पुस्तक | उडोनि हंस चालला आणि पद्मा | लेखक | गो. नी. दाण्डेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मृण्मयी प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २२३ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
नल, दमयंती आणि राजहंस या तिघांबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून त्यांच्या गोष्टीही ऐकल्या असतील. दमयंतीला पाहून तिच्यावर भाळलेला निषध देशाचा राजा नल एका राजहंसाला पकडून आपला प्रीती संदेश दमयंतीला पाठवतो. आणि मग उडोनि हंस चालला या कथेमध्ये सुरु होतो नल-दमयंती या दाम्पत्याचा प्रीतिप्रवास. गो नी दांडेकरांनी खुलवलेल्या दोन प्रीतीकथा आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतात. उडोनि हंस चालला हि नल-दमयंती यांची कथा आहे व पद्मा या शीर्षकाखाली लेखक जयदेव व पद्मा यांच्या प्रीतिकथेवर प्रकाश टाकतो.
दमयंतीचे स्वयंवर, त्या स्वयंवरात नल-दमयंतीची इंद्रदेवाने घेतलेली परीक्षा यांसारखे प्रसंग दांडेकरांच्या लेखनशैलीमुळे जिवंत झाले आहेत. विवाह बंधनानंतर काही दिवसातच आलेल्या संकटामुळे नल व दमयंतीला आपले राज्य सोडावं लागतं. हताश झालेला नल राजा एके दिवशी दमयंती झोपेत असताना सोडून निघून जातो. दुःखाने ग्रासलेली दमयंती त्याच्या शोधात इतरत्र भटकत असताना सुबाहू नगरीत येते. थोड्याच दिवसात विदर्भराजा आपल्या कन्या आणि जावयाचा शोध घ्यायला सुरु करतो. दमयंतीचा शोध लावण्यात तो यशस्वीही होतो पण नलाचा शोध काही केल्या त्याला लागत नाही. नलाचा शोध लागतो का? लागला तरी दमयंतीला तो भेटतो का? भेटल्यावरती ते आपले राज्य परत मिळवण्यात यशस्वी होतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे गोनीदांनी आपल्या विस्तृत शैलीत रेखाटली आहेत. नल-दमयंती या कथानकानंतर पद्मा या जगन्नाथपुरी नगरीत घडणाऱ्या कथेने पुस्तकाचा प्रवास पुढे पुढे सरकत राहतो.
तीन लग्ने करूनही निपुत्रिकच असणाऱ्या देवशर्मा या ब्राह्मणाला, जन्मलेलं अपत्य देवाला समर्पित करण्याच्या बोलीवर कन्यारत्न प्राप्त होतं. योग्य वयात येताच ती कन्या एके दिवशी तो देवाला देण्यासाठी पुरीला येतो. पुरीमध्ये आल्यावर साहित्यादिक्पती उपाधी प्राप्त केलेला जयदेव नावाचा तरुण त्यांना भेटतो. पद्मेच्या आईला झालेल्या दृष्टांतानुसार हे कुटुंब पद्मेला जयदेवाच्या हवाली करतात. पुढे त्यांचा संसार फुलू लागतो, देवापुढे गायन करणारे जोडपे म्हणून सगळ्या पुरीत त्यांचा नावलौकिक होतो. असाच काळ सरकत असताना एक दिवस सम्राट पुरीला भेट देतात, जयदेव आणि पद्माला भेटतात. सम्राज्ञी मात्र पद्मेचा हेवा करू लागते आणि कट करून तिची पतिव्रतेची परीक्षा घेताना घात करते. जयदेवचं पुढे काय होतं, त्याच्या प्रीतीच्या भक्तीपुढे जगन्नाथ प्रसन्न होतो का? हे समजून घेण्यासाठी कथा वाचलेलीच बरी. पद्मेचं बालपण ते पत्नीत्व व जयदेवाचं दारिद्रय ते पांडित्य या सगळ्याची जी रचना दांडेकरांनी केली आहे त्याला तोड नाही.
भाषेचा ओघ, कथा उभारण्याची हातोटी, प्रसंगवर्णनाने वाचकांना मोहिनी घालण्याची कला या एक ना अनेक गुणांनी गोनीदांनी या कथांना न्याय दिला आहे. कालानुरूप भाषेला वलय देण्याचं चोख कार्य त्यांनी या पुस्तकातून साकारलं आहे. पुरीच्या जगन्नाथाचा महिमा पद्मा या कथेच्या निमित्ताने त्यांनी वाचकांसमोर मांडला आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रीती यांचा सुरेख संगम त्यानिमित्ताने आपल्याला वाचायला मिळतो. नल-दमयंती बऱ्याचअंशी आपल्याला माहित असतील पण पद्मा हि पूर्णपणे नवीन कथा या पुस्तकाच्या निमित्ताने माझ्या वाचनात आली त्याबद्दल गोनीदांचे आभार. आपणही हे पुस्तक वाचून हे सगळं अनुभवू शकता आणि प्रीतीरसात स्वतःला बुडवून घेऊ शकता.
-© गिरीश अर्जुन खराबे.