानवी जीवनातील अनेक पैलू, वलये व संक्रमणे यांना ही कादंबरी अलगद स्पर्श करते. पिढ्यानपिढ्या वाचणाऱ्या वाचकाला ती नेहमीच समकालीन वाटते याचे गूढ वि. स. खांडेकरांनी रेखाटलेल्या पात्रांच्या धाटणीत लपलेलं आहे. इंद्रावर विजय मिळवणारा राजा नहूष स्वर्गाचा राजा झाल्यावर उन्मादाने इतका हुरळून जातो की ऋषींनाच तो आपल्या पालखीचे भोई बनवतो. "नहुषाची मुलं कधी सुखी होऊ शकत नाही" हा त्यातल्याच एका ऋषीकडून मिळालेल्या शापाने यती आणि ययाति यांच्या वाट्याला येत ते केवळ अन केवळ अतृप्त आयुष्य! असा हा राजा नहूष आपल्यातही असतो आयुष्याच्या अनेक प्रसंगात तो आपण जनमानसात पाहतही असतो. वासनांध ययाति, गर्विष्ठ देवयानी, कोपिष्ट आचार्य शुक्राचार्य, आयुष्याचं तत्वज्ञान कळलेला कच, पितृआज्ञेपोटी दासीत्व स्वीकारणारी शर्मिष्ठा व दोष नसतानाही हलाखीतलं मरण लाभलेली सोनेरी केसांची अलका आजही अवतीभवती आपल्याला सहज पाहायला मिळतात.
माणसाच्या ठायी असणाऱ्या दुर्गुणांना तो जोपर्यंत जोपासत राहतो तोपर्यंत ते त्याचा छळ करतात आणि हे सांगताना खांडेकर म्हणतात कि,
"वासना ही अशी गोष्ट आहे जिचा आपण जितका उपभोग घेऊ तितकी ती फोफावत जाते!"
आचरणात आणाव्यात अशा कित्येक गोष्टी ययाती आपणास सहज देऊन जाते फक्त वाचणाऱ्याकडे तो घेण्याचा दृष्टिकोन हवा. सामान्य वाचकाला ती फक्त वासनेने भरलेली अश्लील कहाणी वाटू शकते आणि तिथेच खरेतर आपली वाचक म्हणून लेखक कसोटी पाहतो! यात तुम्ही जिंकलात तर आयुष्यातही जिंकाल यात शंका नाही.
आपल्या बापाच्या कृत्यामुळे आपण कधीच तृप्त होऊ शकत नाही या भयाने ऐन उमेदीत राज्य, ऐशो-आराम, विलासी आयुष्य या वासनेने भरलेल्या गोष्टींपासून यती दूर जंगलात निघून जातो पण त्या ब्रह्मचर्यातही त्याला तृप्ती लाभत नाही. संकटांपासून पलायन करून ती कधी संपत नाही याच हे उत्तम उदाहरण लेखक आपल्याला देतो. त्याग केला म्हणजे सुख मिळेलच असं नाही, जोपर्यंत लालसा मरत नाही तोवर तृप्ती लाभत नाही हे जीवनसुत्र ययाती आपणास देऊन जाते.
ययाति सारखा राजा नवरा मिळून देखील देवयानीला तो कधीच मिळाला नाही. आपण शुक्राचार्यांची कन्या आहोत आणि हा ययाति मला सोमरस प्राशन करून स्पर्श करतो हे तिच्या गर्विष्ठ मनाला पटत नाही. पदोपदी ती त्याला आपण कसे श्रेष्ठ आहोत याची जाणीव देत असते. शरीरसुखासारख्या नाजूक क्षणी देखील नवऱ्यापुढे तिच्यातला अहंकार विजयी ठरतो. या न अशा कित्येक कारणांमुळे ययाती तिच्यापासून दूर होऊन व्यसनात अडकत जातो, यात दोष केवळ देवयानीचा नाही पण तिचा अहंकार त्याला कारणीभूत ठरतो हेही नाकारता येत नाही. राजकन्या असूनही दासीत्व स्वीकारणाऱ्या शर्मीष्ठेचा समोर येणाऱ्या परिस्थितीला न डगमगता तोंड देण्याच्या गुणाला लेखक पुरेपूर न्याय देतो हे कथेच्या शेवटी ध्यानी येतं.
हरएक पात्र साकारताना मानवी जीवनाला भुरळ पाडणाऱ्या कित्येक प्रसंगांना आपण कसं सामोरं जावं याच जिवंत विश्लेषण म्हणजे "ययाति"! पुस्तक वाचताना आपण रमून जातो ते याच कारणांमुळे. आपल्याच जीवनातल्या काही मोहाच्या, अतृप्तीच्या वासनांध क्षणांना आपण स्वतः ययाति बनून भेट देतो ते केवळ अन केवळ खांडेकरांनी त्यात ओतलेल्या भाषेच्या विविध रसांमुळे, अलंकारांमुळे. अशी विविध रूपांनी नटलेली ही कादंबरी म्हणजे मराठी वाचकाला मिळालेली पर्वणीच. तिचा आपण यथेच्छ लाभ घ्यायलाच हवा कारण "ययाति" सारख्या रचना ह्या रोज रोज घडत नसतात आणि त्यातून लाभणारा ठेवा हा इतरत्र सापडत नसतो!
-© गिरीश अर्जुन खराबे.