शू डॉग - फिल नाइट | Shoe Dog - Phil Knight | Marathi Book Review

शू-डॉग-फिल-नाइट-Shoe-Dog-Phil-Knight-Marathi-Book-Reviews
पुस्तक शू डॉग लेखक फिल नाइट
प्रकाशन मंजुळ पुब्लिकेशन हाऊस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ३५२ मूल्यांकन ४.८ | ५

एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी किती माणसे आहेत या जगात? अगदी बोटावर मोजता येतील इतकीच आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे "फिल नाइट". खेळासाठी बनवल्या जाणाऱ्या बुटांचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या अवलीयाची ही जगप्रसिध्द कथा. असा कोणी आहे काय ज्याला यशस्वी व्हायचं नसतं? स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं नसतं? स्वतःची स्वप्नं साकारायची नसतात? मात्र ते मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून फार थोडे लोक काम करतात. अशा झपाटून काम करणाऱ्यांच्या मागे यश नेहमीच उभं राहतं हे वेगळं सांगायला नको.

"Nike" चे जनक फिल नाईट यांच्या अनुभवांचं जीवनचरित्र असणारं हे पुस्तक वाचताना आपणच आपलं आयुष्य पुस्तकातून जगत आहोत असं वाटत राहतं आणि हेच या पुस्तकाचं खरं गमक आहे. लहानपणी शालेय अभ्यासात मन न रमणाऱ्या, लोकांच्या मतांना अनावश्यक महत्व देऊन मनात न्यूनगंड तयार झालेल्या एका लहान मुलाची ही कहाणी, आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाते. आईने केलेले संस्कार, मार्गदर्शन आणि तिचा सतत मिळालेला पाठिंबा हेच फिलच्या यशाचं खरं गमक आहे. सगळीकडे अपयशी ठरणारा मुलगा मात्र, एका गोष्टीमध्ये उत्तम असल्याची जाणीव आईने करून दिल्यानंतर फिलने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो स्वतःच्या आयुष्याला देखील एक धावण्याचीच स्पर्धा मानतो आणि जर ती जिंकायची असेल तर त्यात नियमितता आणि कष्ट कसे महत्वाचे आहेत हे आपल्याला पटवून देतो.

मुळातच फिलला धावण्याची आवड असल्याने, त्यात आलेले अडथळे दुसऱ्या कोणाला भेडसावू नयेत म्हणून सर्वोत्तम बूट बनवण्यासाठी त्याने सबंध आयुष्य अर्पण केलं. पदवी घेत असताना बुटांवर त्याने स्वतःचा प्रकल्प बनवून, त्यावर संशोधन करून नवनवीन पैलू जगासमोर मांडले. घरच्यांचा विरोधही नव्हता आणि पाठिंबाही नव्हता अशा परिस्थितीत खिशात मोजक्या दमड्या घेऊन निघालेला हा माणूस स्वबळावर आपल्या ध्येयासाठी झगडताना पाहून नक्कीच एक वेगळी ऊर्जा मिळते. जपान आणि अमेरिकेमध्ये विश्वयुद्ध चालू असताना एका अमेरिकन नागरिकाने, आमचा बूट कसा चांगला आहे.. हे पटवून देणे व याची जपानला कशी मदत होईल हे सांगणे मुळातच हास्यास्पद आहे. त्याला झालेला विरोध, त्याने सहन केलेल्या, अनुभवलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात परिपक्व बनवून जातात. जगण्याचे हजारो नवीन पैलू शिकवून जातात. संपूर्ण आयुष्य स्वप्नांसाठी झगडलेल्या एका माणसाच्या सानिध्यात आपल्याला स्वतःची वेगळी ओळख झाल्याशिवाय राहत नाही. अशी ही ध्येयवेडी कथा वाचताना एक वेगळीच जाणीव होते, एक वेगळाच उत्साह अंगात जाणवू लागतो.

आयुष्याची स्पर्धा जिंकण्यासाठी नक्की काय-काय करावं लागतं, त्यात छोट्या छोट्या गोष्टी देखील किती महत्वाच्या असतात हे लेखक आपल्याला सांगून जातात. आत्मचरित्र असले तरी कथा-कादंबरी प्रमाणेच यात अनेक विषय व दृष्टिकोन रंगवलेले आहेत. जे आपसूकच आपलं अवघं विश्व व्यापून घेतात. माझ्या लेखी तरी सर्वोत्कृष्ट अशा काही पुस्तकांमध्ये याचा समावेश नक्कीच होतो. वाचण्यासारखं, अनुभवण्यासारखं असं काहीसं हे "फिल नाइट" नावाचं अजब रसायन वाचल्याशिवाय समजतही नाही आणि समजावताही येत नाही!!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form