श्रीमान योगी - रणजीत देसाई | Shreeman Yogi - Ranjeet Desai | Marathi Book Review

श्रीमान-योगी-रणजीत-देसाई-Shreeman-Yogi-Ranjeet-Desai-Marathi-Book-Reviews
पुस्तक श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १२०० मूल्यांकन ४.९ | ५

तमाम मराठी मनावर आजतागायत राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रलेखन करणे म्हणजे मोठ्ठ आव्हान पण रणजीत देसाईंनी श्रीमान योगीच्या माध्यमातून ते यथार्थपणे पेलले आहे. जाणता राजा, कल्याणकारी राजा, प्रजाहितदक्ष राजा या महाराजांना मिळालेल्या उपमांच वर्णन विस्तृतपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. परकीय शत्रूच्या आश्रयाखाली खदखदणाऱ्या तत्कालीन समाजाला स्वतंत्रपणे जगण्याची मुभा देणाऱ्या, त्यांच्यात पेटून उठण्याची चेतना पेटवणाऱ्या महानायकाच्या हि गाथा आहे.

स्वराज्याच स्वप्न पाहणं आणि ते सत्यात उतरविण्यासाठी लढण्याच्या वाटचालीत जिजाऊंचा आणि त्यांच्या सवंगड्यांचा महाराजांना मिळालेला प्रतिसाद लेखकाने अचूक रेखाटला आहे. बालशिवाजी पासून ते छत्रपती पर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासात महाराजांना करावा लागलेला संघर्ष अनेक इतिहासकर्त्यांनी आपापल्या सोयीने रेखाटला आहे; पण त्यातील बारकावे लक्षात घेण्यासाठी ही कादंबरी अनेक अर्थांनी उपयुक्त ठरते. नरहर कुरुंदकरांसारख्या लेखकाची प्रस्तावना श्रीमान योगीला लाभल्यामुळे महाराजांच्या जीवनातले  अनेक पैलू आपल्याला जवळून आणि पुराव्यानिशी वाचायला मिळतात. इतकी मोठी प्रस्तावना लाभलेली मराठी कादंबरी होण्याचा मान यानिमित्ताने श्रीमान योगीला मिळाला आहे.

महाराजांचं युद्धकौशल्य, राजनीती, दूरदृष्टी, शत्रूला गाफील ठेवण्याचे तंत्र, माणसांची असलेली पारख आणि राज्याच्या सुरक्षेसाठी सागरावरच्या सत्तेचं असलेलं महत्व हे त्या काळच्या समकालीन सत्ताधीशांच्या विचारसरणीच्या कितीतरी पुढे होते हे कादंबरी वाचताना स्पष्टपणे समजून येते. एक ना अनेक प्रसंग रेखाटताना लेखकाने जे कौशल्य दाखवले आहे ते वाखाणण्याजोग आहे. मग अफझलखान भेट अन वध असेल वा शाईस्तेखानाला दाखवलेला कात्रजचा घाट असेल वा आग्र्याहून झालेली सुटका असेल असे अनेक प्रसंग कादंबरी वाचताना डोळ्यासमोर उभे राहतात. मोहिमेवर असताना रयतेला त्रास होऊ नये म्हणून आपल्या सैन्याला दिलेली आज्ञा असो वा समुद्राच्या छाताडावर गडकिल्ले बांधणे असो; महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अष्टपैलुत्व समजण्यासाठी हे असे प्रसंग पूरक ठरतात. महाराजांच्या विचारांचा पल्ला वाचकांना समजण्यासाठी असे एका ना अनेक प्रसंग रणजीत देसाईंनी ह्या कादंबरीतून जिवंत केले आहेत.

जिवावर बेतलेले कित्येक बिकट प्रसंग हाताळताना महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे वीर, त्यांची राज्यावर अन आपल्या राजावर असलेली अतूट निष्ठा व प्रसंगी त्यासाठी जिवाचीही बाजी लावणारे मावळे; या सर्वांना आपल्या लेखनातून न्याय देताना रणजीत देसाई उजवे ठरतात. स्वराज्य हे श्रींची इच्छा आणि त्या इच्छापूर्तीसाठी त्यांना लाभलेलं संतांचं समर्थन, उपदेश अन त्यातून घडत गेलेलं रयतेच राज्य हे सगळं समजून घेण्यासाठी श्रीमान योगी उपयुक्त ठरते. समर्थ रामदासांनी महाराजांना लिहलेली पत्र वाचताना महाराजांच्याबद्दल अनेक नवीन पैलू आपल्याला वाचायला मिळतात. राज्याची घडी बसवताना त्याचा हातभार महाराजांना लाभला आहे. समर्थांच्या जगप्रसिद्ध ओळीतर आपल्या सर्वांना माहीतच आहेत,

"निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।

अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।

यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।

पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा ।"

थोडक्यात छत्रपती हा विचार समजून घेण्यासाठी श्रीमान योगी वाचन महत्वाचं ठरतं. राजांचे अनेक गुण अनेक विचार आजच्या काळाशीही मिळतेजुळते आहेत हे समजणंही तितकचं महत्वाचं आहे आणि ती पातळी गाठण्यात लेखक यशस्वी झाला आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये व संकटांमध्ये मरगळलेल्या मनाला पुन्हा चेतवण्याची धमक शिवचरित्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्तिरेखा इतकी मोठी आहे कि त्याचे चरित्र लिहिण्याचे आव्हान पेलणे हे कोणाचंही काम नाही. श्रीमान योगीच्या निमित्ताने हे शिवचरित्र साकारलं गेलं आहे. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांसारख्या महान ग्रंथांप्रमाणे श्रीमान योगीचीही एक प्रत आपण सगळ्यांनी घरात ठेवलीच पाहिजे. तिचं वेळोवेळी पारायण करत राहिलं पाहिजे. तरच आपण समर्थ म्हणतात तसा आपला महाराष्ट्र धर्म टिकवू आणि वाढवू शकतो.  

"मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।"

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form