पुस्तक | सीता मिथिलेची योद्धा | लेखक | अमीश त्रिपाठी |
---|---|---|---|
प्रकाशन | वेस्टलँड इंडिया | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ४२५ | मूल्यांकन | ४.४ | ५ |
बाईमुळे रामायण घडलं, बाईमुळे महाभारत घडलं असं आपण अनेकदा ऐकत असतो. पण खरंच रामायण, महाभारत घडायला फक्त बाईचं जबाबदार असते का? एखादी बाई त्या कथेची नायिका असू शकत नाही का? बाईकडे नेतृत्व करण्याचे गुण नाहीत का? तर ह्या सर्व प्रश्नांच उत्तर एकच, आहे! स्त्रीदेखील नायिका असू शकते, तिच्याभोवती देखील इतिहास घडला जातो. आणि हाच धागा प्रमाण मानून मला वाटतं अमिश त्रिपाठीने Sita- Warrior of Mithila (सीता - मिथिलेची योद्धा) हे पुस्तक लिहायचं ठरवलं असेल. मुळात सीता हा रामायणाचा खूप महत्वाचा भाग आहे यात शंका असण्याचं कारणच नाही. पण संपूर्ण पुस्तक तिच्यावर लिहिण्याइतपत अजून आपल्या लोकांना तिच्याबाबद्दल माहिती नाही. अजूनही ती रामाच्या बायकोच्या छायेतच अडकून पडली आहे. परंतु ह्या पुस्तकात तुम्ही ज्या सीतेला भेटणार आहात ती कोणाची बायको नाही, मुलगी नाही तर ती आहे केवळ एक योद्धा!
मिथिलेसारख्या छोट्या राज्याची ही राजकन्या खरंतर राजा जनक व राणी सुनयना यांना जंगलात सापडते. ते तिला दत्तक घेऊन तिचं संगोपन करतात. कसलाही आर्थिक लाभ नसल्यामुळे मिथिलेवर कोणी हल्ला करण्याची भीती इथल्या प्रशासनाला नसते. त्यामुळे आपसूकच राजा जनक राजकारणापेक्षा जास्त अध्ययनात अडकून पडतो. मोठमोठे ऋषी मिथिलेला ज्ञान जोपासनेसाठी भेट देत असतात. मात्र तरीही राज्य चालवण्यासाठी कारभार तर पहावा लागतोच, म्हणून राणी सुनयनावरती ह्याची जबाबदारी येऊन पडते. आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली सीताही याचे धडे गिरवत असते. सीता आणि सुनयना यांच्या नात्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी यानिमित्ताने वाचकांच्या निदर्शनास येतात. आईच्या निधनानंतर राज्यकारभाराची जबाबदारी सीतेकडे कशी येते? मायेचे छत्र हरपल्यानंतर कोलमडलेल्या उर्मिलेला ती कसा आधार देते? मिथिलेला संपन्न राज्य म्हणून उभारी देण्यासाठी सीतेचं योगदान नक्की काय असावं? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातून हमखास मिळतात.
ज्याकाळी राजा केवळ आपली ताकद वाढवण्यासाठी एखाद्या बलाढ्य साम्राज्याशी लग्न करायचा, त्याकाळी अयोध्याकुमार मिथिलेच्या राजकन्येशी लग्न का करत असावा? ह्याचा उत्तम पुरावा विशिष्ट घटनाक्रमांच्या आधारे अमिश आपल्याला पटवून देतो. राम सीता स्वयंवर, रावणाचे त्यात होणारं आगमन, त्याचा होणारा अपमान व त्यातून उध्दभवणार युद्ध हे सगळे प्रसंग वाचताना आपण पुस्तकात बुडून जातो. कसलीही फौज सोबत नसताना लंकेच्या दहा हजार सैन्याचा सामना मिथिला कशी करते? रावणाला यात पराभव स्वीकारावा लागतो का? विश्वामित्रांची नक्की भूमिका काय असते आणि विशेष म्हणजे रामाला चौदा वर्षे वनवास घडतो का? या सगळ्याची विस्तारित मांडणी अमिशने आपल्या विचारांतून मांडली आहे. अनेक पौराणिक संज्ञांचा आधार घेऊन, त्यांना एकमेकांत गुंफून सुंदर अशी माला रामचंद्र पुस्तक मालिकेच्या रूपाने लेखकाने घडवली आहे. अंधाराच्या खाईत बुडालेल्या भारतवर्षाला बाहेर काढण्यासाठी सीतेचा कार्यभाग नक्की काय होता यावर हे पुस्तक प्रकाश टाकतं. राम सीता यांच्या एकत्र येण्यामागे खरं गमक काय आहे; ते हि या कथेतून आपल्याला उलगडत जातं. मलयपुत्रांनी विष्णू म्हणून केलेली निवड सार्थ ठरवण्यात सीता यशस्वी होते का? कोणत्या गुणांमुळे तिला ही पदवी बहाल केली जाते याचा उलगडा ह्या भागात आपल्याला होतो.
प्रसंगांची तर्कसंगत मांडणी, भाषेचा लहेजा जपण्यासाठी केलेली शब्दनिवड आणि मूळ बांध्याला कुठेही धक्का लागू न देता पुढे सरकत जाणारी कथा हे या पुस्तक मालिकेचे वैशिष्ट्य आहे. अनेक भाषांमध्ये भाषांतर होऊनदेखील त्यात कुठेही तडजोड झालेली नाही. प्रत्येक भाषेमध्ये कथेची उत्कंठा टिकवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. सीतेबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी व ह्या पुस्तक मालिकेचा एकंदर व्यासंग समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला पाहिजे. सीता हि फक्त रामाची पत्नी वा रावणाने पळवलेली स्त्री नव्हती तर ती एक खरीखुरी क्षत्रिय योद्धा होती. ती काळाच्या पटलावर उगवली आणि अनेक नायकांच्या गर्दीत आपलं सार्वभौमत्व टिकवून उभी राहिली; तेही आजतागायत. अशा या नायिकेची कथा वाचण्यासाठी तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. ती तुम्हाला जराही निराश करणार नाही, एवढं मात्र नक्की.
-© गिरीश अर्जुन खराबे.